Saturday, April 19, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेThane News : ठाणे जिल्ह्यात अवैध वसतिगृहातून २९ बालकांची सुटका

Thane News : ठाणे जिल्ह्यात अवैध वसतिगृहातून २९ बालकांची सुटका

संचालकांसह पाच जणांवर गुन्हा दाखल

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील खडवली येथे ‘पसायदान विकास संस्था’ या नावाने चालविल्या जाणाऱ्या एका अनधिकृत बालकांच्या निवासी संस्थेतून जिल्हा प्रशासनाने तातडीने कारवाई करत २९ बालकांची सुटका केली आहे. संस्थेत बालकांना जबर मारहाण तसेच अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार होत असल्याची तक्रार चाईल्ड हेल्प लाईनवर प्राप्त झाल्यानंतर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. या प्रकरणी संस्थेचे संचालक, त्यांच्या पत्नी, मुलगा आणि त्यांना मदत करणारे दोन अशा एकूण पाच जणांविरुद्ध बाल न्याय अधिनियम २०१५ आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, १० एप्रिल २०२५ रोजी चाईल्ड हेल्प लाईनवर खडवली येथील ‘पसायदान विकास संस्था’ बाबत तक्रार आली होती. तक्रारीमध्ये संस्थेत बालकांना शारीरिक मारहाण केली जात असून लैंगिक अत्याचार होत असल्याचे नमूद करण्यात आले होते. या तक्रारीची तातडीने दखल घेत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या पथकाने ११ एप्रिल रोजी पोलिसांना सोबत घेऊन संस्थेची पाहणी केली. या पाहणीदरम्यान आणि बालकांशी संवाद साधल्यानंतर त्यांना शारीरिक इजा पोहोचेल, अशा प्रकारे मारहाण तसेच अल्पवयीन मुलींसोबत लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले.

फॅक्ट चेक : रेल्वेच्या तत्काळ तिकीट नियमांत खरंच बदल झालाय का?

या गंभीर प्रकाराची दखल घेत पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत संस्थेत असलेल्या २९ बालकांची सुटका केली. यामध्ये २० मुली आणि ९ मुलांचा समावेश आहे. सुटका केलेल्या सर्व बालकांना बाल कल्याण समितीसमोर सादर करण्यात आले. समितीने रात्री उशिरापर्यंत या बालकांच्या देखरेखेबाबत आदेश देण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

या प्रकरणी संस्थेचा संचालक बबन नारायण शिंदे, त्यांची पत्नी आशा बबन शिंदे, संचालक मुलगा प्रसन्न बबन शिंदे, त्यांना मदत करणारा प्रकाश सुरेश गुप्ता आणि दर्शना लक्ष्मण पंडित या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी खडवली येथील रहिवासी आहेत. सुटका करण्यात आलेल्या बालकांपैकी काही खडवली येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत होते. त्यांची आगामी परीक्षा लक्षात घेता, शिक्षण विभागाने त्यांच्या परीक्षेसाठी विशेष व्यवस्था करावी, यासाठी शिक्षणाधिकारी कार्यालयाशी समन्वय साधण्यात येत आहे.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाने या प्रकरणी तत्परतेने कार्यवाही केली असून, बालकल्याण समितीच्या आदेशानुसार सर्व बालकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. सध्या या बालकांना उल्हासनगर येथील मुलींचे विशेषगृह/बालगृह तसेच कनिष्ठ व वरिष्ठ मुलांचे शासकीय बालगृहात सुरक्षितपणे दाखल करण्यात आले आहे.

या कारवाईनंतर जिल्हाधिकारी श्री.अशोक शिनगारे यांनी सांगितले की, “बालकांची सुरक्षितता आणि त्यांचे हित हे प्रशासनाचे नेहमीच प्राधान्य राहिले आहे. बालकांच्या शोषणाबाबत आमची भूमिका ‘झीरो टॉलरन्स’ची आहे आणि बालकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन नेहमीच कटिबद्ध आहे. अशा गैरकृत्यांची तात्काळ दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, जेणेकरून भविष्यात कोणीही बालकांच्या भविष्याशी खेळण्याचे धाडस करणार नाही.”

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संतोष भोसले यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, “आपल्या आसपास कोणत्याही स्वरूपाची बालकांसाठीची निवासी संस्था अनधिकृतपणे चालविली जात असल्यास किंवा बालकांचे शारीरिक, लैंगिक, मानसिक किंवा इतर कोणत्याही प्रकारचे शोषण होत असल्यास, तात्काळ १०९८ या चाईल्ड हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा. बालकांच्या अनधिकृत निवासी संस्था चालवणे आणि त्यांचे शोषण करणे हा बाल न्याय अधिनियमानुसार गंभीर गुन्हा आहे. याबाबत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -