Saturday, March 22, 2025
Homeक्रीडाभारतापुढे २५२ धावांचे आव्हान

भारतापुढे २५२ धावांचे आव्हान

दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या न्यूझीलंडने ५० षटकांत ७ बाद २५१ धावा केल्या. भारतापुढे अंतिम सामना जिंकून चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी ५० षटकांत २५२ धावा करण्याचे आव्हान आहे.

सलामीवीर वील यंग २३ चेंडूत १५ धावा करुन वरुण चक्रवर्तीच्या चेंडूवर पायचीत झाला. नंतर रचिन रवींद्र २९ चेंडूत ३७ धावा करुन कुलदीप यादवच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. तर केन विल्यमसन १४ चेंडूत ११ धावा केल्यानंतर कुलदीप यादवच्या चेंडूवर त्याच्याकडेच झेल देऊन परतला. टॉम लॅथम ३० चेंडूत १४ धावा केल्यानंतर रवींद्र जडेजाच्या चेंडूवर पायचीत झाला. यानंतर ग्लेन फिलिप्स ५२ चेंडूत ३४ धावा केल्यावर वरुण चक्रवर्तीच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. डॅरिल मिशेल १०१ चेंडूत ६३ धावा करुन मोहम्मद शमीच्या चेंडूवर रोहित शर्माकडे झेल देऊन तंबूत परतला. न्यूझीलंडचा कर्णधार असलेला मिचेल सँटनर १० चेंडूत ८ धावा केल्यानंतर धावचीत झाला. न्यूझीलंडचा पहिला बळी ५७ धावांवर, दुसरा बळी ६९ धावांवर, तिसरा बळी ७५ धावांवर, चौथा बळी १०८ धावांवर, पाचवा बळी १६५ धावांवर, सहावा बळी २११ धावांवर, सातवा बळी २३९ धावांवर गेला. भारताकडून कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती या दोघांनी प्रत्येकी दोन तर रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी या दोघांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

विराट कोहली ‘जम्बो’ विक्रमाच्या उंबरठ्यावर

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती.

 

न्यूझीलंड संघ : विल यंग, ​​रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), काइल जेमिसन, विल्यम ओरोर्क, नॅथन स्मिथ.

 

यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीत अ आणि ब असे दोन गट होते. प्रत्येक गटात चार संघ होते. यामुळे प्रत्येक संघाला गटातील इतर तीन संघांसोबत एक – एक सामना खेळायचा होता. या नियोजनानुसार चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये प्रत्येक संघ तीन साखळी सामने खेळणार होता. यानंतर उपांत्य फेरीत अ गटातील पहिल्या क्रमांकाचा संघ विरुद्ध ब गटातील दुसऱ्या क्रमांकाचा संघ आणि दुसऱ्या उपांत्य सामन्यात अ गटातील दुसऱ्या क्रमांकाचा संघ विरुद्ध ब गटातील पहिल्या क्रमांकाचा संघ अशी प्रत्येकी एक लढत झाली. अ गटातून अनुक्रमे भारत आणि न्यूझीलंड आणि ब गटातून अनुक्रमे दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले. उपांत्य फेरीत भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करुन आणि न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला.

भारताने यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील आतापर्यंत झालेले सर्व चार सामने जिंकले. तर न्यूझीलंडने साखळी फेरीतला भारताविरुद्धचा सामना वगळता इतर तीन सामने जिंकले. आता अंतिम फेरीच्या निमित्ताने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये दुसऱ्यांदा भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने असतील. हा सामना जिंकणारा संघ चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ जिंकणार आहे.

याआधी चॅम्पियन्स ट्रॉफी २००० स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड आमनसामने होते. या सामन्यात भारताला हरवून न्यूझीलंडने बाजी मारली होती. भारताने प्रथम फलंदाजी करुन २६४ धावा केल्या होत्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंडने सामना दोन चेंडू आणि चार गडी राखून जिंकला होता. या अंतिम सामन्यातील पराभवाचा वचपा काढण्याची सुवर्णसंधी भारताला रविवार ९ मार्च २०२५ रोजी मिळणार आहे. यामुळे अंतिम सामन्यात भारत कसा खेळतो याकडे अनेक भारतीय क्रिकेटप्रेमींचे लक्ष आहे.

सामना कुठे बघता येणार ?

टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि स्पोर्ट्स १८ नेटवर्कच्या क्रीडा वाहिन्यांवर चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण रविवार ९ मार्च २०२५ रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजल्यापासून सुरू होणार आहे. तसेच जिओ हॉटस्टार या अॅपवर चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग रविवार ९ मार्च २०२५ रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजल्यापासून सुरू होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -