प्रत्येक प्रेक्षकाने पडताळून पाहावी अशी “भूमिका”

  90

पाचवा वेद : भालचंद्र कुबल 


आज ज्या दिवशी मी ‘भूमिका’ या नाटकाचं निरीक्षण लिहितोय त्याचवेळी सध्या आणखी चार मराठी नाटके ‘आंबेडकरवाद’ ठामपणे मांडताहेत. ‘अंधार गुणिले अंधार’, ‘शिवाजी गौतम’, ‘युगे न् युगे तुच’ आणि ‘आंबेडकर विरुद्ध आंबेडकर’पैकी ‘भूमिका’ नाटकास व्यावसायिक अधिष्ठान प्राप्त आहे, त्यामुळे ते प्रेक्षकांकरवी अधिक पाहिले जाईल म्हणून मग ‘आंबेडकरवाद आणि त्यातील भूमिकेच्या कक्षा’ असा लेखाच्या कक्षा रुंदावणार नाहीत याचे भान राखत थोडासा ऊहापोह मांडतोय. त्यामुळे तो खणखणीत, दणदणीत, पुरोगामी-वैचारिक, बुद्धिवादी, समताधिष्ठित, प्रगल्भ नेत्रांजन वगैरे विशेषणांनीयुक्त असा हा जाहिरात सदृश मजकूर नसेल याची वाचकांनी नोंद घ्यावी.


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना ईझमचे स्वरूप जेव्हा प्राप्त झाले तेव्हा बहुतांशी बहुजन समाज, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या चार तत्त्व-मूल्यांना स्वीकारून सामाजिक स्थैर्याकडे वाटचाल करायला लागलेला होता. ज्या देशात बौद्धीकदृष्ट्या सक्षम आणि विचारशील लोक राहतात, त्यांना घेऊन ‘प्रबुद्ध भारत’ ही संकल्पना राबवावी या विचारसरणीलाच राजकीय विरोध आणि नागरिकांमध्ये वैचारिक गोंधळ माजवून आजमितीला “आंबेडकरी चळवळ” जैसे थे या अवस्थेतच आहे. त्यामुळे दोन तृतीयांश भारतीय जनतेकडून आंबेडकरवाद दुर्लक्षितच राहिला. पुढे येऊ घातलेल्या राज्यकर्त्यांनी जातीयवाद जोपासून आंबेडकर वादातील वैज्ञानिक दृष्टिकोनाला हरताळ फासला आणि मग विविध अंगांनी, विविध माध्यमांद्वारे, विविध विचारसरणीच्या आंबेडकर वादाचे केलेले समर्थन म्हणजे मांडलेल्या या ‘भूमिका’ होत.


