Share

श्री गुरुगाथा – अरविन्द दोडे

तया हृदयाचा परिवारी |
कुंडलिनिया परमेश्वरी |
तेजाची शिदोरी |
विनियोगिली ॥६.२८१॥

विश्वचैतन्याला हृदयाच्या आकाशाच्या माजघरात आणणारी कुंडलिनीदेवी ही आपल्या तेजाची शिदोरी अर्पण करते. नंतर ती प्राणवायूरूप होते. वीज चमकते, अदृश्य होते, तशी ती असते. त्याआधी मात्र एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी आहे. दशदिशा ओस पडतात. अपयश येतं. अपमान करणारे लोक भेटतात. उपेक्षेनं मन पिचून जातं. ज्यांना जीव लावला ते जिवावर उठतात. त्यात व्यथावेदनांचा कळस म्हणजे परमेश्वर भल्याभल्या भक्तांना नडतो. पावलोपावली नडतो. नशीब पाठ फिरवते. इंद्रियांपुढे माणूस पूर्ण पराभूत होतो. जगाचा आणि जिवाच्या जिवलगांचा बेगडी रंग उघडा पडतो. आपली कमाई कमी असते, तरी आपल्या माणसांसाठी स्वत:ला खर्च करतो ! आपण न्याय देतो इतरांना अन्‌‍ मिळतं काय? न्यायदानाची भोगतो शिक्षा ! हृदयाच्या परिवारातल्या प्रेमळांना नवनवे लोक भेटतात, आपल्याला जीर्णशीर्ण समजून तोडून टाकतात. सारांश, जखमा भरून येतात, पण घटना विसरता येत नाहीत. म्हणून गुरुदेव सांगतात, एक तर माझ्याजवळ राहा, मला तुमच्याजवळ राहू द्या किंवा सतत स्वत:जवळ राहा ! तो आनंदानुभव अप्रतिम असतो.

इंद्रियदमन आणि मन:शमन गुरूने साध्य केलेले असते. त्याचं तेज, त्याचं ओज दिव्य असतं. तसेच, अनाहत नादाचे पूर्णत्व म्हणजे अमृतानंद ! चंद्राच्या कलेचं पूर्णत्व म्हणजे चित्ताची एकरूपता.

स्थावरं जंगमं चैव |
तथा चैव चराचरम्‌‍|
व्याप्तं येन जगत्सर्वं |
तस्मै श्रीगुरवे नम: ॥७१॥

पर्वतादी स्थावर आणि पशु-पक्षी-मानवादी स्थलांतर करणारे, तसेच चराचर, सजीव-निर्जीव असं सर्व जग व्यापलंय, त्या श्रीगुरूला नमस्कार असो! या निमित्तानं हेही स्पष्ट करायला हवंय. गुरूच्या गुरूलाही वंदन करतात. त्यांची श्रेणी अशी –
१. गुरू : वर्तमान गुरू
२. परमगुरू :
गुरूचा गुरू
३. परात्परगुरू : परमगुरूचा गुरू
४. परमेष्टिगुरू : परात्परगुरूचा गुरू
गुरूपरंपरेचं महत्त्व याआधी सांगितलंय. चाणक्यानं आदर्श विद्यार्थ्याचे गुण नोंदवले आहेत.
काकचेष्टा
बको ध्यानं |
श्वाननिद्रा तथैवच |
अल्पहारी गृहत्यागी |
विद्यार्था पंचलक्षणम्‌‍॥

गुरू आणि शिष्य यांच्यात केवळ ज्ञानाची देवाणघेवाण नव्हती. शब्दपसारा न मांडता मार्गदर्शक म्हणून गुरू हा शिष्याला सतत व्यवहार शिकवत असे. प्राचीन भारतात तीन प्रकारे शिक्षण दिलं जात असे.
१. गुरुकुल आश्रम : आश्रमात राहून अभ्यास करणं.
२. परिषद : विशिष्ट शिक्षण केंद्र
३. तपस्थळी : गुरू-शिष्य संमेलन.

गुरुकुलाचा अर्थ गुरूचा परिवार. शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थी उद्योगव्यवसाय करीत. लग्न करून संसार करीत. मात्यापित्यांचा सांभाळ करीतं. आपल्या संस्कार आणि संस्कृतीचं एक विभिन्न अंग म्हणजे गुरुकुल. विद्यार्थी आश्रमसेवा, शेती करत. भिक्षा मागत. शिक्षण घेत. एखादा आश्रमातच कायम राहू इच्छित असेल, तर गुरू त्यास राहू देत. श्रीमंत विद्यार्थी आश्रमात लागणाऱ्या वस्तू देत. धनधान्य, कपडालत्ता देत. गरीब विद्यार्थी काही न देता शिक्षण घेत. काही नीतिनियम पाळावे लागत. गरीब-श्रीमंत हा भेदभाव नव्हता. ज्यांचं शिक्षण पूर्ण झालंय, त्यांची परीक्षा घेत. तो उत्तीर्ण झाल्यास निरोप घेत असे.

