
मुंबई : मुंबईच्या नालासोपारातील प्रगतिनगर परिसरातून तुळींज पोलिसांनी मेफेड्रोन ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. कारखाना चालविणाऱ्या नायजेरियन महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून घटनास्थळावरून पोलिसांनी ५ कोटी ६० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामुळे नालासोपाऱ्यात ड्रग्ज विक्रीच नाही तर मोठ्या प्रमाणात ड्रग तयारही होत असल्याचे समोर आले. एका इमारतीमध्ये घरात हा कारखाना सापडल्याने पोलिसांनी कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा पूर्वेकडील प्रगतिनगर परिसरातील अंशित प्लाझा या इमारतीच्या रूम नं. ४०५ येथे पोलिसांनी छापा टाकला असता पोलिसांना घरात ड्रग्जचा कारखाना सुरू असल्याचे आढळले. यावेळी आरोपी नायजेरियन महिला रिटा कुरेबेवाई (वय २६) हिला पोलिसांनी अटक केली.
तिच्या घरातून मेफेड्रोन ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल, ड्रग्ज बनवण्याचे साहित्य असा एकूण ५ कोटी ६० लाख ४० हजार १५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पोलिस पथकाने ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त केला. याप्रकरणातील एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. आरोपी महिलेकडे भारतात वास्तव्य करण्यासाठी आवश्यक असलेला व्हिसा आढळलेला नाही. त्यामुळे स्थानिक पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पोलिस आयुक्तालयामधील नालासोपारा परिसरात नायजेरियन नागरिकांची संख्या मोठी आहे.