Monday, May 12, 2025

महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

HSC Exam Answer Sheets : कामोठे वसाहतीत रस्त्यावर सापडल्या १२ वीच्या उत्तरपत्रिका

HSC Exam Answer Sheets : कामोठे वसाहतीत रस्त्यावर सापडल्या १२ वीच्या उत्तरपत्रिका

नवी मुंबई  : राज्यात सध्या १२ वीच्या परीक्षा सुरू आहेत. अशातच पनवेल महापालिका हद्दीतील कामोठे वसाहतीत १२ वीच्या उत्तरपत्रिकेंचा (HSC Exam Answer Sheets) अख्खा संचच रस्त्यावर सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. २८ मार्च रोजी पार पडलेल्या परीक्षेच्या या उत्तरपत्रिका आहेत. मनसे महिला आघाडीच्या पदाधिकारी स्नेहल बागल यांना हा संच सापडल्यानंतर याबाबतची माहिती त्यांनी कामोठे पोलीस ठाण्यात दिली आहे.



या प्रकरणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, मुंबई विभागाकडून वाशी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणी बोर्डाकडून नियमानुसार संबंधित शिक्षकावर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई विभागाच्या प्रभारी विभागीय सचिव ज्योत्स्ना शिंदे यांनी दिली. सापडलेल्या उत्तरपत्रिका मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिल्या आहेत. याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता कामोठे येथे राहणाऱ्या एका शिक्षकांकडून हे पेपर गहाळ झाले असल्याची माहिती संबंधित शिक्षकाने मुंबई विद्यापीठाला दिली आहे, असे मुंबई विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.


बारावीच्या बुककीपिंग विषयाची परीक्षा २८ फेब्रुवारी रोजी झाली होती. त्याच्या २५ उत्तरपत्रिका कामोठे बस स्टॉपच्या जवळ झाडीत टाकलेल्या आढळल्या. काही कामानिमित्ताने गुरुवारी सकाळी मनसेच्या जिल्हा सचिव स्नेहल बागल कामोठे बस स्टॉपजवळ आल्या असता एक उत्तरपत्रिका त्यांच्या पायाजवळ उडत आली. कुतूहल म्हणून त्यांनी ती पाहिली असता ती बारावीची उत्तरपत्रिका असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी कामोठे पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांना माहिती दिली.

Comments
Add Comment