राजेमहाराजे, शेठसावकार कर्तव्य म्हणून आचार्यांना हवी ती मदत करत असतं. पालीसाहित्य, बौद्धग्रंथात म्हटलंय, प्रसेनजित राजांनी अनेक गावं दान दिली होती. दक्षिण भारतीय साहित्यात आश्रमांना गावं दान दिल्यानं आश्रमात कुठल्याही वस्तूंचा अभाव नव्हता. काही अभिलेखांचे पुरावे याबाबतीत संशोधकांनी जतन केले आहेत. आश्रमातील मुख्य आचार्यांना कुलपती म्हणत. सध्या विद्यापीठाच्या मुख्य कुलपतींना म्हणतात कुलगुरू. नालंदा महाविहार नामक विश्वविद्यालयात काही प्रसिद्ध कुलपती होते, त्यांची यादी चिनी प्रवासी हुएत्संग याने दिली. बौद्धभिक्षू धर्मपाल तथा शीलभद्र हे त्यांच्यात प्रमुख होते. सुमारे दहा हजार विद्यार्थी असत. त्यांचा एक कुलपती असे. सध्या त्यास ‌‘व्हाईस चान्सलर’ असे मराठीत म्हणतात.

आता एक कथा :

एकदा एका शिष्यानं गुरुदेवांना प्रश्न केला, “कुणी महर्षी म्हणतात, जीवन म्हणजे संघर्ष. कुणी मुनी म्हणतात जीवन म्हणजे खेळ आहे, तर काही ज्ञानी सांगतात, जीवन हा उत्सव आहे!”
“बाळ, ज्याला गुरू मिळत नाही, त्याला संघर्ष वाटतं आयुष्य! ज्याला मिळतो, त्याला खेळ वाटतो आणि जो गुरुपरंपरा पुढे नेतो, त्याला एक उत्सव आहे!”
हे समजण्यासाठी त्यांनी एक कहाणी सांगितली. ती कहाणी संघर्षाची आहे. खेळाची आहे अन्‌‍ उत्सवाचीसुद्धा आहे.
एकदा एका गुरुदेवास शिष्यानं विचारलं,

“गुरुदेव, आम्हा तिघांची परीक्षा घेतलीय. आम्ही उत्तीर्ण झालो आहोत. तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ?”
“सुकलेला पालापाचोळा! प्रत्येकानं एक टोपलीभर पानं आणून द्यावीत!”
तिन्ही गुरुबंधू आश्रमाच्या जवळील जंगलात गेले. त्यांनी पुष्कळ शोध घेतला. जीर्ण पानं मूठभर मिळाली फक्त. त्यांना नवल वाटलं. इथला पाचोळा कुणी केला असेल गोळा? ते इकडेतिकडे बघू लागले. त्यांना एक शेतकरी दिसला. त्याच्या डोक्यावर मोठी टोपली होती. तिच्यात सुकलेली पानं होती. वरून फांद्यांनी बांधलेली. एकानं विचारलं,
“आम्हाला ही पानं हवीएत.”
“मला चुलीत टाकायला हवीएत.”
ते तिघं पुढे निघाले. गावात आले. एका व्यापाऱ्याकडे गेले. त्याच्या अंगणात पानांचे भारे होते. तिघं जवळ गेले. एकानं विनंती केली, “आम्हाला पानं हवीएत.”
“ही सगळी पानं विकून टाकलीत, औषधं तयार करणाऱ्या एका वैद्याला!” तो व्यापारी म्हणाला, “या गावाच्या दुसऱ्या टोकाला एक म्हातारी राहते. तीसुद्धा औषधं, खत तयार करते. तिच्याकडे जा. ती नक्की पानं देईल.”
तिघं तिला शोधत निघाले. तिला गाठून म्हणाले,

“आम्हाला पानं हवीएत.”
म्हातारीनं आधीच सर्व पानांची औषधं केली होती. तिघं निराश झाले. दमून,
थकून टोपल्या घेऊन परत आले. तेव्हा गुरुदेव म्हणाले,
“ज्ञान कितीही जुनं झालं तरी कुठंही, कधीही उपयोगीच असतं!”
जय गुरुदेव!

(arvinddode@gmail.com)

Recent Posts

Abhijna Bhave: स्वामींच्या मठात जाताना अभिनेत्रीच्या नवऱ्याला आला वेगळाच अनुभव!

मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…

58 minutes ago

वाळवंटातील बांधकाम क्षेत्रात अब्दुल्ला अ‍ॅण्ड असोसिएट्स

शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…

2 hours ago

भारतासाठी कंटेंट हब बनण्याची सुवर्णसंधी!

वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…

2 hours ago

काश्मीरची ढगफुटी : मानवजातीला इशारा

काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…

2 hours ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २२ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…

2 hours ago

Mhada House : सर्वसामान्यांना मिळणार स्वस्तात घर! म्हाडा करणार घरांच्या किंमतीत घट

किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…

2 hours ago