समाजसेवेचा तेजोमय दीपस्तंभ

वैशाली गायकवाड


एखाद्या व्यक्तीच्या जीवनात जर सेवाभाव हा श्वासासारखा नैसर्गिक झाला, तर तिचं संपूर्ण अस्तित्वच समाजासाठी समर्पित होऊन जातं. ‘जस्मिन शाह’ हे असंच एक तेजस्वी नाव, ज्यांचं जीवन म्हणजे नि:स्वार्थ सेवेचा अविरत झराच. त्यांच्या कृती, कर्तृत्व आणि करुणेचा परीघ केवळ शहरापुरता मर्यादित नसून, तो दूरवरच्या ग्रामीण व आदिवासी भागातही पोहोचलेला आहे.


गेल्या २० वर्षांहून अधिक काळापासून त्यांनी आरोग्य, महिला सशक्तीकरण, सामाजिक सुधारणा आणि सामूहिक कल्याण या क्षेत्रांमध्ये अतुलनीय कार्य केलं आहे. त्यांचे सामाजिक कार्य म्हणजे समाजाच्या अंतरंगात उमलणाऱ्या आशेच्या सुगंधी फुलाप्रमाणे आहे. त्यांची कामगिरी ही कधी रुग्णालयांच्या उभारणीतून दिसते, तर कधी अनाथ बालकांच्या डोळ्यांतील आनंदाश्रूतून प्रकट होते.


पाच पिढ्यांसह एका घरात राहणाऱ्या जस्मिनताईंनी कौटुंबिक जबाबदाऱ्या देखील तेवढ्याच कौशल्याने पार पाडल्या आहेत. दोन अपत्यांची माय आणि एक अष्टपैलू गृहिणी म्हणून त्या घर आणि बाहेर यामध्ये एक अद्वितीय समतोल साधतात. त्यांनी गृहशास्त्र, व्यावसायिक कला, फॅशन डिझाईन, योग आणि जैन तत्त्वज्ञान या विविध क्षेत्रांमध्ये आपले ज्ञान संपादन केले असून, आजही त्या स्वयंअध्ययनातून स्वतःला वेळोवेळी नव्याने घडवत आहेत. बालपणी आजोबांच्या दानशूर व्यक्तिमत्त्वाचे बीज पेरले गेल्याने व सासरी आल्यानंतर सासऱ्यांच्या समाजभान जपणाऱ्या कार्याने प्रेरित होऊन जस्मिनताई अविरत कार्यरत आहेत.


निकोप आणि निरोगी आरोग्य सगळ्यांना लाभावे याकरिता आरोग्य क्षेत्रातील त्यांचे कार्य विशेष उल्लेखनीय आहे. त्यांनी ९५००हून अधिक लोकांना योगसाधना शिकवली आहे. महिलांना शारीरिक, मानसिक व सामाजिक दृष्टिकोनातून सक्षम बनवले आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून उभे राहिलेले वैद्यकीय केंद्र व रुग्णालये अनेक कुटुंबांना आरोग्याचा नवा श्वास देत आहेत.या सेवाभावाला अधिक व्यापक रूप देण्यासाठी त्यांनी ‘प्रेमकांत फाऊंडेशन’ ही संस्था स्थापन केली. गेल्या ४९ वर्षातील जैन समूहातील इतिहासात जस्मिनताई या संस्थेच्या पहिल्या महिला विश्वस्त म्हणून कार्य करीत आहेत. जी संस्था आज अनाथ बालक, निराधार वृद्ध, ग्रामीण कुटुंबे, बेरोजगार महिलांना रोजगार प्रशिक्षण, जखमी प्राणी आणि अपंगांपर्यंत सेवा पोहोचवते. त्यांच्या या कार्यामुळे शेकडो दात्यांना योग्य ठिकाणी मदत पोचवण्याचा एक विश्वासार्ह दुवा मिळाला आहे.


गेल्या ७ वर्षापासून विविध सामाजिक प्रश्नावर या संस्थेने उल्लेखनीय कार्य केले आहे. गोरगरीब पालकांच्या मुलांसाठी कार्यशाळा, शैक्षणिक साहित्य वाटप, गणवेश, दप्तरांचे वाटप, प्रसंगी मुलांची शाळेची फी भरून वंचित मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रमुख काम त्यांनी केले आहे. समाजातील आर्थिकदृष्टीने दुर्बल घटकांसाठी, अबला महिला, वयोवृद्ध लोकांसाठी वैद्यकीय शिबिरांचे आयोजन करणे, अंध, दिव्यांग, मानसिक दिव्यांग तसेच सहवास मतिमंद मुलांच्या निवासी प्रकल्पवार असलेल्या ३२ मुलांसाठी योग-मेडिटेशन सेंटरचे निर्माण त्यांनी केले आहे. अन्नछत्र (भोजन-कक्ष) व गोशाळेची निर्मिती जस्मिनताईंनी केली. एवढेच करून त्या थांबल्या नाहीत तर, दर महिन्याला अन्नधान्य, नियमितपणे मुलांना लागणारे मूलभूत सामग्रीचे (टीव्ही, कूलर, गिजर, वॉटर फिल्टर, बेड-गाद्या) तसेच विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांनी (दिव्यांग)मुलांचे आयुष्य सुसह्य करण्यासाठी विशेष योगदान दिले.


मेंटल हॉस्पिटल, ठाणे या ठिकाणी मेडिटेशन योग कार्यक्रम, फॅशन डिजाईन, ज्वेलरी मेकिंगचे प्रशिक्षण देऊन महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं यासाठी विशेष प्रयत्न प्रेमकांत फाऊंडेशन मार्फत केले जात आहेत.


मुंबई क्षेत्रात मेडिकल क्लिनिकमधून अल्प दरात रुग्णांना औषधं उपलब्ध करून देऊन, योग्य किंबहुना मोफत उपचार या संस्थेच्या माध्यमातून सुरु आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात देखील प्रेमकांत फाऊंडेशन कार्यरत आहे. त्यांचे कार्य हे फक्त जैन समूहापूर्ती मर्यादित न राहता त्याचा विस्तार हा संपूर्ण राष्ट्रासाठी व्हावा याकरिता राष्ट्रीय स्वंयसेवक दल, विहिंप यासारख्या संस्थांशी संलग्न होऊन हिंदू संस्कृती आणि परंपरा जतन करण्याचे मोलाचे कार्य त्या करत आहेत. तसेच सेवा कनेक्ट या नवीन पोर्टलद्वारे जगभरातील लोकांपर्यंत आवश्यक ती माहिती पोहोचवली जाणार आहे. विशेष म्हणजे येत्या १ जुलै २०२५ रोजी गोमातेसाठी जळगाव जिल्ह्यात या फाऊंडेशन मार्फत गोशाळेची लवकरच निर्मिती होणार आहे. गोमातांसाठी लागणारा चारा पुरवला जाऊन त्यांच्यासाठी तिथे शेड बांधण्यात येणार आहे. तसेच नुकतीच त्यांनी बदलापूर येथे एक ॲम्बुलन्स तिथल्या आदिवासी पाड्यातील प्राण्यांना नवसंजीवन देण्यासाठी दान केली आहे.


समाजात वावरत असताना मनुष्याप्रमाणेच पर्यावरण व प्राणी हा देखील एक आपल्या जगण्याचा अविभाज्य घटक जपण्याची संवेदनशीलता जस्मिनताईंच्या कार्यातून दिसून येते. या समर्पित कार्याची दखल घेऊन त्यांना विविध सन्मानांनी गौरवण्यात आले आहे, ज्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी फाऊंडेशनचा अत्युच्च सन्मान राष्ट्रीय अटल पुरस्कार २०२४, नारी उत्कर्ष २०२४, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कच्छी पगडी गौरव, ठाणे गौरव पुरस्कार २०२२, शिवसेना-आनंद दिघे चॅरिटेबल ट्रस्टमार्फत नारी उत्कर्ष २०१४, समाजातील शांततेचा जागर अहिंसा क्रांती पुरस्कार २०२३, गृहरक्षक समितीकडून कोरोना काळातील साहाय्यक कार्यासाठी पोलीस संघर्ष गौरव, प्रमोदिनी संस्थेचा स्त्रीशक्ती सन्मान सावित्री पुरस्कार, सर्वोदय राष्ट्रीय पुरस्कार २०२२” अखिल भारतीय सेवाभावाचा गौरव, महावीर जैन हॉस्पिटल सेवा पुरस्कार – वैद्यकीय सेवेसाठी, कच्छी महिला फेडरेशन सन्मान असे पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले.


या सर्व पुरस्कारांच्या झगमगाटापलीकडे, त्यांच्या डोळ्यांतील कृतज्ञतेचा निखळ प्रकाश आणि मनातील सेवाभावाची गूढ शांतता सर्वात मोठी आहे. त्यांचं जीवन म्हणजे नारी शक्तीचं सजीव प्रतीक, जी झुंजते, उभी राहते, आणि समाजालाही उभं करते. महिलांनी स्वतःच्या वेळेचे उत्तम नियोजन करत स्वतःला उत्कृष्टरित्या घडवण्याचा सल्ला त्या समस्त महिलांना देतात.जस्मिन शाह यांच्या कार्यातून आज हजारो आयुष्यं उजळली आहेत, आणि उद्याच्या पिढ्यांसाठी एक दृढ, सुंदर आणि सशक्त मार्ग तयार झाला आहे. अशा या दैदिप्यमान स्त्रीच्या कार्याला शब्दात मांडणं हेच एक मोठं भाग्य! ताईंच्या या अनुकरणीय अशा प्रवासातून अनेक महिलांना निश्चितच प्रेरणा मिळेल. त्यांच्या हातून घडणाऱ्या प्रत्येक उपक्रमाला यश लाभो. त्यांच्या या पवित्र कार्याचा नंदादीप अखंड तेवत राहून समाजातील प्रत्येक स्तर प्रकाशमान होवो या सदिच्छेसह त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.

Comments
Add Comment

Majhi Kanya Bhagyashree Yojana : ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेचे फायदे ऐकूनही तुम्ही चकीत व्हाल

Majhi Kanya Bhagyashree Yojana : राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या जन्मदरात वाढ करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून

Ramai Awas Yojana : घर बांधायला पैसे नाहीत ? मग काळजी कशाला ? 'रमाई आवास' घरकुल योजना आहे ना !

Ramai Awas Yojana : राज्य सरकारने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ‘रमाई आवास (घरकुल) गृहनिर्माण योजना’ सुरू केली

Luck : चंगळता !

आमचे एक स्नेही आहेत. अगदी खेड्यात बालपण गेलेले असताना स्वकर्तृत्वाने शिक्षण घेतले, शिष्यवृत्त्यांवर शिकून

Lazy Pallu : उन्हाळ्यात वाढली ‘लेझी पल्लू’ची क्रेझ

एकेकाळी साडीचा पदर अगदी चापून-चोपून, नीट प्लेट्स घालून पिनअप करणं हीच एलिगंट फॅशन मानली जायची. पण बदलत्या

Kajuli biswas : संघर्ष आणि नि:स्वार्थ सेवेची कहाणी : काजुली विश्वास

पश्चिम बंगालच्या काजुली विश्वास यांनी गरिबी, उपासमार, बेघरपणा आणि आपल्याच लोकांची उपेक्षा सहन केली, पण या

Abhilasha Barak : मेजर अभिलाषा बराक यांना 'मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर' पुरस्कार

भारतीय लष्करातील धडाडीच्या महिला अधिकारी मेजर अभिलाषा बराक यांनी आपल्या कर्तृत्वाने जागतिक पातळीवर देशाचे नाव