Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीएका वर्षानंतरही राष्ट्रीय महामार्गाचे काम अर्धवटच

एका वर्षानंतरही राष्ट्रीय महामार्गाचे काम अर्धवटच

वाढते अपघाताचे प्रमाण; बेशिस्त वाहनचालक

तलासरी : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचे गेल्या वर्षभरापासून काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत जवळपास ७० टक्के महामार्गावर काँक्रीट करण्याचे काम पूर्ण झाले असले तरी अजूनही उड्डाणपूल, सेवा रस्ते असे काम बाकी आहे.

महामार्गावरील अपघात कमी व्हावेत व प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी काँक्रिटीकरण करण्यात येत असले तरी कामाचे नियोजन नसणे व हलगर्जीपणा यामुळे गेल्या वर्षभरात अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून अनेक नागरिकांना आपले प्राण सुद्धा गमवावे लागले आहेत. चारोटी महामार्ग पोलिसांच्या हद्दीमध्ये मेंढवन खिंड ते अच्छाड असा ५१ किलोमीटरचा महामार्ग येतो.

मुर्खांकडे लक्ष देऊ नकोस

गेल्या एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत या भागात १०५ अपघात झाले आहेत. या अपघातामध्ये ५७ नागरिकांना आपले जीव गमवावा लागला तर ४४ नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. मेंढवन, चारोटी, महालक्ष्मी, धानिवरी, आंबोली, तलासरी उड्डाणपूल, सूत्रकार फाटा अशा विविध ठिकाणी अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. महामार्गावर अपघात होण्यामागे सर्वात मोठे कारण हे अनेक ठिकाणी असलेले अपूर्ण काम व वाहनचालकांचा बेशिस्तपणा असल्याचे दिसून येत आहे.

महामार्गावर अपघात होऊ नये यासाठी महामार्ग पोलीस बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करतात. गेल्या एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत विरुद्ध बाजूने वाहन चालविणे, भरधाव वेगाने वाहन चालवणे, सीटबेल्ट न लावणे अशा विविध १५ हजार सहाशे वाहनांवर दंडात्मक कारवाई केली असून त्यामधून ४५ लक्ष रुपये दंड आकारण्यात आला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात असली तरीही मात्र अपघातांचे प्रमाण मात्र कमी झालेले नाही.

वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत यासाठी विविध ठिकाणी बॅनर सुद्धा लावण्यात आलेले आहेत. महामार्गाचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडीचा त्रास सुद्धा वाहनचालकांना सहन करावा लागत आहे, अपघात होत आहेत तरीसुद्धा टोल मात्र वसूल केला जात आहे.

एप्रिल २०२४ पासून महामार्गावर अपघात होऊ नयेत यासाठी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या १५ हजार सहाशे वाहनांवर दंडात्मक कारवाई केली असून त्यामधून जवळपास ४५ लक्ष दंड आकारण्यात आला आहे. वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत. – विजय पराड (सहाय्यक पोलीस निरीक्षक, महामार्ग)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -