खांदेरी जलदुर्गावर मंकलासोबतच ‘वाघबकरी’ खेळाचा समावेश

  45

अभ्यासक पंकज भोसले यांच्या शोध मोहिमेला यश


सुभाष म्हात्रे


अलिबाग : शिवकालीन खांदेरी जलदुर्गावर मंकलासोबतच 'वाघबकरी' हा खेळही सापडला असून, बैठ्या खेळांचे अभ्यासक पंकज भोसले यांनी राबविलेल्या शोध मोहीमेला यश आले आहे.


महाराष्ट्र दुर्ग लेण्यांसाठी प्रसिद्ध आहेच, यातील काही दुर्गलेण्यांमध्ये जमिनीवरील कातळात समांतर रेषेमध्ये समोरासमोर सात किंवा आठ खड्डे पाहायला मिळतात, तर काही ठिकाणी चौकोनी किंवा आयताकृती पट देखील पाहायला मिळतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर अशा खेळांचे पट आज देखील दृष्टीस पडतात. महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांवर अशा आकृती आपण पाहू शकतो. ज्याप्रमाणे हे खेळ कोरले गेले आहेत. त्यामुळे त्याचे अस्तित्व शिवकाळापासून आहे हे सिद्ध होते.


अशा प्रकारचे काही खेळ आम्हाला किल्ले खांदेरी येथे मिळालेले असून, यावरून हे सिद्ध होते की, या खेळांचे अस्तित्व शिवकाळात देखील होते आणि प्रचलित होते. मुंबईचे इंग्रज आणि जंजिरेकर सिद्धी यांच्यापासून समुद्रसीमांचे रक्षण करण्यासाठी शिवरायांनी इ.स.१६७२ मध्ये मुंबईपासून १५ मैलावर असणाऱ्या ‘खांदेरी’ बेटावर किल्ला बांधण्याचे ठरविले. इ.स १६७९ मधे मायनाक भंडारी यांच्या नेतृत्वाखाली निवडक १५० माणसे देऊन ऐन पावसाळयात खांदेरी जलदुर्गाच्या बांधकामास पुन्हा सुरुवात करण्यात आली. अभेद्य मजबूत तटबंदी व बुलंद बुरुज असलेला हा खांदेरी किल्ला समुद्राच्या लाटांना समर्थपणे तोंड देत दिमाखाने आजही उभा आहे.


बैठ्या खेळांच्या शोध मोहिमेत खांदेरी किल्ल्याच्या तटबंदीवर काही खेळांच्या कोरीव अवशेष मिळाले असून, याची संख्या एकूण बारा आहे. दुर्गाभोवतीच्या तटबंदीवर विविध ठिकाणी हे कोरलेले आहेत. या पटांमध्ये 'मंकला' हा खेळ प्रामुख्याने पाहायला मिळतो. जमिनीवर समांतर रेषेमध्ये समोरासमोर सात किंवा आठ किंवा त्याहूनही अधिक खड्डे पाहायला मिळतात. या खेळाचे नाव ‘मंकला’ आहे. गणिताचे कौशल्य वाढवणारा हा खेळ जगभर विविध नावाने प्रसिद्ध आहे. खांदेरी किल्ल्यावर या खेळाचे एकूण १० पट या शोध मोहिमेत सापडले आहेत. इथे सापडलेल्या एका मंकला पटाचे वैशिष्ट्य असे की, इथे समोरासमोर सात किंवा आठ खड्डयांऐवजी एकूण २७ खड्डे( एकाच पटात) दिसून आले आहेत. खेळाचे हे नवे स्वरूप आफ्रिकेमधील ‘बाओ’ या खेळाशी मिळते जुळते आहे.


खांदेरी येथे सापडलेला दुसरा खेळ , शिकारीचा खेळ म्हणून ओळखला जाणारा 'वाघ बकरी' हा खेळ आहे. छोट्या पटापासून ते अगदी मोठ्या पटापर्यंत हा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. एका विशिष्ट प्रकारची रचना असलेल्या या खेळाचे महाराष्ट्रात जवळजवळ ४ ते ५ वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. वाघाने जास्तीत जास्त बकरीची शिकार करायची आणि बकरीने बचाव करून वाघास कोंडीत पकडायचे, असे नियोजन कौशल्य वाढवणारा हा खेळ आहे. खांदेरीच्या तटबंदीवर अशा प्रकारचे दोन खेळ आपल्याला सापडले असून, त्यातील एक खेळ अंशतः नष्ट झाला आहे. त्यावरील रेखीव अवशेष अस्पष्ट स्वरूपात दिसत आहेत. एके ठिकाणी ढासळलेल्या तटबंदीवर हा खेळ असून, तो मोठ्या दगडावर कोरलेला आहे. सरेखन पद्धती वापरून शिकारीचा खेळ म्हणून प्रसिद्ध असलेला हा खेळ महाराष्ट्रातील समुद्री किल्ल्यावर(जलदुर्गावर) सापडलेला हा पहिलाच खेळ आहे.


आर्ट ऑफ प्लेईंग आणि आपला कट्टा या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ही शोधमोहीम मे महिन्यात घेण्यात आली होती. यात बैठ्या खेळांचे अभ्यासक पंकज भोसले, ममता भोसले, केतकी पाटील, सिद्धेश गुरव आणि अनिकेत पाटील यांनी सहभाग घेतला होता.

Comments
Add Comment

माणगावमध्ये वाहतूककोंडी, ठिकठिकाणी पोलिस तैनात

मुंबईमधून गणपतीला कोकणात जाणाऱ्या गाड्यांमुळे सलग दुसऱ्या दिवशी माणगाव शहरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली

गणपतीला कोकणात जाण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकांवर गर्दी

आज रविवार असल्याने गणपतीला कोकणात जाण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबई आणि नवी मुंबईतील विविध ठिकाणाहून

नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर होईना, इच्छुकांची कोंडी सोडवेना

माथेरान : माथेरान नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत यावेळीसुद्धा नगराध्यक्षपदाची निवडणूक ही थेट जनतेच्या

पनवेल-चिपळूणदरम्यान 6 अनारक्षित विशेष रेल्वे गाड्या

कोकणात जाण्यासाठी गणेशोत्सवाच्या काळात रेल्वे गाड्यांमध्ये वाढणारी भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन भाविक

"मोदी एक्प्रेससने गावाक जाऊचो आनंद काय वेगळोच" कोकणकरांना घेऊन पहिली मोदी एक्सप्रेस सुटली

गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई आणि मुंबई परिसरातील कोकणकरांना कोकणात जाण्यासाठी विशेष रेल्वे सुरु करण्यात

कोकणात जाणाऱ्यांसाठी गणेशोत्सवात स्पेशल मेमू

कोकणात येणाऱ्या प्रवाशांसाठी गणेशोत्सवात स्पेशल मेमू सोडण्यात येणार आहे. ही रेल्वे ५, ६ आणि ७ सप्टेंबरला धावणार