भगवान जगन्नाथाच्या रथाला सुखोई लढाऊ विमानाचे चार टायर बसवण्याचा निर्णय झाला आहे. यामुळे रथ ओढणे सोपे होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. सुखोई विमानाचे टायर तयार करणाऱ्या कंपनीला रथासाठी टायर हवे आहेत हे कळले तेव्हा सुरुवातीला काहीच समजले नव्हते. आयोजकांनी व्यवस्थित समजावून सांगितल्यानंतर कंपनीने रथासाठी चार टायर देण्याची तयारी दाखवली. यानंतर रितसर करार करुन चार टायर रथासाठी घेण्यात आले आहेत. सध्या रथाला टायर बसवण्याचे काम सुरू आहे.
भगवान जगन्नाथाच्या रथाला सुखोई लढाऊ विमानाचे टायर हा परंपरा आणि आधुनिकता यांचा सुरेख संगम आहे. जेव्हा सुखोई विमानाचे टायर बसवलेला भगवान जगन्नाथाचा रथ उत्सवात सहभागी होईल तेव्हा हा सोहळा बघण्यासाठी अलोट गर्दी होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. भाविकांसाठी हा एक नवा आणि आनंददायी असा अनुभव असेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.