वर्ष २०२६ अखेर शेतकऱ्यांना १२ तास मोफत वीज - मुख्यमंत्री

  86

वर्धा : डिसेंबर २०२६ पर्यंत राज्यातील ८० टक्के शेतकऱ्यांना वर्षभर १२ तास मोफत वीज उपलब्ध करुन देण्यात येईल तसेच येत्या पाच वर्षात राज्यात सामान्य नागरिकांचे वीज बील दरवर्षी कमी होणार, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आर्वी येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण व भूमिपूजन प्रसंगी केले. तसेच वर्धा जिल्ह्यात अप्पर वर्धा प्रकल्प, वाढवण-पिंपळखुटा आदी सिंचन प्रकल्पांद्वारे शेतीसाठी पाणी व वीज उपलब्ध करु देऊ आणि जिल्ह्यातून जाणाऱ्या समृध्दी महामार्गावरील नोडवर एमआयडीसी उभारुन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आर्वी येथील नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पणासह ७२० कोटींच्या विकास कामांचे ई-लोकार्पण व भूमिपूजन झाले, यावेळी ते बोलत होते. गृह (ग्रामीण) राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, खासदार अमर काळे, आमदार सर्वश्री दादाराव केचे, समीर कुणावार, सुमीत वानखेडे, राजेश बकाने, माजी खासदार रामदास तडस, जिल्हाधिकारी वान्मथी सी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, माजी खासदार सुरेश वाघमारे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सरीता गाखरे, सुनील गफाट, यावेळी उपस्थित होते.


मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचे विविध निर्णय घेऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु केली आहे. शेतीसाठी १२ तास विजेची शेतकऱ्यांची मागणी होती. यादृष्टीने राज्य शासनाने प्रभावी अंमलबजावणी सुरु केली असून डिसेंबर २०२६ पर्यंत ८० टक्के शेतकऱ्यांना ३६५ दिवस दिवसाला १२ तास मोफत वीज उपलब्ध करुन दिली जाणार आहे. राज्य शासनाने २०२५ ते २०३० पर्यंत राज्यातील वीज वापरकर्त्यांचे वीज बील दरवर्षी कमी करण्याचे नियोजन व तशी कार्यवाही सुरु केली आहे. तसेच ३०० युनीट पर्यंत वीज वापरणाऱ्या मध्यम वर्गीय व गरीब कुटुंबांना सौर ऊर्जेअंतर्गत आणून मोफत वीज देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.


वर्धा जिल्ह्यातील आर्वी विधानसभा मतदार संघात विविध महत्वाच्या विकास कामांचे लोकार्पण झाले आहे. याद्वारे या भागातील विकासाला चालना मिळेल. तसेच येत्या काळात या भागातील अप्पर वर्धा प्रकल्प आणि वाढवण-पिंपळखुटा उपसा सिंचन प्रकल्प कार्यान्वीत होण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल. या सिंचन प्रकल्पांद्वारे या भागातील शेतीला मुबलक पाण्यासोबत मोफत वीज उपलब्ध होणार आहे. अप्पर वर्धा प्रकल्पावर ५०० मेगावॅट वीज उपलब्ध होणार आहे. तसेच वाढवण-पिंपळखुटा उपसा सिंचन योजनेला मान्यता देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गामुळे विकासाला गती आली आहे. तसेच येत्या काळात वर्ध्यातून सुरु होणाऱ्या महत्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्ग आणि सिंदी येथील ड्रायपोर्टमुळे जिल्हा मध्यभारताचे लॉजिस्टीक केंद्र म्हणून उदयाला येत आहे. या जिल्ह्यातून जाणा-या समृद्धी महामार्गावरील विरुळ नोडला राज्य शासनाकडून लवकरच मान्यता देऊन येथे एमआयडीसी उभारली जाणार आहे. या माध्यमातून उद्योगासाठी इको सिस्टीम तयार होऊन स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रासाठी १६.५ लाख कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले असून यातील ७ लाख कोटींचे करार विदर्भासाठी करण्यात आले आहे. वर्ध्यासह विदर्भातील अन्य जिल्ह्यांमध्येही या माध्यमातून मोठी गुंतवणूक येणार आहे. गडचिरोली जिल्हा स्टील कॅपीटल म्हणून नावारुपास येत आहे. येत्या काळात वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये लोहखनीजावर आधारीत उद्योग उभारणीसाठी राज्य शासनाने विशेष सवलत दिली असून या भागात मोठ्याप्रमाणात गुंतवणूकीचे प्रस्ताव शासनाकडे आले असल्याचेही त्यांनी सांगितले.


वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पामुळे वर्ध्यासह विदर्भातील दहा जिल्ह्यामधील काही दुष्काळग्रस्त भाग सुजलाम सुफलाम होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पाद्वारे गोसीखुर्द धरणातील ६२ टीएमसी सांडव्याद्वारे नव्याने ५५० कि.मी.ची नदी तयार करण्यात येणार आहे. यासाठी १ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेसाठीच्या सर्व मंजुरी देण्यात आल्या असून योजनेचा अंतिम आराखडा तयार होत आहे. यावर्षा अखेरी किंवा पुढील वर्षाच्या सुरवातीला या योजनेचे काम सुरु होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.



वर्धा जिल्ह्यासाठी ऐतिहासिक क्षण - पालकमंत्री डॉ. पंकज भोयर


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आर्वी मतदार संघातील तीन तालुक्यांमधील ७२० कोटींच्या विविध ११ विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन झाले, या माध्यमातून वर्धा जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार असल्याचे, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले. राज्यातील ४७६ सरकारी शाळा या आदर्श शाळा बनविण्यात येत असून पहिल्या टप्प्यातील आदर्श शाळेचा शुभारंभ १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या औचित्याने सुरु होणार असल्याचे सांगून शिक्षण क्षेत्रात या उपक्रमाद्वारे सकारात्मक बदल होणार असल्याचे ते म्हणाले. आर्वी विधानसभा क्षेत्रातील तीन शाळांचा यात समावेश असल्याचेही ते म्हणाले.



मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पणासह १० ई - लोकार्पण व भूमिपूजन


मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आर्वी येथील नवीन प्रशासकीय इमारततीचे लोकार्पण झाले आणि १० महत्त्वाचे ई लोकार्पण व भूमिपूजनही झाले. त्यांनी आर्वी उपसा सिंचन योजनेचे ई-लोकार्पण, गांधी विद्यालय आर्वी येथील नवीन इमारतीचे ई-लोकार्पण,आर्वी शहरातील नवीन स्विमींग पुलचे ई-लोकार्पण, आर्वी शहरातील अंतर्गत रस्त्याचे ई-भूमीपूजन,आर्वी शहरातील सारंगपूरी तलावाचे संवर्धन व सौंदर्यीकरण ई-भूमीपूजन, आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयातील शंभर खाटाच्या रुग्णालयाच्या इमारतीचे ई-भूमीपूजन, पंतप्रधान सुर्यघर मोफत विज योजनेचे ई-लोकार्पण (सौरग्राम नेरी मिर्झापुर, तह- आर्वी), एमआयडीसीमध्ये कार्यांवित एचएएम टप्पा-२ अंतर्गत कारंजा तालुक्यातील रस्त्याचे ई-भूमीपूजन आणि १०० दिवसाच्या मोहिमेअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहा शासकीय वाहनांचे लोकार्पण केले.

Comments
Add Comment

वादग्रस्त विधाने करू नयेत, सर्वांनी समन्वयाने काम करावे - आमदार दीपक केसरकर

सिंधुदुर्ग - महायुतीची सध्याची राजकीय परिस्थिती चांगली असून, कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची वादग्रस्त

समृद्धीवर वेगमर्यादेचे उल्लंघन, आता असणार सीसीटीव्हीची नजर

अमरावती : नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गावर सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, महिलेचा मृत्यू

सिंधुदुर्ग : मुंबई गोवा महामार्गावर कसाल येथील खालसा धाब्यासमोर एका मोपेडला ईर्टीका कारने जोरदार धडक

Sambhajinagar Illegal Construction: छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध बांधकामावर हातोडा; विरोध करणाऱ्यावर होणार कायदेशीर कारवाई

विरोध करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश  संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने दोन दिवसांच्या

OBC reservation : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार!

२७ टक्के ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी याचिका फेटाळली नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात गेल्या अनेक

शिक्षकाने लॉजमध्ये जाऊन का केली आत्महत्या?

नांदेड : नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कंधार तालुक्यातील एका खासगी शिक्षण संस्थेत कार्यरत