Friday, March 28, 2025
Homeब्रेकिंग न्यूजProject Arya : मुंबईतील बचत गटाच्या महिला करणार 'फूड डिलिवरी'

Project Arya : मुंबईतील बचत गटाच्या महिला करणार ‘फूड डिलिवरी’

बृहन्मुंबई महानगरपालिका आणि ‘झोमॅटो’चा संयुक्त ‘प्रोजेक्ट आर्या’ उपक्रम

मुंबई : महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation) सतत विविध योजना, उपक्रम राबवित असते. महानगरपालिका नियोजन विभागाच्या माध्यमातून बचत गट (self-help group) स्थापन करून महिलांचे आर्थिक सबलीकरणही करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता बृहन्मुंबई महानगरपालिका आणि घरोघरी खाद्यपदार्थ पोहोच करणारी ‘झोमॅटो’ कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रोजेक्ट आर्या’उपक्रम (Project Arya) हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार आता खाद्य पदार्थ वितरणाच्या (food delivery) क्षेत्रातही महिला बचत गट आपला ठसा उमटविणार आहेत. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या सक्षमीकरणासाठी महानगरपालिकेने हा उपक्रम हाती घेतला आहे. कौतुकाची बाब म्हणजे ‘झोमॅटो’सोबत महिला बचत गटांसाठी अशाप्रकारे उपक्रम राबविणारी बृहन्मुंबई महानगरपालिका ही भारतातील पहिलीच स्थानिक स्वराज्य संस्था ठरली आहे.

‘प्रोजेक्ट आर्या’चा (Project Arya) शुभारंभ बुधवार ५ मार्चपासून करण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या हस्ते तसेच संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर, झोमॅटोचे मुंबई विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश आहुजा यांच्या उपस्थितीत मुलुंड (पश्चिम) येथील कालिदास नाट्यगृहात सायंकाळी ५.३० वाजता या उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे. या उपक्रमासाठी एकूण ३० ते ४० महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १५ महिलांची निवड करण्यात आली आहे. आता या महिला खाद्य पदार्थ पोहोचविण्याचे काम करणार आहेत.

‘लाँड्री’ व्यवसाय ‘कारखाना’ म्हणून पात्र

बचत गट म्हटले की लोणची, पापड तयार करणे, कापडी पिशव्या तयार करणे, सजावटीची साहित्य तयार करणे अशी कामे आपल्या डोळ्यासमोर येतात. मात्र आता ही पारंपरिक चौकट ओलांडून महिलांमधील आत्मविश्वास वाढविण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्टया अधिक सक्षम करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने हा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. मुंबईतील धावते आयुष्य, बदलती जीवनशैली, वेळेची कमतरता, नोकरी-व्यवसायामुळे होणारी फरफट यामुळे अनेकांना पोटपूजा करण्यासाठी विविध उपाहारगृहे, भोजनालय, खानावळी यावर निर्भर राहावे लागते. साहजिकच अशाप्रकारे खाद्यपदार्थ कार्यालयात, घरी उपलब्ध झाल्यास अनेकांची सोय होते. या क्षेत्रात आता अनेक व्यावसायिक कंपन्या सेवा देतात. त्यातील नामांकीत असलेल्या झोमॅटो कंपनीच्या संयुक्त विद्यमाने महानगरपालिकेने बचत गटाच्या महिलांसाठी ‘प्रोजेक्ट आर्या’ (Project Arya) सुरू केला आहे.

महिलांना दिले दुचाकी चालविण्याचे प्रशिक्षण

खाद्यपदार्थ वितरणात आतापर्यंत पुरुषांचीच संख्या अधिक आढळते. हीच बाब अधोरेखित करून बृहन्मुंबई महानगरपालिकेने यासाठी बचत गटाच्या ३० ते ४० महिलांना दुचाकी चालविण्याचे प्रशिक्षण दिले आहे. तसेच स्व:रक्षणाचे धडे दिले आहेत. यासोबतच मोबाईल अॅपद्वारेही या महिला प्रसंगी गरज भासल्यास आपल्कालीन संदेश (एसओएस) पाठवून स्वत:चे रक्षण करू शकणार आहेत.

भारतातील पहिलीच महानगरपालिका

झोमॅटोसोबत अशाप्रकारचा उपक्रम राबविणारी बृहन्मुंबई महानगरपालिका ही भारतातील पहिलीच महानगरपालिका आहे. याउपक्रमांतर्गत दुर्बल घटकांना प्रगतीच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध संकल्पना राबविण्यात येणार आहेत. सुरुवातीला महानगरपालिकेच्या टी विभागात म्हणेच मुलुंड परिसरात हा उपक्रम सुरू होत आहे. यानंतर इतर सर्व विभागांमधील (वॉर्ड) बचत गटातील महिलांनाही यात सहभागी करून घेण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या स्वयं सहायता समुहाच्या माध्यमातून हा उपक्रम पार पाडण्यात येणार आहे.

सहभागी महिलांच्या मुलांना शिष्यवृत्ती

प्रोजेक्ट आर्यामध्ये (Project Arya) सहभागी महिलांना नोंदणी प्रक्रिया, प्रशिक्षण, सुरक्षा उपायबाबतच्या योजना आणि विमा सुविधा झोमॅटोकडून प्रदान करण्यात येणार आहेत. या उपक्रमात सहभागी महिलांच्या मुलांना शिष्यवृत्ती, अपघात विमा, मातृत्व विमा, कुटुंबासाठी विमा, मासिक पाळी दरम्यान दोन दिवसांसाठी रजा, नि:शुल्क सुरक्षा साहित्य, कुटुंबासाठी आदी बाबींचा समावेश आहे. सध्या मुलुंड (टी वॉर्ड) येथे इच्छुक महिलांकरीता झोमॅटो अॅपवर नोंदणीसाठी प्रशिक्षण सत्रे आणि इलेक्ट्रिक दुचाकी चालविण्याचे विशेष प्रशिक्षण सत्रे आयोजित केली जात आहेत, अशी माहिती संचालक डॉ. प्राची जांभेकर यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -