पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार!

Share

राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती

नवी दिल्ली : मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे. देशातील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी संरक्षण प्रमुख आणि तीनही दलाचे प्रमुख तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत एक महत्वपूर्ण बैठक घेतली. (Rajnath Singh’s high-level meeting in Delhi)

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी पहलगाम आणि संपूर्ण जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीची माहिती संरक्षणमंत्र्यांना दिली. सुरक्षा दलांना सतर्क करण्यात आले असून दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

पंतप्रधान मोदींच्या विमानाने टाळला पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर

जम्मू-काश्मीरमधील पहलगामजवळ काल पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यादरम्यान सौदी अरेबियाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा दौरा रद्द करत तातडीने मायदेशी परतले होते. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी जेद्दाहहून नवी दिल्लीला परतत असताना त्यांच्या विमानाने पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर टाळल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानाने मंगळवारी रात्री उशिरा सौदी अरेबियाहून उड्डाण केले, तेव्हा त्यांच्या विमानाने पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून उड्डाण टाळले. फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइटवरील माहितीनुसार पंतप्रधान मोदींचे भारतीय हवाई दलाचे बोईंग ७७७-३०० विमान मंगळवारी सकाळी रियाधला उड्डाण करताना पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून गेले होते, परंतु परत येताना या विमानाने मोठा वळसा घेत पाकिस्तानची हवाई हद्द टाळली. सौदी अरेबियाहून परतताना पंतप्रधानांच्या विमानाने अरबी समुद्रावरून थेट उड्डाण केले आणि नंतर भारतीय द्वीपकल्प ओलांडत गुजरातमार्गे भारतात प्रवेश केला आणि नंतर दिल्लीला परतले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परतीच्या प्रवासाचा मार्ग बदलण्यामागे पाकिस्तानकडून येणाऱ्या धोक्याची शक्यता होती. पंतप्रधान आणि त्यांच्या शिष्टमंडळाच्या सुरक्षेसाठी सुरक्षा यंत्रणांनी पंतप्रधान मायदेशी येताना त्यांच्या विमानाचा मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान मोदी बुधवारी सकाळीच दिल्लीतील पालम हवाई दल तळावर उतरले, त्यानंतर त्यांनी तातडीने परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांच्याशी बैठक घेतली

‘दहशतवादी हल्ल्याशी आमचा संबंध नाही’

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. भारतात नागालँडपासून काश्मीरपर्यंत, छत्तीसगड, मणिपूर आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये बंड होत आहे. हा हल्ला म्हणजे भाराताच्या देशातंर्गत व्यापक बंडाचा भाग आहे. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यामागे परकीय हात नाही तर स्थानिक उठाव आहे, असा जावईशोध पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी लावला. पाकिस्तान कोणत्याही परिस्थितीत दहशतवादाला विरोध करतो. भारतातील विविध राज्यांमध्ये दिल्लीत सरकारविरुद्ध बंड सुरू आहे. काही ठिकाणी सैन्य आणि पोलिस अत्याचार करत आहेत, त्यामुळे स्थानिक लोकांमध्ये नाराजी आहे. स्थानिक लोक त्यांचे हक्क मागत आहेत. मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध या अल्पसंख्याकांचे शोषण करणाऱ्या हिंदूत्ववादी सरकारविरुद्ध बंड सुरू आहे. तिथे जे काही घडत आहे. आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. आम्ही कोणत्याही परिस्थितीत कुठेही दहशतवादाचे समर्थन करत नाही. ते पाकिस्तानमधील एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. विशेष म्हणजे भारताने या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात आहे असे अधिकृतरित्या म्हटले नसताना पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी भारताविरोधात गरळ ओकली आहे.

मृतांना राज्य सरकारकडून पाच लाखांची आर्थिक मदत

दहशतवाद्यांच्या बेछूट गोळीबारात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. तर जखमी पर्यटकांपैकी चार जण महाराष्ट्रातील रहिवासी आहेत. मृत पर्यटकांच्या कुटुबींयांना व जखमींना राज्य सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या सहा जणांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये, तर जखमींना ५०,००० रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच श्रीनगरसह काश्मीरच्या वेगवेगळ्या भागात अडकलेल्या पर्यटकांना विशेष विमानाने महाराष्ट्रात आणले जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले आहे.

सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

जम्मू- काश्मिरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी एक जनहित याचिका दाखल करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयातील वकील विशाल तिवारी यांनी दाखल केलेल्या याचिकेत केंद्रीय गृह मंत्रालय आणि राज्यांना डोंगराळ प्रदेशात आणि दुर्गम ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा उपाययोजना करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे. पर्यटक मोठ्या संख्येने जमतात अशा ठिकाणी सशस्त्र दल तैनात करण्याचे निर्देश देण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. याचिकाकर्त्याने काश्मीरमधील अमरनाथ यात्रेची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी निर्देश देण्याची मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयात दोन मिनिटे मौन बाळगून मृतांना श्रद्धांजली वाहिली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांना सर्वोच्च न्यायालयात दोन मिनिटांचे मौन बाळगून श्रद्धांजली वाहण्यात आली. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश, वकील आणि सर्व कर्मचाऱ्यांनी मौन बाळगले.

हल्ल्याच्या कनेक्शनबाबत सीमेपलिकडील संबंधाचे पुरावे

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे डिजिटल पुरावे पाकिस्तानशी जोडलेले असल्याचे दिसून येत आहे. भारतीय गुप्तचर संस्थांनी म्हटले आहे की हल्ल्यातील संशयित दहशतवाद्यांचे डिजिटल फुटप्रिंट मुझफ्फराबाद आणि कराचीमधील सेफ हाऊसपर्यंत पोहोचत आहेत. यावरून या हल्ल्याच्या सीमेपलिकडील संबंधाचे पुरावे मिळतात.

घटनास्थळावरून जप्त केलेल्या साहित्याच्या फॉरेन्सिक विश्लेषणाच्या आधारे आणि बचावलेल्या लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी हल्ला करण्यासाठी लष्करी शस्त्रांचा वापर केला असल्याचे गुप्तचर सूत्रांनी सांगितले आहे. याचा अर्थ असा की हल्लेखोर पूर्णपणे प्रशिक्षित होते आणि त्यांच्याकडे आवश्यक असलेली सर्व शस्त्रे होती. भारतीय एजन्सींना घटनास्थळाभोवती प्रगत श्रेणीतील संचार उपकरणे सापडली आहेत. यावरून असे दिसून येते की दहशतवाद्यांना बाहेरून रसद आणि सहकार्य मिळत होते. सुरक्षा अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे की शस्त्रांचे स्वरूप आणि हल्ल्याची अचूकता दर्शवते की दहशतवाद्यांना प्रशिक्षित हँडलर्सकडून लॉजिस्टिक सहाय्य मिळाले होते.

Recent Posts

कोकणातील तरुणाची वेगळी वाट…

माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…

25 minutes ago

छोड आये हम वो गलियाँ…

वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…

55 minutes ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २४ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…

1 hour ago

पहलगाममधील नरसंहार, हिंदू पर्यटकांना टार्गेट

भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…

1 hour ago

SRH vs MI, IPL 2025: हैदराबादला हरवत मुंबईचा विजयी चौकार

हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…

3 hours ago

अटारी बंद, व्हिसा रद्द, सिंधू करार बासनात, पाकिस्तानच्या विरोधात ५ मोठे निर्णय

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…

3 hours ago