बहिरंगांपेक्षा अंतरंग सुधारा

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर


रूप लावण्य अभ्यासिता नये |
सहजगुणासी न चले उपाये |
काहीतरी धरावी सोये |
अगांतुक गुणाची |


या ओवीत समर्थांनी “सहजगुण” आणि “अगांतुक” गुण असे दोन शब्द वापरले आहेत. जन्मत:च माणसाला जे प्राप्त होते त्याला समर्थ सहजगुण म्हणतात. उदा. गोरा असणे किंवा काळा असणे, उंच असणे किंवा बुटका असणे, दिसायला सुंदर असणे किंवा दिसायला सामान्य असणे हे सहज गुण आहेत. यात बदल घडवून आणणे माणसाला फारसे शक्य नाही. एखादा काळ्या रंगाचा मनुष्य रोज ब्युटी पार्लरमध्ये गेला तरी काही होणार नाही. म्हणून माणसाने व्यवहारात चार लोकांत वावरताना बहिरंग नीटनेटके ठेवावे पण ते फार सजवण्याच्या भानगडीत पडू नये.


समर्थ अगांतुक गुणाला महत्त्व देतात. अगांतुक गुण याचा अर्थ प्रयत्नांच्या सहाय्याने माणसाने संपादन केलेले उत्तम गुण किंवा उत्तम कला होय.


अब्राहम लिंकन दिसायला कुरूप होते, पण आपल्या सद्गुणांच्या सहाय्याने ते एक दिवस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. यशवंतराव चव्हाण अत्यंत गरीब कुटुंबात जन्मले होते; परंतु प्रयत्नांच्या सहाय्याने ते एक दिवस भारताचे उपपंतप्रधान झाले. सहज गुणाच्या अभावाने माणसात निर्माण झालेले व्यंग अगांतुक गुणाच्या प्रभावाने दूर करता येते. माणसाने तासनतास आरशासमोर बसून आपला चेहरा सुधारण्यापेक्षा तासनतास ग्रंथालयात बसून आपले अंतरंग सुधारावे.


शिक्षणानंतर नोकरी मिळताना आपले बहिरंग कामी येणार नाही कारण त्यासाठी गुणवत्ता (Qualification) सर्वात महत्त्वाची मानली जाते. मनुष्याची पारख / परीक्षा त्याच्यावरून दिसण्यात, सहवासात किंवा वागण्यात होत नसते. जसे सोने दिसण्यात, हातात घेतल्यास जवळ ठेवल्यास त्याची पारख होत नसून, काशावर घासताना सोन्याचा गुणधर्म कळतो. बहिरंगापेक्षा अंतरंग सुधारा. सहज गुण व अगांतुक गुण यातील फरक लक्षात घ्यायला हवा. ‘खोटे वरचे लक्षण, हवी अंतरीची खूण’ समोरच्या व्यक्तीची पारख त्याच्या वरच्या गुणांवरून करू नये.


आजच्या झगमगत्या जगात आपण बाह्य सौंदर्याकडे, म्हणजेच बहिरंगाकडे, अधिक झुकतो आहोत. व्यक्तीचा चेहरा कसा दिसतो, कपडे कोणते आहेत, सोशल मीडियावर कशी इमेज आहे. या गोष्टींनाच जास्त महत्त्व दिलं जातं. पण खऱ्या अर्थाने माणसाचे मूल्य त्याच्या अंतरंगातून ठरते. म्हणजेच त्याच्या विचारांतून, आचारांतून आणि चारित्र्यातून.


बहिरंग म्हणजे माणसाचा बाह्य आविष्कार-रूप, वेशभूषा, संपत्ती, पद, प्रसिद्धी वगैरे, तर अंतरंग म्हणजे त्याचे मन, संवेदना, मूल्य आणि आत्मिक समृद्धी. एक देखणा माणूस जर दांभिक, खोटारडा आणि स्वार्थी असेल, तर त्याचं सौंदर्य फक्त डोळ्यांना भुरळ घालेल; पण मनाला नाही. दुसरीकडे, एक साधा-सरळ माणूस जर नम्र, प्रामाणिक आणि सहृदय असेल, तर तो कायम मनात घर करतो.


आज अनेक लोक फिटनेससाठी, फॅशनसाठी आणि छायाचित्रांसाठी तासन्‌तास वेळ घालवतात, पण आत्मपरीक्षण, सद्विचार आणि आत्मिक विकासासाठी वेळ देत नाहीत. हीच खरी शोकांतिका आहे.


अंतरंग सुधारल्यावर माणूस दुसऱ्यांशी नीट वागतो, सहकार्य करतो, सहानुभूती दाखवतो. समाजात समृद्धी, शांती आणि सुसंवाद निर्माण होतो. बाह्य सौंदर्य नाहीसे होऊ शकते, पण अंतःकरणातील सौंदर्य हे चिरंतन टिकते.


संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, स्वामी विवेकानंद यांचं व्यक्तिमत्त्व आपण पाहिलं, तर ते त्यांच्या वेशभूषेने नव्हे, तर त्यांच्या अंतरीच्या तेजाने, विचारांनी आणि कार्याने प्रभाव टाकतात. म्हणूनच, आपला खरा विकास करायचा असेल, तर फक्त आरशात दिसणाऱ्या चेहऱ्यावर लक्ष केंद्रित करू नका, तर अंतर्मनात डोकावून बघा. कारण बहिरंग क्षणिक असते, पण अंतरंग शाश्वत.


“शरीर सुंदर असणं ही एक गोष्ट आहे, पण मन सुंदर असणं ही जीवनाची गरज आहे.”

Comments
Add Comment

कोणासाठी...?

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ आज दुपारी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आणि माझी मैत्रीण रजनी मुलुंडला

माणूस बदलू शकतो

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर माणूस हा विचार, भावना आणि कृती असलेला संवेदनशील प्राणी आहे. परिस्थिती,

स्ट्रॉ ने पेय कशी पितात?

कथा : प्रा. देवबा पाटील त्या दिवशीही सीता व निता या दोघी बहिणींनी शाळेतून घरी येताबरोबर आपला अभ्यास करून घेतला. नि

बाळाचा हट्ट!

कथा : रमेश तांबे एक होती मांजर आणि तिला होतं एक बाळ! पांढऱ्याशुभ्र रंगाचं, घाऱ्या घाऱ्या डोळ्यांचं! ते खूप खेळायचं,

प्रयत्नवादाला स्वीकारा

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर केल्याने होत आहे रे।  आधी केलेची पाहिजे।

विष

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ ‘विष’ हा विषय? बापरे! आजच्या विषयाचे नाव बघून थोडसे घाबरायलाच होतंय ना? पण कोणते