Friday, April 18, 2025
Homeसाप्ताहिककोलाजरांगोळी : एक पारंपरिक भारतीय कला

रांगोळी : एक पारंपरिक भारतीय कला

विशेष – लता गुठे

अगदी मला समजायला लागल्यापासून रांगोळीचं विशेष आकर्षण आहे. आमच्या वाड्याच्या समोर मोठे अंगण होते. त्या अंगणामध्ये शेणाचा सडा टाकून सणावाराला किंवा घरात काही शुभ कार्य असेल त्या वेळेला घरातील मोठ्या स्रिया रांगोळी काढून त्यावर हळदीकुंकू टाकत असत.

८० च्या दशकामध्ये त्या वेळेला रांगोळीत रंग भरण्याची फारशी पद्धत नव्हती; परंतु ठिपके काढून चिमटीतल्या रांगोळीने बारीक रेषा काढून ते ठिपके चांदण्याची कला मात्र पिढ्यानपिढ्यांतील महिलांना अवगत होती. आम्ही शेतातून शिरगुळे वेचून आणून ते बारीक वाटून व शिरगाव करून त्याची रांगोळी डब्यात भरून ठेवायचे हे मला आजही आठवते. दिवाळी, दसऱ्यामध्ये तर दारादारांत मंदिरांसमोर खूप सुरेख रांगोळी काढलेल्या असायच्या. चला तर मग या पाठीमागचे सांस्कृतिक धार्मिक रांगोळीचे महत्त्व जाणून घेऊया…

रांगोळीचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व :

रांगोळी दिसायला सुंदर असल्यामुळे तिच्याकडे पाहून मन प्रसन्न तर होतेच; परंतु आजूबाजूचा परिसरही सुंदर दिसतो आणि एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. म्हणून कदाचित हिंदू धर्मामध्ये रांगोळीचे अनन्यसाधारण महत्त्व असावे. कोणत्याही शुभकार्यामध्ये शुभ शकून मानल्या गेलेल्या काही गोष्टींचा वापर करतात. त्यामध्ये रांगोळी असतेच. यामागे धार्मिक पवित्रता, सकारात्मक ऊर्जा आणि देवतांचे स्वागत करण्याचा भाव दडलेला असतो. हिंदू धर्मानुसार, रांगोळी घरात शुभ शकून निर्माण करते असे म्हणतात. विशेषतः लक्ष्मीपूजेच्या दिवशी घराच्या प्रवेशद्वारावर रांगोळी काढण्याचा संकेत आहे. असे मानले जाते की, लक्ष्मीदेवी स्वच्छता आणि सौंदर्याची उपासक आहे, म्हणून अंगणात लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी रांगोळी काढतात.

तसेच सूर्य उपासनेतही रांगोळीचे विशेष महत्त्व आहे. दारामध्ये स्वस्तिक काढून सूर्याच्या आकृतीची रांगोळी रेखाटली जाते. जिथे रांगोळी उपलब्ध नसते तिथे अति ग्रामीण भागात किंवा आदिवासी खेड्यांमध्ये तांदळाच्या पिठाच्या रांगोळ्या काढतात, तर काही ठिकाणी फुलांच्या रांगोळ्या काढल्या जातात.

बदलत्या काळाबरोबर रांगोळी या कलेमध्येही प्रचंड प्रमाणात विविधता आलेली आहे. आपण पाहतो आहे की, रांगोळीमध्ये सुरेख पोट्रेट बनवतात. त्याबरोबरच पाण्यावरच्याही रांगोळ्या काढल्या जातात. रांगोळी स्पर्धेमध्ये रांगोळीचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. अगदी पानाफुलांच्या रांगोळीपासून ते संस्कारभारती मोठ्या रांगोळीपर्यंत.

