सेवाव्रती डॉक्टर

अंजली गांगल


महिलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या, हजारो महिलांना आरोग्यदायक सकारात्मक दृष्टिकोन देऊन नैराश्याच्या गर्तेतून बाहेर काढत आशेचे सोनेरी किरण दाखवणाऱ्या, एक उत्कृष्ट ऑक्युपेशनल थेरपिस्ट, फिजिओथेरपिस्ट आणि योग तज्ञ, समाजकार्यासाठी अविरत वाहून घेतलेल्या “सेवाव्रती” डॉक्टर अंजली शरद गांगल यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
उत्तम नेतृत्व गुण, निर्भिडता, स्पष्टवक्तेपणा, जबाबदारी या सगळ्या संस्काराचे बाळकडू घरातूनच मिळालेल्या अंजलीताईंनी मेडिकल क्षेत्रातच करिअर करण्याचा निर्णय घेतला. शाळेत असताना अभ्यासासोबत बॅडमिंटन आणि चित्रकला यात देखील त्यांनी त्यांची चुणूक दाखवली. गिरगावातील शाळेतच बेस्ट स्टुडन्ट ऑफ स्कूल हा पुरस्कार स्वीकारताना त्यांच्या मनात योग साधनेचे बीज रोवले गेले.


योग थेरपीमध्ये मुंबई विद्यापीठातून प्रगत डिप्लोमा, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक येथून M.A. (योगशास्त्र)ची पदवी देखील संपादन केली.
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होताच सामाजिक कार्यातील उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांचे लग्न सामाजिक कार्याचे व दानाचे महत्त्व जाणणारे, उच्च विद्याविभूषित ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंट मधील तज्ज्ञ शरद गांगल (आत्ता ठाणे जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत) यांच्याशी झाले. लग्नानंतर त्यांच्या शैक्षणिक प्रगतीत आणि सामाजिक कार्याच्या वाटचालीत मुलांच्या संगोपनात शरदजींसोबतच मोठे दीर, जाऊ, सासू-सासरे एकत्र कुटुंब पद्धती या सगळ्या सपोर्ट सिस्टीमने महत्त्वाची भूमिका बजावली.


पाश्चिमात्य देशांकडून आलेलं आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञान आणि पौर्वात्य म्हणजे भारतातील योग-अध्यात्म हे भारतीय समाजाच्या उद्धारासाठी एकत्रित आचरणात आणले पाहिजेत, हा विवेकानंदांचा विचार हृदयात खोलवर रुजला. त्यातूनच रुग्णांसाठी फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी आणि योग थेरपी या तीनही शास्त्रांचा एकत्रित वापर करून समग्र उपचार पद्धतीचा अवलंब रुग्णांसाठी केला. त्याचा रुग्णांना सांधेदुखीच्या उपचारांमध्ये अतिशय उपयोग झाला. त्यांचे सर्वात मोठे कार्य हे ठाण्यातील महिलांसाठी एकत्रित योग आणि फिजिओथेरपीचे विशेष वर्ग आयोजित करण्याचे आहे.


गेली १५ वर्षे, डॉ. अंजली ताईंनी ३५०० हून अधिक महिलांना योग व फिजिओथेरपीच्या सहकार्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सात वर्षे सक्रिय कार्यकर्ता म्हणून कार्य केले. १९८३ ते १९८६ पर्यंत त्यांनी कोल्हापूर येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून कार्य केले. २००३ पासून, ठाणे येथील घंटाळी मित्र मंडळात त्यांनी योग विभागात स्वयंसेवी सेवेस प्रारंभ केला.


तरुण वयातच अभाविपमध्ये काम करताना मनामध्ये रुजलेला सामाजिक बांधिलकीचा वारसा आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जपत असताना, दहा वर्षे त्यांनी तळागाळातील गरजू विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या सेवा सहयोग फाऊंडेशन या संस्थेच्या कार्यास स्वतःला वाहून घेतले. या संस्थेमार्फत आर्थिकदृष्ट्या वंचित असलेल्या वस्त्यांमध्ये वाढणाऱ्या मुलांना हसत खेळत शिक्षण देण्यासाठी अभ्यासिका चालवणे, त्यांना शिक्षण उपयोगी सामुग्री उपलब्ध करून देण्याचे कार्य केले.


आजच्या घडीला ठाण्यातील तीन पेट्रोल पंप येथील विद्या भवन वसतिगृहातील ५० मुलांच्या आवश्यक त्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आणि अभिनव क्रियाशीलतेतून त्यांना समाजात आत्मविश्वासाने उभे करण्यास सहाय्यभूत होण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. पर्यावरण संरक्षणासाठी खत निर्मितीचे मशीन स्वतःच्या कॉम्प्लेक्समध्ये घेण्याबाबत पुढाकार घेऊन खत निर्मिती केली.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघात त्या महिला समन्वयक अशी जबाबदारी पार पाडत आहेत. याच स्वयंसेवक संघाकडून प्रसिद्धी निष्काम कर्मयोग या कार्यपद्धतीचे संस्कार झालेल्या अंजलीताईंना आपण करत असलेल्या कार्याची कुठेही वाच्यता न करता, प्रसिद्धी माध्यमांपासून दूर राहून सेवाभाव जपण्यासाठी त्या कायम प्रयत्नशील असतात. त्यांची ही मुलाखत देखील खूप विनंती केल्यानंतर त्यांनी दिली आहे. पुरस्कारांविषयी त्यांच्याशी चर्चा करताना सन्मानित पुरस्कारांसाठी त्यांचा बायोडेटा मागवलेला असताना त्यांनी विनम्रपणे दुसऱ्यांचे नाव सुचवून आणि स्वतःचे नाव त्या पुरस्कारांच्या यादीतून बाहेर काढले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनेक महिला धडपडत असतात त्याच महिलांचा या पुरस्कारांवर खरा अधिकार असतो असं त्या प्रांजळपणे म्हणतात.


अल्पशिक्षित असूनही आदर्शवत जीवन जगणारे आई-वडील, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संस्थापक कै. यशवंतराव केळकर, घंटाळी मित्र मंडळाचे कै. गुरुवर्य अण्णा व्यवहारे, तिसरी म्हणजे कर्मसंन्यास दीक्षा देणारे बिहार योग विद्यालयाचे स्वामी निरंजनानंद सरस्वती, आजच्या जीवनातही चालते बोलते संत म्हणून डॉ. श्रीराम आगाशे यांसारखे गुरू जीवनात लाभणं यात मी स्वतःला भाग्यवान समजते. यातूनच त्यांचा गुरूंप्रीत्यर्थ असणारा सविनय आदर समजतो.समाजकार्याचे हे संस्कार त्यांचा मुलगा कुणाल आणि मुलगी श्रुती या दोघांमध्ये आपसूकच रुजले आहेत स्वतःच्या पगारातील काही भाग समाजासाठी देत गांगल घरातील सेवाभावी वृत्तीने दान करण्याचा वारसा दोघांनीही जपला आहे.


कोणत्याही सामाजिक कार्याची सुरुवात ही स्वतःपासूनच केली पाहिजे असं अंजलीताई आवर्जून सांगतात. अहंकाराचा स्पर्श न होता आपल्याकडे उपलब्ध असलेला वेळ, शारीरिक शक्ती, वस्तू, कला, संपत्ती, ज्ञान हे सहजतेने ज्यांना हवे त्यांना उपलब्ध करून देणे म्हणजे समाजसेवा. आणि समाजसेवेचे फलित काय? तर रोज समाधानाने अत्यंत शांत झोप लागून जीवन आनंदी बनते. हाच त्यांच्या निरोगी जीवनाचा फंडा.


डॉ. अंजलीताई यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान हे समस्त महिलांसाठी प्रेरणा देणारे आहे. अशा सातत्याने नवनवीन माणसं जोडण्याची कला अवगत असणाऱ्या, संवादातून उत्तम समन्वय साधणाऱ्या, अत्यंत विनम्रतेने त्यांच्या उत्तम निरीक्षण शक्तीने इतरांतील गुण अचूक हेरणाऱ्या, समाजकार्यात कायम अग्रेसर असणाऱ्या या कर्मयोगीनीचे हे कार्य असेच अखंड अविरत चालू राहो व त्यांच्या या कार्याचा वटवृक्ष असाच दिवसागणिक बहरत राहो या सदिच्छेसह खूप शुभेच्छा.
Vaishu.gaikwad78@gmail.com

Comments
Add Comment

Majhi Kanya Bhagyashree Yojana : ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेचे फायदे ऐकूनही तुम्ही चकीत व्हाल

Majhi Kanya Bhagyashree Yojana : राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या जन्मदरात वाढ करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून

Ramai Awas Yojana : घर बांधायला पैसे नाहीत ? मग काळजी कशाला ? 'रमाई आवास' घरकुल योजना आहे ना !

Ramai Awas Yojana : राज्य सरकारने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ‘रमाई आवास (घरकुल) गृहनिर्माण योजना’ सुरू केली

Luck : चंगळता !

आमचे एक स्नेही आहेत. अगदी खेड्यात बालपण गेलेले असताना स्वकर्तृत्वाने शिक्षण घेतले, शिष्यवृत्त्यांवर शिकून

Lazy Pallu : उन्हाळ्यात वाढली ‘लेझी पल्लू’ची क्रेझ

एकेकाळी साडीचा पदर अगदी चापून-चोपून, नीट प्लेट्स घालून पिनअप करणं हीच एलिगंट फॅशन मानली जायची. पण बदलत्या

Kajuli biswas : संघर्ष आणि नि:स्वार्थ सेवेची कहाणी : काजुली विश्वास

पश्चिम बंगालच्या काजुली विश्वास यांनी गरिबी, उपासमार, बेघरपणा आणि आपल्याच लोकांची उपेक्षा सहन केली, पण या

Abhilasha Barak : मेजर अभिलाषा बराक यांना 'मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर' पुरस्कार

भारतीय लष्करातील धडाडीच्या महिला अधिकारी मेजर अभिलाषा बराक यांनी आपल्या कर्तृत्वाने जागतिक पातळीवर देशाचे नाव