Wednesday, September 10, 2025

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताकडून पाकिस्तानच्या २८ ठिकाणांवर हल्ले

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताकडून पाकिस्तानच्या २८ ठिकाणांवर हल्ले

भारताने केलेल्या कारवाईची पाक दस्ताऐवजांमधूनच माहिती उघड

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे नेमकेपणाने उद्ध्वस्त करत जगभरात आपली लष्करी ताकद दाखवून दिली आहे. प्रारंभी भारताकडून केवळ दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले असले, तरी पाकिस्तानकडून भारतीय लष्करी तळांवर हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानंतर भारताने तितक्याच तीव्रतेने प्रत्युत्तर दिले. यावेळी पाकिस्तानने आपली हानी झाली नसल्याचा दावा केला होता. मात्र आता त्यांच्या स्वतःच्या दस्तऐवजांमधूनच भारताने केलेल्या कारवाईची माहिती उघड झाली आहे. पाकिस्तानच्या ऑपरेशन बन्यान अन मार्कोसवरील कागदपत्रात असे म्हटले आहे की, भारताने नमूद केलेल्या तळांपेक्षा 8 अधिक तळांवर हल्ला करण्यात आला. गेल्या महिन्यात झालेल्या हवाई हल्ल्यानंतर पत्रकार परिषदेत भारतीय हवाई दलाने या ठिकाणांची नावे घेतली नाहीत. म्हणजेच भारताने २० नव्हे तर २८ ठिकाणी हल्ले केले होते. पाकिस्तानच्या कागदपत्रात हे देखील नमूद करण्यात आले आहे की, भारताने या हल्ल्यांमध्ये लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर केला होता. यामुळेच पाकिस्तानच्या संरक्षण यंत्रणांमध्ये एकच खळबळ उडाली होती. हे क्षेपणास्त्र टप्प्यातील लक्ष्यांवर अत्यंत अचूकपणे घाव घालू शकतात, हे या कारवाईतून स्पष्ट झाले.

दरम्यान, या आधी प्रसिद्ध झालेल्या मॅक्सार टेक्नॉलॉजीजच्या उपग्रह छायाचित्रांमध्ये ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने केलेल्या अचूक हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानीचे स्पष्ट चित्र समोर आले होते. त्यानुसार जैश-ए-मोहम्मदच्या बहावलपूर येथील मुख्यालयावर आणि लष्कर-ए-तैयबाच्या मुरीदके येथील प्रशिक्षण केंद्रावर हल्ले करण्यात आले होते. याशिवाय पीओकेमधील मुझफ्फराबाद, कोटली, रावलकोट, चकस्वरी, भिंबर, नीलम व्हॅली, झेलम आणि चकवाल येथेही भारताने लक्ष्य केले होते.

पाकिस्तानकडून ‘या’ अतिरिक्त ८ ठिकाणी हल्ला झाल्याची कबुली

पेशावर, झांग, हैदराबाद (सिंध), गुजरात (पंजाब प्रांत), गुजरांवाला, बहावलनगर, अटक, छोर

नुकसानीमुळे पाकिस्तानने स्विकारला युद्धबंदीचा पर्याय

७ मे रोजीच्या हल्ल्यांनंतर भारताने स्पष्ट केले होते की, त्यांनी केवळ दहशतवादी अड्ड्यांनाच लक्ष्य केले. मात्र पाकिस्तानने यानंतर भारतीय पश्चिम सीमेवर निवासी क्षेत्रे आणि लष्करी तळांवर ड्रोन व क्षेपणास्त्रांनी हल्ले केले. याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानातील ११ लष्करी हवाई तळांवर हल्ले केले. यामध्ये नूर खान, रफीकी, मुरीद, सुक्कुर, सियालकोट, पसरूर, चुनियान, सरगोधा, स्कारू, भोलारी आणि जेकबाबाद यांचा समावेश होता. या तीव्र कारवाईमुळे पाकिस्तानला मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले आणि अखेर युद्धबंदी करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. त्यामुळे तीन दिवसांपासून सुरू असलेला तणाव संपुष्टात आला होता.

Comments
Add Comment