Saturday, June 21, 2025

Weather Update: कसं असेल पुढील चार आठवडे राज्याचे हवामान? घ्या जाणून

Weather Update: कसं असेल पुढील चार आठवडे राज्याचे हवामान? घ्या जाणून

मुंबई : हवामान विभागाने पुढील चार आठवड्यांतील महाराष्ट्रामधील हवामानाचा विस्तृत अंदाज जाहीर केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या ६ ते १२ जून दरम्यान पावसाला सुरुवात होणार आहे.या काळात राज्यात बहुतांश भागांमध्ये पावसाची स्थिती सामान्य राहण्याची शक्यता असून राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे .मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, तर कोकण आणि विदर्भात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.


बंगालच्या उपसागरात 12-13 जूनच्या सुमारास पावसासाठी पोषक वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे. ज्यामुळे महाराष्ट्र, मध्य भारत आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारतात जोरदार पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. खासगी हवामान संस्था स्कायमेट वेदर सर्व्हिसेसने बंगालच्या उपसागरात पावसासाठी पोषक वातावरण तयार होण्याबाबत ठाम विश्वास व्यक्त केला. स्कायमेटचे अध्यक्ष जी. पी. शर्मा म्हणाले, "10 जूनपर्यंत पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात चक्रीवादळीय स्थिती विकसित होईल, जे 48 तासांत बळकट होईल. यामुळे 11 जूनपासून आंध्र प्रदेश, तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव दिसेल. स्कायमेटने मॉन्सून पुनरुज्जीवनाचा कालावधी 12 ते 17 जून असा अंदाज वर्तवला आहे.


१९ जून पर्यंत पूर्व विदर्भ आणि कोकणचा काही भाग सोडला तर राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. या आठवड्यात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्यासाठी वातावरण अनुकूल असण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे.वायव्य भारत, पूर्व भारत, ईशान्य भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.


यानंतर २० ते २६ जून दरम्यान दक्षिण भारत आणि वायव्य भारतात पाऊस सामान्यापेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. गुजरात, ओडिशा, दक्षिण छत्तीसगड, पश्चिम मध्यप्रदेश, गुजरात आणि विदर्भ येथे सरासरीपेक्षा जास्त पाऊसाचा अंदाज आहे. चौथ्या आठवड्यात २७ जून ते ३ जुलै दरम्यान भारतातील बहुतेक भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस असण्याची शक्यता आहे. गुजरात, कर्नाटकच्या किनारपट्टीवरील प्रदेश, महाराष्ट्रमध्ये सरासरीपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.


या चार आठवड्यांच्या अंदाजानुसार कोकण वगळता इतर भागात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीत कोकणात पावसाचा फारसा जोर नसेल. मात्र, इतर भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यानुसार ठाणे, रायगड, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, गडचिरोली जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे.


दरम्यान, मोसमी वारे मंदावलेलेच नैऋत्य मोसमी वाऱ्यांची वाटचाल आठवडाभरापासून मंदावली आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा ते पश्चिम बंगालपर्यंत मोसमी वारे दाखल झाल्यानंतर त्यांनी प्रगती केलेली नाही. अरबी समुद्रातून २६ मेपासून, तर बंगालच्या उपसागरातून २९ मेपासून मोसमी वारे पुढे सरकलेले नाही. मुंबई, अहिल्यानगर, अदिलाबाद, पूरी आणि पूर्व भारतातील बालूरघाटपर्यंत मोसमी वाऱ्यांची सीमा गुरूवारीही कायम होती. मोसमी वारे अजूनही कमजोर असल्याने मोसमी पावसाच्या पुढील वाटचालीसाठी वाट पहावी लागणार आहे.

Comments
Add Comment