Thursday, October 30, 2025
Happy Diwali

रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची कपात, व्याज दर घटण्याची शक्यता

रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची कपात, व्याज दर घटण्याची शक्यता
नवी दिल्ली : अमेरिकेने जगभरातून आयात केल्या जाणाऱ्या मालासाठी नवे टॅरिफ धोरण लागू केले आहे. हे धोरण लागू झाल्यानंतर जगभरातील शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढउतार दिसून आले. यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये पाव टक्का कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रेपो रेट ६.२५ टक्क्यांवरुन आता सहा टक्क्यांवर आला आहे. रेपो रेट सहा टक्के झाल्यामुळे बँका लवकरच कर्जावर आकारल्या जाणाऱ्या व्याजाच्या दरांमध्ये कपात करण्याची शक्यता आहे. कर्जावर आकारल्या जाणाऱ्या व्याज दरांमध्ये कपात झाल्यास दरमहा भरावा लागणारा हप्ता अर्थात ईएमआय कमी होणार आहे. यामुळे रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचा लवकरच कर्जदारांना फायदा होण्याची शक्यता आहे.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांनी नवे पतधोरण जाहीर करताना रेपो रेटमध्ये पाव टक्का कपात केल्याचे जाहीर केले. या घोषणेमुळे रिझर्व्ह बँकेचा बँकांसाठीचा रेपो रेट ६.२५ टक्क्यांवरुन आता सहा टक्क्यांवर आला आहे. याआधी फेब्रुवारी महिन्यात पतधोरण जाहीर करण्यात आले त्यावेळी रेपो रेट ६.२५ टक्के निश्चित करण्यात आला होता.
रेपो रेटला पर्चेस रेट किंवा खरेदी दर असेही म्हणतात. रिझर्व्ह बँकेकडून व्यावसायिक बँकांना दिल्या जाणाऱ्या कर्जावर हा व्याज दर आकारला जातो. जेव्हा रिझर्व्ह बँक हा व्याज दर कमी करते त्यावेळी होणारा फायदा बँका अनेकदा ग्राहकांना देतात. यासाठी बँका ग्राहकांना द्यायच्या किंवा दिलेल्या कर्जावर आकारल्या जाणाऱ्या व्याजाच्या दरांमध्ये कपात करतात.
चलनवाढ आणि अन्नधान्याच्या किंमती या दोन्ही बाबतीत चिंतेची स्थिती नाही. बँका आणि कॉर्पोरेट्सचे ताळेबंद निरोगी आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्थेचे भविष्य उज्ज्वल दिसत आहे. शहरी अर्थव्यवस्थाही सुस्थितीत आहे. यामुळे रेपो रेटमधील कपात भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांनी नवे पतधोरण जाहीर करताना व्यक्त केला.
Comments
Add Comment