मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये (Mumbai Metro) मेट्रो-३ फेज २ ए (metro 3-phase 2 A) या मार्गावरील अनेक स्थानकांचे फोटो आणि व्हिडीओदेखील समोर आले आहेत. आता लवकरच शहरातील सार्वजनिक वाहतूक पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. मुंबई मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्यातील भूमिगत मेट्रो लाईन, ज्याला अॅक्वा लाईन म्हणूनही ओळखले जाते, लवकरच सुरू होणार आहे. ही सुविधा वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) ते वरळी येथील आचार्य अत्रे चौकाला जोडणारी आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनीही यास दुजोरा दिला. भिडे यांनी नमूद केले की, हा प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचला आहे आणि मेट्रो रेल सेफ्टी कमिशनर (सीएमआरएस) कडून मंजुरीची वाट पाहत आहे, जी पुढील दोन दिवसांत अपेक्षित आहे.
एकदा प्रमाणित झाल्यानंतर, मुंबई मेट्रो-३ (Mumbai metro 3) चा दुसरा टप्पा सुरु होईल. साधारण ६० किलोमीटरचा मेट्रो मार्ग आधीच कार्यरत असल्याने, मुंबईतील मेट्रो लवकरच मुंबई महानगर प्रदेशात ३७४ किलोमीटरपर्यंत वाढेल, असे त्या म्हणाल्या. सर्व नियोजित कॉरिडॉर सुरू झाल्यानंतर, दररोज सुमारे एक कोटी प्रवाशांना याचा फायदा होईल. या मार्गाच्या उद्घाटनाची अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली तरी, १ मे रोजी महाराष्ट्र दिनी किंवा २ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान हे उद्घाटन होऊ शकते अशी शक्यता आहे. या वर्षाच्या सुरुवातीला सुरू झालेल्या मेट्रो लाईन- ३ च्या पहिल्या टप्प्यात १० स्थानके आहेत. या मेट्रोच्या सकाळी साडेसहा ते रात्री साडेदहापर्यंत दररोज ९६ फेऱ्या होतात.
आरे ते बीकेसी दरम्यानचा प्रवासाचा वेळ रस्त्याने एका तासापेक्षा जास्त असून, मेट्रोने तो फक्त ३० मिनिटांत पूर्ण होतो. या मार्गावरील तिकिटांचे दर १० ते ५० रुपयांच्या दरम्यान आहेत. फेज २ ए नंतर, फेज २ बी (वरळी ते कफ परेड) जुलै २०२५ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. मुंबई मेट्रो-३ लाईन पूर्ण झाल्यावर, ३३.५ किमी लांबीचा हा भूमिगत कॉरिडॉर सहा प्रमुख व्यवसाय केंद्रे, ३० प्रमुख कार्यालय क्षेत्रे, १२ शैक्षणिक संस्था, ११ रुग्णालये, १० प्रमुख वाहतूक बिंदू आणि २५ सांस्कृतिक आणि मनोरंजन स्थळांना जोडेल. यासह ही लाईन देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल्सपर्यंत थेट प्रवेश प्रदान करेल. भूमिगत स्थानकांमध्ये मोबाइल कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करण्यासाठी एअरटेल, जिओ, व्होडाफोन आणि एमटीएनएल यांच्या सहकार्याने अँटेना आणि रिपीटर्स बसवले जात आहेत.
चेन्नई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्स…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी ८.३० पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा…
पावसाळा आता जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला आहे. पावसाळी हंगामास दरवर्षी कागदोपत्री १ जूनला सुरुवात होत…
मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही…
रवींद्र तांबे ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे…
मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…