शिर्डीच्या ‘झिरो क्राईम सिटी’ संकल्पनेला धक्का?

बालगुन्हेगारीचे सावट गडद


शिर्डी : श्रद्धा आणि सबुरीचा जागतिक संदेश देणाऱ्या साईबाबांच्या पवित्र शिर्डी नगरीला 'झिरो क्राईम सिटी' बनविण्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठा पुढाकार घेतला आहे. त्यांच्या पुढाकारामुळे पोलीस प्रशासनानेही शहरात गस्त वाढवून, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेगारीला रोखण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र या प्रयत्नांना सध्या नव्या प्रकारच्या गुन्हेगारीचं सावट गडद करत असल्याने खऱ्या अर्थाने चिंता वाढली आहे.


शहरातील अनेक ठिकाणी आता शाळकरी वयातील मुलांमध्ये व्हाईटनर, डेंड्राईट, सुंगध द्रव्यांचे व्यसन वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. या व्यसनाच्या आहारी जाऊन ही मुले मोबाईल चोरी, दुचाकी चोरणे, घरोघरी चोरी करण्यासह विविध किरकोळ गुन्ह्यांमध्ये अडकत आहेत. यामुळे बालगुन्हेगारीचा गंभीर प्रश्न शिर्डी शहर समोर उभा ठाकला आहे.


मागील काही महिन्यांत पोलिसांच्या नोंदवलेल्या गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांची वाढलेली संख्या ही धक्कादायक आहे. पोलिसांनी काही प्रकरणांमध्ये असे कबूल केले आहे की, व्यसनाच्या आहारी गेलेल्या या मुलांना पैसे मिळवण्यासाठी चोरी, मारहाण, खंडणीसारखे प्रकार करावे लागत आहेत. विशेष म्हणजे हे सर्व प्रकार मंदिर परिसरासह बाजारपेठा,हॉटेल परिसरात होत असल्याने शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने याला मोठा धोका निर्माण झाला आहे.साई संस्थानात येणाऱ्या देशविदेशातील लाखो भाविकांच्या सुरक्षेला त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. शिर्डीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेक नागरिकांनी पोलिसांकडे या बालगुन्हेगारांच्या टोळक्यांबद्दल तक्रारी दाखल केल्या असून, याबाबत विशेष कारवाईची मागणी केली आहे.


राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत देवस्थान असलेल्या साई संस्थानच्या क्षेत्रात अशाप्रकारची स्थिती उद्भवणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असून प्रशासन, पोलीस व स्थानिक स्वराज्य संस्था यांची जबाबदारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. केवळ कायदेशीर कारवाई करून हे संकट संपणार नसून, यासाठी सामाजिक संस्था, शाळा, पालक, ग्रामस्थ यांनी देखील पुढाकार घेण्याची गरज आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे.या पार्श्वभूमीवर ना. विखे पाटील यांनी 'झिरो क्राईम सिटी'ची संकल्पना मांडून चांगली दिशा दाखवली असली, तरी या नव्या बालगुन्हेगारीचा अडथळा दूर न झाल्यास या स्वप्नाला गालबोट लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, गस्त, सुरक्षारक्षक तैनात असले तरी या बाल गुन्हेगारांच्या टोळ्या मंदिराबाहेरील परिसरात सक्रिय आहेत. त्यामुळे येणारा काळ शिर्डीसाठी कठीण ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.विशेष म्हणजे, या अल्पवयीन मुलांच्या वर्तनामागे घरातील आर्थिक संकटे, पालकांचे दुर्लक्ष व सोशल मीडियाच्या वाईट प्रभावांचा मोठा वाटा असल्याचे समाजशास्त्रज्ञांचे निरीक्षण आहे.त्यामुळे पोलीस कारवाईबरोबरच मानसिक आरोग्य शिबिरे, व्यसनमुक्ती अभियान, शाळांमध्ये जनजागृती कार्यक्रम यांची तातडीने गरज असल्याचे स्पष्ट होते.


साईभक्त, स्थानिक व्यापारी, नागरिक यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन सज्ज झाले असले तरी, या नव्या संकटाला लगाम घालण्यासाठी अधिक व्यापक धोरण आणि दीर्घकालीन उपाययोजना आखणं काळाची गरज बनली आहे. अन्यथा 'शिर्डी झिरो क्राईम सिटी' होण्याचं स्वप्न अपूर्ण राहील अशी भीती व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

शनिवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती व लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत इंदिरानगर

निवडणूक आयोगाने वाढवला निवडणुकीतील खर्चाचा 'कोटा'

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता उमेदवाराने करावयाच्या

शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात काय म्हणाले मंत्री दादाजी भुसे?

मुंबई : शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शालेय शिक्षण विभाग सकारात्मक असून त्यांच्या

शेतकरी, पशुपालकांना वीज दरात सवलत मिळणार, पण 'या' अटींवर...

मुंबई : राज्य शासनाने पशुपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता वीजदरात

धक्कादायक! एसटीचे ७ कर्मचारी दारू पिऊन ड्युटीवर!

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा कारवाईचा बडगा मुंबई : अचानक केलेल्या तपासणीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन

Tamhini Ghat Accident : 'सनरूफ' ठरला जीवघेणा! ताम्हिणी घाटात दरड कोसळून थरार, सनरुफ तोडून दगड थेट कारमध्ये पडले; महिलेचा जागीच मृत्यू!

पुणे/रायगड : पुणे-मानगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) एक अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी अपघाताची घटना