Friday, May 9, 2025

क्रीडाताज्या घडामोडीIPL 2025

IPL 2025: ती शेवटची ३ षटके ज्यामुळे दिल्लीने लखनऊच्या तोंडातून हिरावून घेतला विजयाचा घास

IPL 2025: ती शेवटची ३ षटके ज्यामुळे दिल्लीने लखनऊच्या तोंडातून हिरावून घेतला विजयाचा घास

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या चौथ्या सामना अतिशय अटीतटीचा झाला. सोमवारी दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सच्या तोंडातून विजयाचा घास हिरावून घेतला. विशाखापट्टणम येथे झालेल्या या सामन्यात दिल्लीच्या संघाने १ विकेटनी विजय मिळवला. सामन्यात टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करताना लखनऊच्या संघाने २१० धावांचे आव्हान दिले होते.


दिल्ली कॅपिटल्सचा आशुतोष शर्मा मॅन ऑफ दी मॅच ठरला. त्याने ३१ बॉलमध्ये नाबाद ६६ धावांची खेळी करत विजय मिळवून दिला. त्याने शेवटच्या षटकातील आपल्या फलंदाजीने संपूर्ण सामन्याचे चित्र बदलून टाकले. एकवेळेस दिल्लीच्या संघाने ६५ धावांवर ५ विकेट गमावले होते. यानंतर संघ अडखळताना दिसत होता. १३व्या षटकातील तिसऱ्या बॉलवर त्यांनी ६वी विकेट गमावली होती. तेव्हा संघाची धावसंख्या ११३ होती. येथून दिल्ली हरेल असेच वाटत होते.


यानंतर विपराज निगम गेमचेंजर म्हणून उभा राहिला. त्याने ८व्या स्थानावर येत १५ बॉलमध्ये ३९ धावा केल्या. सोबतच आशुतोष सोबत मिळून ७व्या विकेटसाठी २२ बॉलमध्ये ५५ धावांची मॅच विनिंग पार्टनरशिप केली. विपराज बाद झाल्यानंतर आशुतोषने मोर्चा सांभाळला आणि सामना संपवला.



शेवटच्या ३ षटकांत बदलले सामन्याचे चित्र


विपराज बाद झाल्यानंतर दिल्ली पुन्हा हरताना दिसली. त्याना १८ बॉलमध्ये ३९ धावा हव्या होत्या. विकेटवर दिल्लीचा मिचेल स्टार्क आणि आशुतोष होता. १८व्या षटकातील पहिल्याच बॉलवर स्टार्क बाद झाला. त्यानंतर कुलदीप आला त्याने तिसऱ्या बॉलवर एक धाव घेत आशुतोषला स्ट्राईक दिला. यानंतर आशुतोषने तीन बॉलवर १६ धावा केल्या.


शेवटच्या २ षटकांत दिल्लीला २२ धावा हव्या होत्या. प्रिंस यादवच्या १९व्या षटकातील पहिल्याच बॉलवर कुलदीपने चौकार ठोकला आणि त्यानंतर तिसऱ्या बॉलवर तो बाद झाला. चौथ्या बॉलवर आशुतोषने २ धावा केल्या. शेवटच्या २ बॉलमध्ये त्याने षटकार आणि चौकार ठोकला.


२०व्या षटकांत दिल्लीला ६ बॉलमध्ये ६ धावा हव्या होत्या. मोहित शर्माने डक खेळल्यानंतर पुढील बॉलवर एकेरी धाव घेतली. तिसऱ्या बॉलवर आशुतोषने षटकार खेचला. आणि दिल्लीचा संघ विजयी ठरला.

Comments
Add Comment