पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळासाठी तालुक्यातील वनपुरी, कुंभारवळण, उदाचीवाडी, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव मेमाणे या सात गावांतील जमिनींच्या संपादनासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करा, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. यासाठी जमिनीचे सर्वेक्षण, मोजणी करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
पुरंदर विमानतळासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने १० मार्चला अधिसूचना जारी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर, पुण्यात सोमवारी महसूल तसेच उद्योग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्या बैठकीत पुरंदर विमानतळाच्या भूसंपादन प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा झाली. पुरंदर तालुक्यातील सात गावांमधील २ हजार ८३२ हेक्टर क्षेत्र संपादित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Sunita Williams: तब्बल ९ महिन्यांनी अखेर पृथ्वीवर परतली अंतराळवीर सुनीता विल्यम्स, पाहा Video
महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ च्या कायद्यान्वये भूसंपादन प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवण्यात येणार आहे. विमानतळासाठी निश्चित केलेल्या सात गावांमधील ३ हजार ३०० सर्व्हे क्रमांकामधील जमिनींचे सर्वेक्षण करा, अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.