सर्व प्रथम क्षितीज पटवर्धन यांनी लिहिलेल्या या बॅलन्स नाटकाबद्दल त्यांचे अभिनंदन. कोणीही दुखावला जाणार नाही, कुठलाही विवाद निर्माण होणार नाही आणि अगदी वरवरचं भासणार नाही असं सेफ फॅब्रिकेशन म्हणजे भूमिका आहे. बरं, तसं ते का नसावं? हा देखील एक बहुमूल्य व्यावसायिक प्रश्न आहेच की...! अँटीसिपेटेड कथा-प्रारूपाचा भरमसाट भरणा झाला की, मग ती भूमिका फॅब्रिकेटेड वाटायला लागते. मुळात चर्चानाट्य वाटू नये म्हणून काय क्लुप्त्या कथानकाच्या अानुषंगाने उभ्या कराव्यात? यात यशस्वी झालेली ही भूमिका आहे. उल्लेख करायचा झाल्यास कथासूत्राला सहाय्यक व्यक्तिरेखा या परस्पर तत्त्वविरोधी निर्माण केल्यास अनेक संघर्ष बिंदू निर्माण केले जाऊ शकतात. त्यापैकी एखाद्या संघर्षावर क्लायमॅक्स बेतता येतो, या समीकरणाची मांडणी म्हणजेच एक्स्प्रेसली फॅब्रिकेशन (संदिग्ध बनावट), उदा. मध्यांतराच्या अगोदरच्या प्रसंगात नायक बाबासाहेबांच्या वेषात घरी प्रवेश करतो आणि घरात त्यांच्या मुलीला ९३.३४% मिळून सुद्धा मेडिकलला प्रवेश न मिळाल्याने वातावरण टेन्स आहे, अशा वेळी घरकाम करणाऱ्या बाईच्या मुलीला ८०% मिळाल्याने मेडिकलला अॅडमिशन मिळाल्याचे पेढे वाटतानाच नायकाच्या रूपातले बाबासाहेब तिच्या समोर उभे राहतात, ती भांबावते, गहिवरते, टोकाच्या श्रद्धेने पार नतमस्तक होते आणि टाळ्यांच्या कडकडाटांतच मध्यांतर होतो...! चलाख प्रेक्षक ओळखतोच की ज्या अर्थी बाबासाहेबांच्या रूपात नायकाने प्रवेश घेतलाय त्या अर्थी कुणीतरी नतमस्तक होणारच आणि तसं घडतंही... असो. अशी अनेक उदाहरणे नाटकात पावलापावलांवर आढळतात. त्यामुळे आंबेडकरवाद लेखनिकदृष्ट्या व्यक्तिसापेक्ष ठरतो. विचार करा, नायकाला करायचे स्टेटमेंट तो ज्यावेळी शिवाजी पार्कातला एक नट ५,६,७ डिसेंबर या तारखांना कुठेतरी बाहेर जाऊन राहतो, कारण या जयभीम लोकांचा त्रास त्यांना होत असतो आणि मग आंबेडकरी जनतेच्या असमानतेबाबतच्या मुद्याचं टाळीबाज समर्थन करतो किंवा साडीच्या निळ्या रंगाचा “जयभीम कलर” असा उल्लेख एखाद्या त्रयस्थाच्या माथी चिकटवतो तेव्हा त्यामागचा उद्देश “सेफ”च असतो. म्हणून मग बॅलन्स संहिता असा उल्लेख टाळता येत नाही, तर पुन्हा असो.


खरंतर या नाटकाच्या निमित्ताने बराच मोठा लेख लिहायचा होता, पण जागेअभावी तो मोह टाळावा लागतोय. या आधी येऊन गेलेल्या वाटा-पळवाटा किंवा जाता नाही जातसारख्या नाटकांच्या विचारसरणीचा तौलनिक अभ्यास किंवा एखाद्या व्यक्तिरेखेचा कलाकाराच्या आयुष्यावर होणाऱ्या आंतरबाह्य बदलामागचे मनोविश्लेषण अशा बऱ्याच वैचारीक मुद्यांवर भाष्य होऊ शकते. मला तर बेन किंग्जले यांनी गांधी साकारल्यावर आजही ते गांधीवादानुसारच आयुष्य जगताहेत हा बदल प्रचंड इंटरेस्टिंग वाटतो आणि त्याच बरोबर आपल्याच मराठी नाट्यसृष्टीतील प्रमोद पवारांनी १० ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारूनही ते प्रमोद पवार म्हणूनच जगतात. ही कुठली वृत्ती आहे? (वृत्ती म्हणजे वर्तणूक असा अर्थ अभिप्रेत नसून परिवर्तन असा घ्यावा) हा ब्रेकफास्टचे कांदेपोहे संपवण्यागत सोप्पा ऊहापोह नाही, त्यामुळे बांधलेल्या रस्त्याला अनेक फाटे फोडत, टीव्ही मालिकांबाबत सामान्यज्ञान देत “आंबेडकरी मनोरंजनाचा” बांधलेला घाट प्रेक्षणीय मात्र आहे. सचिन खेडेकरांच्या भूमिकेबाबत सर्वत्रच वाहवा होताना दिसतेय आणि ती योग्यच आहे; परंतु समिधा गुरू, अतुल महाजन, सुयश झुंजुरके, जयश्री जगताप आणि जाई खांडेकर या रंगकर्मींच्या हातात मौनरागसारखे अभिवाचन नसूनही वाचिक अभिनयात सरस ठरले आहेत.
विशेष उल्लेख करावी अशी नाटकाची दोन अंगे, पहिले म्हणजे प्रकाश योजना. अगदी जनरल लाईट्सवर होऊ शकणाऱ्या नाटकाला जे मुड्स अमोघ फडके यांनी दिलेत त्याला तोड नाही. विशेषतः नाटकाचा शेवट हा लाईट्सवर का महत्त्वाचा असतो, हे दाखवून देणारी ही भूमिका अत्यंत सकारात्मक आहे आणि दुसरे अंग म्हणजे रंगभूषा. उलेश खंदारे यांनी प्रतिरूप बहाल केलेले बाबासाहेब मला तरी विसरता येणार नाहीत.


आमच्या विक्रोळी कन्नमवार नगरात दरवर्षी १४ एप्रिलला रात्री १२ वाजता फटाक्यांची आतिषबाजी झाली की एक शोभायात्रा निघते. त्यावर बाबासाहेबांची व्यक्तिरेखा साकारणारा आमचा मित्र भूमिकेतून १५ एप्रिलला बाहेर आलेला असतो; परंतु अत्त्युच्च श्रद्धास्थानी असलेल्या त्या भूमिकेला बाया-बापडे नॉर्मल लाईफमध्येही, रस्त्यावर, बसमध्ये, तो भेटेल तिथे जयभीम “घालायला” विसरत नाहीत. तो जयभीम त्या व्यक्तिरेखेसाठी असतो, जो जिवंत अनुभव देतो. चंद्रकांत कुलकर्णी यांना अचूक दिग्दर्शनाबद्दल आणि श्रीपाद पद्माकर व दिलीप जाधव यांना सर्वांगीण निर्मितीबाबत पैकीच्या पैकी गुण द्यायलाच हवेत. सर्वसामान्यांच्या भावनांना हात घालणारे हे नाटक पुढल्या वर्षीची सर्वोत्कृष्ट निर्मिती असेल. नाटक या माध्यमाद्वारे “भूमिका” अधली मधली घेण्यापेक्षा टोकाची घेतल्यास परिणामकारक ठरू शकते का? एकदा पडताळायला हवं...!

Comments
Add Comment

रंगमंचीय नाट्यकलेची कृष्णकळा...

राजरंग : राज चिंचणकर श्री  कृष्ण आणि त्याचे अवतारकार्य हा कायमच औत्सुक्याचा व अभ्यासाचा विषय बनून राहिला आहे.

‘वळू’चित्रपटाने बदलली दिशा

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल पिंपरी-चिंचवडमध्ये नाटक येत नाही, त्यामुळे नाटक पाहता येत नाही, ही खंत आईने व्यक्त

प्रत्येकाचा कृष्ण...

आसावरी जोशी : मनभावन धी तू भरगच्च फुलांनी सजलेला. अगदी नखशिखांत. लालस फुलांच्या लालीने तू अधिकच निरागस दिसू

मी आणि ‘घासीराम कोतवाल’

भालचंद्र कुबल : पाचवा वेद माझा आणि घाशीराम कोतवाल या नाटकाचा पहिला संबंध आला तो राज्यनाट्य फायनलच्या प्रयोगाला.

Face Cake Smash Trend: मित्रांच्या वाढदिवसानिमित्त कधीही करू नका अशी मस्करी, जाऊ शकतो जीव, पहा हा Viral Video

Face Cake Smash Trend: आजकाल वाढदिवस म्हंटला की, प्रत्येकजण खूप मोठ्या थाटामाटात साजरा करतात, लेट नाईट पार्ट्या केल्या जातात.

राजिंदर नाथ

मराठी नाटकांना हिंदीत नेणारा रंगकर्मी भालचंद्र कुबल : पाचवा वेद गेल्या आठवड्यात अखिल भारतीय नाट्यसृष्टीतील