देह हा परमार्थाचे साधन समजावा

अध्यात्म : ब्रह्मचैतन्य : श्री गोंदवलेकर महाराज


संतांचे काम तुम्हाला देहबुद्धीपासून सोडविणे हे आहे; तुम्हाला मुलगा देणे, तुमचे दुखणे बरे करणे. म्हणजे विषय देणे, हे नव्हे. जो जो परमार्थाला लागावे तो तो देहबुद्धी तिथून ओढण्याचा जास्त जास्त प्रयत्न करते. विद्येची बुद्धी ही देहबुद्धीला धरून आहे; ती मारून आपण शुद्ध केली पाहिजे. याकरिता भगवंताच्या स्मरणासारखा दुसरा उपाय नाही. कुत्रा हा आपल्याला रात्रीच्या पहाऱ्यासाठी उपयोगी पडतो. पण तो कितीही चांगला आणि उपयोगी असला, तरी आपण त्याला पानात जेवायला घेऊन बसत नाही. त्याप्रमाणे देहाचेही आहे. आतल्या खोबऱ्याच्या रक्षणाकरिता ज्याप्रमाणे करवंटी, त्याप्रमाणे देहाला परमार्थाकरिता साधन मानावे. पण मनुष्य ‘हा देहच मी आहे ’, असे मानून व्यवहार करतो. वास्तविक, आपण देहापासून निराळे आहोत असे पदोपदी दाखवीत असतो; माझा हात, माझा पाय, माझा डोळा, माझे मन फार काय, माझा जीव असेही म्हणतो; पण वागतो मात्र ‘मी तोच आहे’ असे समजून. देहाशी संबंध जास्त येईल असेच आपण भगवंताजवळ मागतो; असे न करावे. आपल्या देहावरचे प्रेम कमी होण्यासाठी, दुसऱ्यावर प्रेम करायला लागावे. प्रेम बसायला आपल्याला आपल्यासारखाच देहधारी लागतो. कुत्रे रडत असले तरी आपल्याला नाही वाईट वाटत; पण एखादे लहान मूल रडत असले तर वाईट वाटते. देवावर प्रेम करायला, देवाला आपल्यासारखाच देहधारी कल्पावा लागतो. म्हणून, आपले देहावरचे प्रेम कमी व्हायला, देहबुद्धी कमी व्हायला, सगुणमूर्तीचे, सद्‌गुरूचे ध्यान करावे लागते. ते जसजसे दृढ होत जाईल, तसतसे आपण स्वत:ला विसरून जातो आणि आपण देहाच्या पलीकडे गेलो, म्हणजे सद्‌गुरूचे खरे स्वरूप हे देहातीत आहे असे प्रत्ययाला येते. देहबुद्धी नष्ट होईल तसतशी सद्‌गुरूची खरी ओळख होईल. ज्याने देहाभिमान नष्ट केला त्याचा मोठा ज्ञानीसुद्धा हेवा करतो. ‘मी देह’ म्हणावे, यापलीकडे दुसरे अज्ञान कोणतेही नाही. मी भगवंताचा असून देहाचा म्हणणे यासारखे दुसरे खोटे नाही. प्रपंचात संकटे येतात, तरी पण तो सोडावासा वाटत नाही; याहून भगवंताची माया ती कोणती? अतिसहवासामुळे देहाचे ममत्व सुटत नाही. परमात्म्याचा सहवास, उदाहरणार्थ, देवाला जाण्याचा वा जप करण्याचा नेम केला, म्हणजे देहाचे ममत्व थोडे थोडे कमी होते. देहाच्या सहवासाने आपण देहाचे होतो, नामाच्या सहवासाने आपण परमात्म्याचे होऊ.
तात्पर्य : भगवंताच्या स्मरणामध्ये देहबुद्धीचे मरण आहे.

Comments
Add Comment

Hanuman Jayanti 2026 Wishes : हनुमान जयंतीनिमित्त आपल्या प्रियजनांना पाठवा हे भक्तिपर संदेश

मुंबई : हनुमान यांची जयंती म्हणजे भक्ती, शक्ती आणि सकारात्मक ऊर्जेचा उत्सव. या पवित्र दिवशी अनेकजण उपवास, पूजा आणि

Hanuman Jayanti 2026 जाणून घ्या केव्हा आहे हनुमान जयंती; शुभ मुहूर्त, तिथी आणि पूजेच महत्व

मुंबई : अंजनीपुत्र आणि पवनपुत्र या नावाने ओळखल्या जाणाऱ्या हनुमानाची जयंती चैत्र पौर्णिमेला साजरी केली जाते.

Ujjain Mahakaleshwar : महाकालच्या भक्तांसाठी खुशखबर ! आता घरबसल्या घ्या भस्म आरतीचं दर्शन

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उज्जैनच्या श्री महाकालेश्वराच्या दर्शनानं आपल्या आयुष्यातील संकटे आणि

जाणून घ्या चैत्र नवरात्रीत देवीची पूजा, विधी कसे करावेत ? आणि कोणत्या गोष्टी असतात लाभदायक

मुंबई : गुढीपाडवा हा हिंदू पंचांगातील महत्वाचा सण आहे. या सणापासून चैत्र महिन्याला सुरुवात होते. आणि गुडीपाडवा या

एकादशीच्या दिवशी 'या' गोष्टी केल्यास भगवान विष्णू होतील प्रसन्न !

धार्मिक मान्यतेनुसार हिंदू धर्मात एकादशी व्रताचे विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार या दिवशी मनोभावे पूजा

गुढीपाडवा का साजरा केला जातो? जाणून घ्या गुढीपाडव्याचे महत्त्व, पूजा विधी आणि परंपरा

मुंबई : महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. साडेतीन