वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलसेवा, विठ्ठल मळ्यात जपलीय परंपरा..!
१६ वर्षांची परंपरा; ४० दिंड्यांतील सहा हजार वारकऱ्यांची सेवा
गीता भागवत करिती श्रवण।
अखंड चिंतन विठोबाचे।।
तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा ।
तरी माझ्या दैवा पार नाही ।।
वारकरी संप्रदायात सेवेला फार महत्त्व आहे. त्यात वारी काळात सेवा करण्यासाठी हजारो हात सरसावतात. आषाढी वारीच्या पावन निमित्ताने राज्यभरातून लाखो भाविक विठूमाउलीच्या दर्शनासाठी पायी चालत पंढरपूरकडे निघालेले आहेत. सातारा-पंढरपूर मार्गावर चाळीस दिंड्यांमधील सहा हजाराहून अधिक वारकरी पावन वारी करत आहेत. या पवित्र प्रवासात माण तालुक्यातील उकिर्डे घाटातील 'विठ्ठल मळा' हे ठिकाण एक विशेष महत्त्व धारण करते.
एम.आय.डी.सी.चे सेवानिवृत्त महामुख्य कार्यकारी अधिकारी व कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार हे आपल्या कुटुंबासह आपल्या येथील पिढ्यानपिढ्या चालत आलेली वारकऱ्यांची निस्वार्थ सेवेची परंपरा गेली सोळा वर्षे अखंडपणे चालू ठेवली आहे. विठ्ठल मळ्यात येणाऱ्या सहा हजार वारकऱ्यांना चहा, नाश्ता, स्वच्छ पाणी, जेवण आणि राहण्याची संपूर्ण सोय करून त्यांनी भक्तिभावाची आणि वारक-यांच्या सेवेची एक वेगळी परंपरा येथे उभी केली आहे.

आषाढी वारीच्या काळात विठ्ठल मळा हे ठिकाण वारकऱ्यांच्या गर्दीने भरून जाते आणि त्याला मिनी पंढरपूरचे स्वरूप प्राप्त होते. सुभेदार कुटुंबाची विठूमाउलीविषयीची भक्ति पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. स्वर्गीय जगन्नाथ सुभेदार आणि स्वर्गीय शशिकला सुभेदार यांच्या विठूमाउलीविषयीच्या अगाध प्रेमामुळेच त्यांनी आपल्या मळ्याला विठ्ठल मळा हे नाव दिले होते.
या वर्षी अविनाश सुभेदार यांनी आपली पत्नी रोहिणी सुभेदार यांच्यासह अठरा दिंड्यांचे स्वागत करून त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली. तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या बावीस दिंड्यांमधील वारकऱ्यांना पाणी, चहा आणि नाश्त्याची सोय केली. सलग पाच दिवस या कुटुंबाने अविरत सेवा केली आणि दिवसेंदिवस वाढत्या दिंड्यांची सेवा करण्याचे भाग्य त्यांना प्राप्त झाले.

अविनाश सुभेदार यांनी या सेवेबद्दल सांगितले की, "हजारो वारकऱ्यांची सेवा करण्याचा वारसा आम्हाला आमच्या आजोबा आणि आई-वडिलांकडून मिळाला आहे. ते विठूमाउलीचे मोठे भक्त होते आणि नेहमी वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करत असत. त्यांच्याच कार्याचा वारसा गेली सोळा वर्षे आम्ही पुढे नेत आहोत. वारकऱ्यांची सेवा करण्याचे हे मोठे भाग्य आम्हाला मिळत असून हे आमचे सर्वात मोठे वैभव आहे."
ते पुढे म्हणाले, "आषाढी वारीच्या काळात विठ्ठल मळ्यात वारकऱ्यांचा पदस्पर्श होतो हे आमचे भाग्य आहे. त्यांच्या रूपाने विठूमाउलींची सेवा करता येते. प्रत्येक वर्षी या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो. या सेवेत आमचे नातेवाईक, पाहुणे आणि मित्रमंडळीही सहभागी होत असतात. या मार्गावरून जाणाऱ्या सर्व दिंड्यांमधील भाविकांना संपूर्ण सोयीसुविधा पुरवण्यासाठी आमचा नेहमीच प्रयत्न राहील."
या निस्वार्थ सेवेचे उदाहरण वारकरी परंपरेच्या खऱ्या भावनेला साक्ष देते आणि असे दाखवते की भक्ति केवळ मंदिरात जाण्यापुरतीच मर्यादित नसून ती सेवा आणि त्यागात प्रकट होते.