Friday, May 9, 2025

मनोरंजनताज्या घडामोडी

Avkarika : स्वच्छतेच्या माध्यमातून शोधणार जगण्याचा रस्ता! 'अवकारीका' चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित

Avkarika : स्वच्छतेच्या माध्यमातून शोधणार जगण्याचा रस्ता! 'अवकारीका' चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित

मुंबई : मनोरंजन क्षेत्रात सातत्याने नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. ॲक्शन, कॉमेडी, हॉरर, रोमान्स, ड्रामा, थ्रिलर अशा विविध प्रकारच्या चित्रपटांची घोषणा होत आहे. मात्र आता मराठी सिनेसृष्टीत (Marathi Movie) सामान्य माणसाच्या असामान्य संघर्षाची तसेच न्याय, सन्मान आणि परिवर्तनाची भाषा बोलली जाणारा चित्रपट भेटीस येणार आहे. स्वच्छतेच्या माध्यमातून स्वतःच्या जगण्याचा रस्ता शोधणाऱ्या वेदनेचा हा शोध असला तरी समाजाला त्यांच्या श्रमाची जाणीव व्हावी, स्वच्छतेची प्रभावीपणे जागरूकता निर्माण व्हावी याच संकल्पनेतून आणि भावनेतून 'अवकारीका’ (Avkarika) चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.



''कथा त्यांच्या आत्मसन्मानाची, कथा आपल्या आत्मभानाची, स्वच्छ, देखण्या, निरोगी भारताची, पृथ्वी लख्ख करणाऱ्या दूतांची'' अशा टॅगलाईनसह अवकारीका' चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झालं आहे. ‘अवकारीका’ फक्त एक चित्रपट नाही, तो समाजमन हलवणारी चळवळ आहे. या पोस्टरमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यासमोर हातात झाडू घेऊन एक स्वच्छता दूत अगतिकपणे उभा असल्याचे दिसत आहे.


रेडबड मोशन पिक्चर या बॅनरअंतर्गत येत्या १३ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अरविंद भोसले यांचे आहे. या चित्रपटाची निर्मिती भारत टिळेकर यांनी केली असून सहनिर्मिती मनोज गायकवाड, अरविंद भोसले, मृणाल कानडे, गीता सिंग यांची आहे.


अभिनेता विराट मडके 'अवकारीका' चित्रपटात स्वच्छता दूताच्या भूमिकेत दिसणार असून त्याच्यासोबत या चित्रपटात राहुल फलटणकर, रोहित पवार, विनोद खुरंगळे, पिया कोसुम्बकर, नितीन लोंढे, प्रफुल्ल कांबळे, स्नेहा बालपांडे तसेच बालकलाकार वैभवी कुटे, उन्नती माने, कार्तिकी बट्टे, आदि कलाकार मंडळी दिसणार आहेत. या चित्रपटाची कथा-पटकथा, संवाद, गीते अरविंद भोसले यांची आहेत. छायांकन करण तांदळे तर संकलन अथर्व मुळे यांचे आहे. सहदिग्दर्शक रेहमान पठाण तर कार्यकारी निर्माता चेतन परदेशी आहेत. संगीत श्रेयस देशपांडे यांचे असून गायक कैलास खैर, सुनिधी चौहान, ज्ञानेश्वर मेश्राम यांचे स्वर चित्रपटातील गीतांना लाभले आहेत.

Comments
Add Comment