मुंबई : धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. या राजीनाम्याला २४ तास होत नाहीत तोच राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोडण्याची तयारी सुरू केली आहे. राज्याचे कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांच्याही राजीनाम्यासाठी विरोधकांचा दबाव वाढत आहे. यामुळे ऐन अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय अडचणी वाढल्या आहेत.
हसन मुश्रीफ मंत्री असल्यामुळे वास्तव्यासाठी अमेकदा मुंबईत शासकीय निवासस्थानी अथवा कोल्हापूरमध्ये स्वतःच्या घरी असतात. पण त्यांना पालकमंत्री म्हणून वाशिम जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यामुळे हसन मुश्रीफ यांचा वारंवार कोल्हापूर – मुंबई – वाशिम असा सुमारे ८०० किमी. प्रवास होत आहे. वय आणि तब्येतीमुळे वारंवार हा प्रवास करणे झेपत नसल्याची तक्रार करत हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोडण्याची तयारी केली आहे. या संदर्भात त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्याशी चर्चा केल्याचे वृत्त आहे. अजित पवार हसन मुश्रीफ यांना पालकमंत्री हे पद सोडू नये यासाठी विनंती करत असल्याचेही वृत्त आहे. पण मुश्रीफ यांनी पद सोडले तर लवकरच वाशिम जिल्ह्याला नवा पालकमंत्री मिळणार आहे.
याआधी बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात सुरू झालेल्या वादानंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा राज्यपालांनी मंजूर केला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडचा सहभाग निश्चित झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती.