चौंऱ्याऐंशी लक्ष योनी फिरल्यानंतर मानवाचा जन्म मिळतो. असं म्हणतात की मातेच्या उदरात गर्भ सो हं चा जाप करीत असतो परंतु जेव्हा जन्म होतो तेव्हा को हं चा उच्चार करतो. भौतिक विषयांमध्ये गुंतून मनुष्य भगवंताला विसरतो आणि स्वहितास मुकतो. या मायारूपी नदीमध्ये जेव्हा मनुष्य गटांगळ्या खात असतो तेव्हा काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे षडरिपू रूपी जलचर प्राणी त्याच्या अवतीभवती फिरत असल्यामुळे त्याला पैलतीर दिसतच नाही आणि तो जन्म-मरणाच्या गर्तेत अडकला जातो. डोळ्यांवर झापड बांधलेल्या घोड्यासारखा त्याचा प्रवास सुरू असतो. बरं, जन्माला येताना मनुष्य मोकळ्या हाताने येतो. पण इथून जाताना तो मोकळ्या हाताने जातो का? तर नाही… आपण हा मायेचा पसारा इतका वाढवून ठेवला आहे की, “माझं माझं आणि भ्रांतीच ओझं” अशी आपली गत झाली आहे. ऐलतीरावरुन संसार सागर पार करून पैलतीरावर परमात्म्याला भेटायला जायचं असेल तर या मोह मायेच्या पसाऱ्यातून स्वत:ला आधी मोकळं केलं पाहिजे. हा माझा, तो माझा, ही वस्तू माझी ती वस्तू माझी असं करत आपण या संसाराच्या पाशात इतके गुरफटतो की जेव्हा हे सगळं सोडून जायची वेळ येते तेव्हा हा संसार पाश तोडणं कठीण होतं. आयुष्यभर आपण इतका पसारा जमवलेला असतो की कैक वेळा तो समेटताना भावनांच्या कोंडाळ्यात आपण फसले जातो.
पूर्वी आपल्याकडे ‘वानप्रस्थाश्रम’ ही संकल्पना होती. संसाराची सगळी कर्तव्य पार पाडल्यानंतर वडिलधारी व्यक्ती संसाराचे सर्व पाश तोडून ज्येष्ठ मुलाच्या हाती संसाराची धुरा सोपवून वानप्रस्थाश्रमास निघून जात असत. सध्याच्या काळात घरातच राहून वानप्रस्थासारखे आयुष्य जगणारे सुद्धा आहेत. माझ्या एका मैत्रिणीचे सासू-सासरे एकत्र कुटुंबात राहून सुद्धा विरक्त जीवन जगत आहेत. त्यांनी ठरवलं आहे की मोकळ्या हाताने जन्माला आलो तर जाताना ही मोकळ्या हातानेच पैलतीरी जायचे. आता तुम्ही म्हणाल माणूस मोकळ्या हातानेच तर जातो. पण असं नाही. मनुष्याच्या इच्छा, त्याची कर्म ही त्याच्या सोबत जातात. मग तो मोकळ्या हाताने कसा जाईल बरं… तेव्हा जे काही आहे ते इथेच सोडायचं असेल तर त्याचं नियोजन आधीपासून करायला हवं. उद्या आपण निघणार आणि आज मी सगळा पसारा आवरते म्हटल्यावर तसं नाही होत. अहो, साधं घर आवरायचं म्हटले तरी आपण आठ दिवस आधीपासून थोडं थोडं आवरायला लागतो. तेव्हा कुठे घर आवरून होतं. मग हा जो मायेचा पसारा आपण जमवला आहे तो आवरायला वेळ लागणार नाही का? म्हणूनच रोज थोडा थोडा पसारा आवरता घेण्याची गरज आहे. पण त्या आधी आपल्याला निर्णय घ्यायचा आहे… ऐलतीर की पैलतीर? आणि जर पैलतीर जाण्याचा निर्णय झालाच असेल तर मात्र त्या मार्गावर आपल्याला जायला हवं. माझ्या मैत्रिणीच्या सासू-सासऱ्यांनी देखील पैलतीरी जाण्याचा निर्णय घेतला आणि त्या मार्गावर मार्गक्रमण करायला सुरुवात केली. त्यांनी हळूहळू आपलं लक्ष संसारातून काढून टाकलं. छोटे-मोठे निर्णय असोत किंवा समस्या त्यांनी त्यात आपलं मत देणं बंद केलं. घरात राहून सुद्धा विरक्त जीवन जगत भगवंताला शरण जाणं त्यांनी स्वीकारलं. जमीनजुमला, धनसंपत्ती, सगळ्याचे मृत्युपत्र करून ठेवले… आपल्या संसारातल्या त्या वस्तू ज्यात आपल्या भावना अडकलेल्या असतात त्या सर्व दान केल्या.
नातेसंबंधात मनमुटाव झाले होते ते बोलून दूर केले. कोणतीही गोष्ट मनाला लावून घ्यायची नाही आणि दुसऱ्याचं मन दुखेल असं बोलायचं किंवा वागायचं नाही हा सगळ्यात महत्त्वाचा नियम त्यांनी स्वतःच स्वतःला घालून घेतला. एकाच घरात राहून विरक्त जीवन जगत हा नियम कटाक्षाने पाळणं म्हणजे सत्त्वपरीक्षाच म्हणायची. पण त्या दोघांनी मात्र सगळे संसाराचे पाश तोडून स्वतःला भगवंताच्या चरणी समर्पित केले. दोघांपैकी एकजण आधी जाणारच. हे विधीलिखित आहे. पण एकजण आधी गेला तरी दुसऱ्याने जसं आहे तसंच परमात्म्याचं बोलावणं येईपर्यंत जगायचं आणि तो न्यायला आल्यावर त्याचा हात धरून पैलतीरावर जायचं हा त्यांचा दृढ निश्चय आहे. एकमेकांसोबत असले तरी दोघेही तटस्थपणे जीवन जगत आहेत आणि म्हणूनच ते विश्वासाने सांगतात की आम्ही आता मोकळ्या हाताने पैलतीरी जाण्यासाठी तयार आहोत. खरंच या जन्म मरणाच्या गर्तेत जर आपल्याला अडकायचे नसेल तर सद्गुरूंच्या कृपेशिवाय हे शक्यच नाही. त्यांच्या उपदेशाने आणि उपासनेनेच ही माया रूपी नदी पार होईल. त्यांना शरण गेलेल्यांना ते हाताला धरून ऐलतीरावरून पैलतीरावर म्हणजेच मोक्ष नगरीला घेऊन जातील. पण त्यासाठी तुम्ही मोकळ्या हाताने जाण्यासाठी तयार आहात का? हे मात्र एकदा नक्कीच बघायला हवं…
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सामना राजस्थान रॉयल्सशी होत आहे.…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, मोदी सरकारने पाकिस्तान संबंधित राजकीय, आर्थिक आणि राजनैतिक आघाड्यांवर काही…
१८४ प्रवाशांना घेऊन राज्य सरकारची दोन विशेष विमाने पोहोचली २३२ प्रवाशांसाठी उद्या आणखी एक विशेष…
पहलगाम हल्ल्यानंतर 'फौजी' ची अभिनेत्री इमानवी इस्माईलला विरोध Prabhas Actress Imanvi Esmail: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण…
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णता प्रचंड वाढत (Heat Wave) चालली आहे. एप्रिल महिन्यात…
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारतात सुरू असलेल्या राजकीय…