मुंबई : पश्चिम रेल्वे १५ डब्यांच्या गाड्यांची संख्या वाढवणार आहे. यामुळे प्रत्येक लोकल फेरीद्वारे जास्त प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वेगाने जाणे शक्य होणार आहे.
सध्या मुंबई उपनगरीय रेल्वे अंतर्गत पश्चिम रेल्वे मार्गावर दररोज १२५० लोकल फेऱ्या होता. यापैकी किमान ७९ फेऱ्या या १५ डब्यांच्या गाड्यांच्या असतात. उर्वरित लोकल फेऱ्यांसाठी १२ डब्यांच्या गाड्यांचाच वापर होतो. नव्या योजनेनुसार पश्चिम रेल्वे १५ डब्यांच्या गाड्यांची संख्या वाढवणार आहे. यामुळे १५ डब्यांच्या गाड्यांच्या लोकल फेऱ्या वाढणार आहेत. याचा प्रवाशांना फायदा होणार आहे.
पश्चिम रेल्वेच्या अंधेरी ते विरार या धीम्या मार्गावर एकूण चौदा स्थानकांवर २७ फलाटांचा (प्लॅटफॉर्म) १५ डब्यांच्या गाड्यांसाठी करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी रेल्वेने साठ कोटी रुपयांचा खर्च केला आहे. आता पश्चिम रेल्वे मार्गावर १५ डब्यांच्या लोकल फेऱ्यांची संख्या किमान १०० वाढवण्याचे नियोजन आहे. ही योजना यशस्वी झाल्यास पश्चिम रेल्वे मार्गावर १५ डब्यांच्या लोकल फेऱ्यांची संख्या ७९ वरुन १७९ वर पोहोचेल. यामुळे एका लोकल फेरीद्वारे अधिकाधिक प्रवाशांना वेगाने, वाजवी दरात आणि सुरक्षितरित्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे शक्य होणार आहे.