आत्मशोधाच्या इप्सित वाटा

Share

ऋतुराज – ऋतुजा केळकर

‘ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये
एकची माती नाना भांडी
रांजण आणि सुगडे’

संत मुक्ताबाई यांचा हा अभंग आज आठवतोय. ब्रह्म म्हणजे परमेश्वर. जो ठाई ठाई आहे, पण तो पाहण्याची दृष्टी आजच्या पिढीकडे नाही. सायंकाळच्या संधीप्रकाशात सूर्याने आपल्या किरणांनी नदीच्या संथ पाण्यावर वर्तुळ रेखणं हे जितकं फोल आहे तितकंच फोलपण हे शोडपचार पूजेत आहे. पण याची जाणीव आज कुणालाच नाही हे दुर्दैव आहे. ज्याप्रमाणे एकाच मातीचा वापर हा विविध भांडी बनवण्यासाठी होतो. त्याचबरोबर हीच काळी आई हिरवेगार पीक देऊन जीवाला जगवते. तसेच थकलेल्या शरीरातून जेव्हा आत्मा मुक्त होण्याकरिता धडपडतो तेव्हा देखील हीच माता ‘पुनरपि जनम पुनरपि मरण’ या उक्तीप्रमाणे वत्सल अंतकरणाने आपल्या तिच्या उदरात स्थान देऊन आत्म्याला गती देण्यास मदत करते.

विश्व हे कसे अनंत आहे यावर चर्चा करण्यापेक्षा जीवाला अलौकिकाचे वेड लागणे गरजेचे आहे. नेहमी एक गोष्ट लक्षात असुदे आणि ती म्हणजे आत्मा हा अमर आहे, पण त्याला सांभाळायचं असतं ते आपल्या कर्माचे ओझे. ते ओझे जेव्हा शून्यत्वाला पोहोचेल तेव्हाच या जन्म-मृत्यूच्या चक्रातून आपली सुटका आहे, हे सत्य जोवर आपल्या मनाला उमजत नाही तोवर त्या परब्रह्माचे दर्शन ते कसे होईल बरे? आणि ते व्हायला हवे असेल तर मनातील अनीतीच्या रानटी श्वापदांना करुणा, प्रेम आणि माणुसकीच्या अत्तराने भिजवून टाकणे गरजेचे आहे. मान्य परिवर्तनाचा हा मंत्र एका क्षणातच सारे बदलू नाही शकणार. पण आपण आपल्या आत्म्याच्या चंदनरुपी झाडाला षड्रिपूंचे कितीही नाग वेटोळे घालून बसले तरीही त्यांना पुण्यशील विचारांच्या कुंपणाने दूर ठेवणे गरजेचे आहे. मनात असलेल्या विकारांच्या या सर्पांमधील कुठला सर्प हा कधी फणा काढेल याचा नेम नसतो. म्हणूनच आपले अति चपळ असे चित्त सुविचारांच्या धाग्यात बांधून सुकर्माचे खतपाणी देऊन वेळीच नियंत्रित करणे गरजेचे आहे. अगदी साधच उदाहरण घेऊया. एखादी व्यक्ती जेव्हा कांदा चिरते तेव्हा त्याच्या डोळ्यांतून अश्रू येतात नाही का? पण जर एक कांद्याचे साल त्याने आपल्या डोक्यावर ठेवले, तर या अश्रुंपासून त्याची सुटका होईल. पण ते कांद्याचे साल आपल्याला डोक्यावर ठेऊन मगच कांदे चिरायचे आहेत हे ते कांदे चिरताना लक्षात ठेवणे गरजेचे आहे तरच या अश्रुधारांपासून आपली सुटका होईल नाही का? तसेच प्रत्येक कर्म करताना आपण काय करायला हवे आणि काय करायला नको याचा विचार करून मगच पावले उचलली तरच जीवनाचा डाव हा उत्तम पद्धतीने रंगेल. मग आपल्याला आपले मन आणि आपली इंद्रिये यावर आपला लगाम सहज घालता येईल.

खर पाहिला गेलं तर प्रत्येक आत्म्यात ईश्वरी अंश असतोच त्यामुळे तो नेहमीच पायस असतो पण, जसे कस्तुरी मृग हा कस्तुरीच्या वासाने बेभान होऊन सर्वत्र त्याचा शोध घेत असतो तसेच आपले झाले आहे. इथे मला एक कथा आठवत आहे, एक मूर्तिकार अतिशय सुंदर अशा दगडी मुर्त्या घडवत असतो. त्याच्या मुर्त्या या नेहमीच अत्यंत सुंदर घडत असतात. एकदा त्याला त्याचे कारण विचारले असता त्याने खूपचं सुंदर उत्तर दिले. तो म्हणाला, ‘‘प्रत्येक दगडात एक सुंदर कलाकृती दडलेली असते. मी फक्त त्यातील अनावश्यक भाग दूर करतो” हेच वाक्य आपल्या प्रत्येकाकरिता लागू होते. प्रत्येक फुलात हा सुगंध हा उपजतच असतो. वाऱ्याच्या प्रत्येक लहरीत संगीत दडलेले असते. त्याचा शोध घेणे नितांत गरजेचे आहे.
अखेरीस माझे माझे म्हणत जे आपण कवटाळून जगतो ते सारे इथेच सोडून जायचे आहे. हे समजून घेतले की जीवनाची पायवाट चालणे सोपे जाते. पंचतत्वातून निर्माण झालेले हे शरीर अखेरीस पंचतत्वातच विलीन होणार आहे. त्यामुळे मातीशी असलेले आपले नाते उमजून जगायला शिका. अखेरीस अगदी माझ्याच शब्दात सांगायचे झाले तर…

“गंधपुष्करी देह …
जन्मला कल्पविकल्पाने…
आत्मशोधाच्या इप्सित वाटा…
वेढल्या अहिल्येच्या शिळेने…
वेढल्या अहिल्येच्या शिळेने…”

Recent Posts

World Book Day : भूतकाळासह भविष्यकाळातील दुवा म्हणजेच ‘पुस्तकं’

मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…

55 minutes ago

‘टीनएजर्सच्या पालकांकडून अपेक्षा’

डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…

1 hour ago

समाजवादी विचारवंत ना. ग. गोरे

सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…

1 hour ago

राखी वटवट्या

डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…

2 hours ago

“ठाऊक आहे का तूज काही?”

श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…

2 hours ago

साहित्य म्हणजे नेमकं काय ?

गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…

2 hours ago