मुळातच स्त्रियांमध्ये सृजनशीलता, सर्जनशीलता हे गुण असल्यामुळे तिला सौंदर्याची आवड असल्यामुळे अशा विविध कलांमधून पारंपरिक स्त्रीने आपली आवड जोपासली. भारतीय संस्कृती ही विविधतेने नटलेली, समृद्ध परंपरांनी सजलेली आहे. यामध्ये आचार विचारांचेही महत्त्व आहे. भारतामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात. प्रत्येकाची परंपरा, संस्कृती जरी वेगळी असली तरी या भिन्नतेत एकतेचा नेहमी अनुभव येतो.

विविध प्रांतांमध्ये रांगोळीच्या भिन्न शैली आणि पद्धती प्रचलित आहेत. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि उत्तर भारतातील काही भागांमध्येही ही कला वेगवेगळ्या नावांनी आणि रूपांत पाहायला मिळते.

मला उमगलेली रांगोळीची व्याख्या:

‘रांगोळी’ हा शब्द रंग आणि आवळी म्हणजे ओळ किंवा रेषा काढणे. या शब्दांपासून बनली रांगोळी. म्हणजेच रंगांनी आकृती तयार करणे, रंगांच्या सहाय्याने सजवलेली चित्रकला. काही प्रांतांत रांगोळीला कोलाम, मुंगू, मंडणा, अल्पना अशी नावे आहेत.

भारतामध्ये हजारो वर्षांपूर्वीपासून अनेक कला अवगत आहेत. संगीत, नृत्य तसेच अनेक लोककला, वास्तुशास्त्र, नाट्यशास्त्र अशा ग्रंथांमध्येही रांगोळीचा उल्लेख सापडतो. पुरातन काळात, देवी-देवतांचे स्वागत करण्यासाठी किंवा पूजेसाठी जागा पवित्र करण्यासाठी रांगोळी काढली जात असे. ऋषी-मुनींनी वापरलेल्या यज्ञकुंडाभोवती रांगोळी काढण्याची प्रथा होती. भारतीय पुराणकथांनुसार, ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती करताना रंगांची निर्मिती केली आणि त्यातून ‘रंगावली’ म्हणजेच रांगोळी जन्मली, अशी एक आख्यायिका सांगितली जाते. अजंठा किंवा वेरूळची लेणी जर पाहिली, तर छतांवर, भिंतींवर अशा रांगोळी विविध रंगांमध्ये कोरलेल्या आढळतात. त्यामध्ये विशिष्ट प्रकारच्या प्रतिकात्मक आकृत्या पाहायला मिळतात. कमळ, शंख, स्वस्तिक, ॐ, अश्वत्थ वृक्ष इत्यादींमधून आध्यात्मिक ऊर्जा निर्माण होते, असा विश्वास आहे.

रांगोळी ही एक प्रकारची नकारात्मक शक्ती दूर ठेवण्याची पद्धत देखील मानली जाते. रांगोळीचे आणि महिलांचे नाते हे अतिशय जवळचे आहे. रांगोळी ही महिलांच्या सृजनशक्तीचे आणि कलात्मकतेचे प्रतिक आहे. यामध्ये स्त्रियांची कल्पकता प्रतिभा शक्ती दिसून येते. स्त्रियांनी घर सांभाळण्याच्या बरोबरीने घराच्या उंबरठ्यावर दररोज रांगोळीने सौंदर्य वाढवणे, हे त्यांच्या जीवनशैलीचा भाग आहे. या कलामध्ये त्यांची शिस्त, संयम, बारीक निरीक्षणशक्ती आणि सौंदर्यदृष्टी हे गुणनिदर्शनास येतात. वरील विवेचनावरून आपल्या हे लक्षात येईल की, रांगोळी ही एक फक्त कलानुसार ती भारतीय संस्कृतीची एक ओळख आहे.

अनेक गोष्टींचे रांगोळीला संदर्भ असल्यामुळे रांगोळीची ही कला दिवसेंदिवस वृद्धिंगत होत चालली आहे. लहान थोरांपासून सर्वांनाच रांगोळीचे आकर्षण प्रकर्षाने जाणवते. पुढच्या वेळेला आणखी भारतीय संस्कृतीचा एखादा नमुना घेऊन आपल्याला भेटायला येईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -