आता सिंगापूर नव्हे, मलबार हिलला 'ट्री टॉप वॉक'

मुंबईतील पहिला 'एलिव्हेटेड नेचर वॉक' सज्ज


मुंबई : मलबार हिल येथील पहिल्या 'एलिव्हेटेड नेचर वॉक'चे उद्घाटन ३० मार्च २०२५ रोजी सकाळी ९ वाजता आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते होणार आहे. हा प्रकल्प सिंगापूरच्या 'ट्री टॉप वॉक'च्या धर्तीवर उभारण्यात आला आहे.


या उंच निसर्ग मार्गाची लांबी ४८५ मीटर आणि रुंदी २.४ मीटर आहे. यात समुद्राच्या विहंगम दृश्यांसाठी विशेष डेकची सोय आहे. स्टीलने मजबूत केलेला लाकडी पदपथ, सौंदर्यात्मक प्रकाशयोजना आणि प्रवेश नियंत्रण प्रणाली यामुळे पर्यटकांना अधिक सुरक्षित आणि सुंदर अनुभव मिळणार आहे.



मलबार हिलमधील पहिल्या एलिव्हेटेड नेचर वॉकचे ३० मार्च २०२५ रोजी सकाळी ९ वाजता स्थानिक आमदार मंगल प्रभात लोढा, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याची घोषणा बीएमसीने केली आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) यतीन दळवी, जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे, सहायक आयुक्त (डी विभाग) मनीष वळंजू आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.


सिंगापूरच्या 'ट्री टॉप वॉक'पासून प्रेरित हा 'एलिव्हेटेड नेचर ट्रेल' हा मुंबईतील अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प आहे.



गिरगावातील मराठी मुलीने समर्थपणे सांभाळली आर्किटेक्टची जबाबदारी!


गिरगावातील मराठी मुलीने समर्थपणे सांभाळली आर्किटेक्टची जबाबदारी!
गिरगावकर महिमा भडेकर यांचे कौतुक – मलबार हिल निसर्ग उन्नत मार्गाचा मुख्य आर्किटेक्ट

मुंबईकर आणि पर्यटक आतुरतेने वाट पाहत असलेल्या मलबार हिल निसर्ग उन्नत मार्गाचे उद्घाटन उद्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने उभारलेल्या या ४८५ मीटर लांबीच्या मार्गावर सीसीटीव्ही आणि सुरक्षेची विशेष व्यवस्था आहे. हा मार्ग सकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत पर्यटकांसाठी खुला राहील, आणि तिकीट खिडकी तसेच ऑनलाइन बुकिंगची सुविधा उपलब्ध असेल.


या प्रकल्पाचे आर्किटेक्ट आय. एम. के. आर्किटेक्ट असून, मॅनेजमेंट कन्सल्टंट आर्किटेक्ट मास्टर अँड असोसिएट आहेत. मात्र, या प्रकल्पाच्या ड्रॉइंग आणि साइट एक्झिक्युशनची जबाबदारी गिरगावातील मराठी आर्किटेक्ट कुमारी महिमा घनश्याम भडेकर यांनी समर्थपणे सांभाळली आहे. त्यांचे हे योगदान मुंबईच्या स्थापत्यशास्त्र क्षेत्रातील एक मोठे यश मानले जात आहे.


या निसर्ग उन्नत मार्गावरून दक्षिण मुंबईतील नरिमन पॉईंट ते गिरगाव चौपाटीपर्यंतचा विहंगम नजारा पर्यटकांना अनुभवता येणार आहे.



निसर्गाच्या सान्निध्यात रमण्याची पर्यटकांना संधी


दक्षिण मुंबईत कमला नेहरू उद्यान आणि फिरोजशाहा मेहता उद्यान येथे वृक्षराजीच्या सान्निध्यात रपेट (ट्री वॉक) करण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. मुंबईतील पहिल्याच अशा या उन्नत मार्गाच्या माध्यमातून स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) लगतच्या समुद्राचे सौंदर्यही पाहता येणार आहे. या माध्यमातून दक्षिण मुंबईत निसर्गाच्या सान्निध्यात भ्रमंती करण्याचा पर्याय 'निसर्ग उन्नत मार्ग' (एलिव्हेटेड नेचर ट्रेल) च्या माध्यमातून मुंबईकरांसह पर्यटकांना उपलब्ध होणार आहे. या द्वारे एक नवीन पर्यटन स्थळ मुंबईत निर्माण झाले आहे



हा उन्नत मार्ग मुंबईत पहिल्यांदाच विकसित


सिंगापूर येथे विकसित 'ट्री टॉप वॉक' या संकल्पनेशी साधर्म्य असलेला हा उन्नत मार्ग मुंबईत पहिल्यांदाच विकसित करण्यात आला आहे. या उन्नत मार्गाशी संबंधित कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले होते. त्यानुसार विद्युतीकरणाची कामे तसेच वास्तुशी संबंधित कामे पूर्ण झाल्यानंतर हा मार्ग नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. महापालिकेचे तत्कालिन डि विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी यासाठी जलअभियंता विभागाशी समन्वय साधून प्रथम पुढाकार घेतला होता.



या ठिकाणी समुद्राचे विहंगम दृश्य...


हा प्रकल्प महानगरपालिकेच्या डी विभाग अंतर्गत फिरोजशहा मेहता उद्यान आणि कमला नेहरू उद्यान याठिकाणी जल अभियंता विभागामार्फत विकसित करण्यात आला आहे. निसर्ग उन्नत मार्गाची लांबी एकूण ४८५ मीटर आणि रूंदी २.४ मीटर इतकी आहे. या मार्गावर एका ठिकाणी समुद्राचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी ’सी व्हिविंग डेक’ देखील बांधण्यात आला आहे.



लाकडी फलाटाचे उन्नत मार्ग


या प्रकल्प अंतर्गत लाकडी फलाटाच्या उन्नत मार्गावर चालण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. लाकडी कठडा (रेलिंग), दुतर्फा आधार देणारे खांब आणि लाकडी जोडणी सांधे अशा पद्धतीची रचना या मार्गावर करण्यात आली आहे. भक्कम पायाभरणीसह (पाईल फाऊंडेशन) पोलादी जोडणीचा आधारही या बांधकामाला देण्यात आला आहे. त्यासमवेत, आकर्षक अशा स्वरूपाची प्रकाश व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यटकांच्या भेटीची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी एक्सेस कंट्रोल सिस्टिम (प्रवेश नियंत्रण प्रणाली) विकसित करण्यात आली आहे. प्रकल्प कक्षातून संपूर्ण उन्नत मार्गावर देखरेख ठेवणे तसेच भेट देणाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. एवढेच नव्हे तर आपत्कालीन मार्गाची व्यवस्थाही करण्यात आली आहे.



तब्बल १०० हून अधिक वनस्पतींसह निरनिराळे पक्षी न्याहाळता येणार


मुंबईच्या समृद्ध जैवविविधतेचे दर्शन घडवणाऱ्या १०० हून अधिक वनस्पतींसह निरनिराळे पक्षी न्याहाळण्याची संधी देखील याठिकाणी मिळणार आहे. वनस्पतींमध्ये गुलमोहर, बदाम, जांभूळ, कांचन, ताड, फणस, रतन गुंज, सीता अशोक, अर्जुन, मुचकुंद, सप्तपर्णी, करमळ, विलायती शिरीष आदी प्रजातींचा समावेश आहे. पक्ष्यांमध्ये कोकीळ, ताडपाकोळी, घार, भारतीय राखी धनेश, खंड्या, तांबट, टोपीवाला पारवा तथा पोपट, हळद्या, नाचण/नाचरा/नर्तक, कावळा, शिंपी चिमणी, बुलबुल, लालबुड्या बुलबुल, साळुंकी, दयाळ, चिमुकला फुलटोचा, जांभळ्या पाठचा सूर्यपक्षी, शुभ्रकंठी, ठिपकेवाली मनोली आदी पक्षी पाहण्याची संधी मिळणार आहे. तसेच, सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये सरडा, झाडसरडे, भारतीय सुळेदार सरडा, नाग, अजगर, नानेटी आदींचा समावेश आहे. लोकार्पणानंतर या निसर्ग उन्नत मार्गाला भेट द्यावी. अधिकाधिक नागरिकांनी निसर्गाच्या कुशीतील खजिना पाहण्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम