हिंदी सक्ती विरोधात चढाओढ! ठाकरेंचे मोर्चे मराठीसाठी की राजकीय शक्ती दाखवण्यासाठी?

मुंबई : एक मुद्दा… पण दोन मोर्चे! आणि दोघंही 'ठाकरे'. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र येतील, असं काही जणांना वाटत होतं. पण झालं उलटंच. दोघांनी आपापल्या नेतृत्वात, एकाच विषयावर, अवघ्या दोन दिवसाच्या फरकाने मोर्चे जाहीर केलेत. विषय आहे हिंदी सक्ती विरोधात आणि त्रिभाषा धोरणा विरोधात आवाज उठवायचा. पण हे खरंच केवळ भाषेच्या प्रश्नासाठी आहे का, की ठाकरे विरुद्ध ठाकरे यांची राजकीय शक्ती प्रदर्शनाची चढाओढ सुरू आहे?


राज्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र येणार का, यावरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, आता या दोघांनीही आपल्याच नेतृत्वात मोर्चे काढणार असल्याचे जाहीर करून राजकीय वर्तुळात नवा ट्विस्ट आणलाय. हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे शनिवारी (५ जुलै) तर उद्धव ठाकरे सोमवारी (७ जुलै)ला मोर्चा काढणार आहेत. विशेष म्हणजे, दोघांनीही सर्वपक्षीय नेत्यांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केलेय.



राज ठाकरे ५ जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढणार आहेत. त्यांनी स्पष्ट केलंय, कोणताही पक्षाचा झेंडा नसेल, हा फक्त मराठी माणसाचा मोर्चा असेल. शिक्षणमंत्री दादा भुसे भेटून गेले, तरीही राज ठाकरेंनी त्रिभाषा धोरण धुडकावून लावलं. ते म्हणाले – ‘महाराष्ट्राचं मराठीपण हरवतंय, सीबीएसई शाळा वाढतायत, केंद्र मराठीवर दबाव टाकतंय, आणि राज्य सरकार हे निमूटपणे स्वीकारतंय.’ म्हणूनच, हा लढा आहे 'कटाविरुद्ध' आणि मराठीच्या अस्मितेसाठी. पण गंमत अशी, की राज ठाकरेंच्या घोषणेनंतर लगेचच उद्धव ठाकरेंनीही दुसऱ्या दिवशी म्हणजेच ७ जुलैला मोर्चा काढणार असल्याची घोषणा केलीय. त्यातही सर्वपक्षीय नेत्यांना सहभागी होण्याचं आवाहन केलंय.


आता प्रश्न उभा राहतो.. हे दोघं खरंच मराठीसाठी लढतायत, की एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी वेगळ्या मार्गाने चाललेत? एकाच विषयावर दोन मोर्चे म्हणजे एकवाक्यता नाही की एकमेकांवर अविश्वास? मराठीसाठी असं जर खरंच मनापासून लढायचं असेल, तर या दोघांना एकत्र येण्यास काय अडचण आहे? का अजेंडा मराठीचा नाही, तर मंच आणि माईक आपापला ठेवायचा हेच खरे उद्दिष्ट?


मोर्चा कुणाचाही असो, लढा खराच असेल, तर मराठी जनता त्यात सामील होईल. ठाकरे विरुद्ध ठाकरे – हा खरंच मराठीसाठीचा लढा आहे का? की पुढील निवडणुकांसाठीची सराव मोर्चेबाजी? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Comments
Add Comment

मुंबईतील २५२ कोटींच्या एमडी ड्रग्ज प्रकरणात मोठा खुलासा: सलीम शेखच्या कबुलीजबाबाने खळबळ

मुंबई : देशभरात खळबळ माजवणाऱ्या २५२ कोटी रुपयांच्या मेफेड्रोन (एमडी) प्रकरणात पोलिसांना आणखी एक मोठा धागा मिळाला

घाटकोपरमध्ये रस्ता रुंदीकरणातील अडथळा झाला दूर

बाधित २४ बांधकामांवर झाली अखेर कारवाई मुंबई (खास प्रतिनिधी) : घाटकोपर येथील झुणझुणवाला महाविद्यालय ते

उत्तर पश्चिम जिल्ह्यात महायुतीचे ३२ ते ३३ नगरसेवक निवडून आणणार

भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड ज्ञानमूर्ती शर्मा यांनी व्यक्त केला विश्वास मुंबई (सचिन धानजी) : उत्तर पश्चिम लोकसभा

लाडकी बहीण योजनेची वेबसाईट होत आहे अपग्रेड

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची सर्वाधिक लोकप्रिय योजना आहे. या योजनेचा सोळावा

दहिसरच्या राजकारणात उलथापालथ, वॉर्ड क्रमांक १ घोसाळकर कुटुंबाच्या आवाक्याबाहेर!

मुंबई : मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. पण राजकारणात हालचाली सुरू झाल्या आहेत. दहिसरमधील

शीतल म्हात्रे यांचा मोठा निर्णय : महापालिका निवडणूक लढवणार नाही, आमदारकीवर लक्ष केंद्रित!

मुंबई : शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे मुंबईच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरल्या आहेत.