अमरावती : काही दिवसांपासून असह्य उकाडा अन् अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हाच्या झळांमुळे हैराण झालेल्या अमरावतीकरांना ढगाळ वातावरण व नंतर पडलेल्या पावसाच्या सरी मुळे चांगलाच दिलासा मिळाला. मंगळवारी सकाळपासून आकाशात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने सर्वत्र अवकाळी पाऊस पडेल की काय? असे वाटत होते.रात्री उशिरा जिल्ह्यातील हवेत गारवा निर्माण झाला असून रोज कडक उन्हाचा अनुभव घेणाऱ्या शहरवासीयांना यातून सुटका मिळाली.
मार्चच्या सुरवातीपासून शहरातील कमाल तापमान ३४ ते ३६ अंश सेल्सिअसदरम्यान होते. सकाळी ९ वाजल्यापासून वातावरणात उष्मा वाढत होता. सायंकाळी सहापर्यंत उन्हाची तीव्रता कायम राहत असल्याचे चित्र आहे. दुपारी उन्हाच्या झळा असह्य वाटत असल्याने नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. त्यामुळे रस्त्यावरील वर्दळ घटल्याचा प्रत्यय येत आहे. त्यामुळेच दुपारी शहरातील बहुतांश रस्ते निर्मनुष्य होत आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक टोपी, रुमाल, छत्री तसेच स्कार्फचा वापर करीत आहेत. घरातील पंखे, कुलर रात्रंदिवस सुरू ठेवावे लागत आहेत. तीव्र उन्हाच्या झळांनी अवघ्या शहराला घाम फुटलेला असताना मंगळवारी (१ एप्रिल) मात्र सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते व रात्रीच्या सुमारास हलक्या स्वरूपात पावसाने हजेरी लावली.