मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे (Santosh Deshmukh Murder Case) फोटो समोर आल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला. या परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून अधिकृत निवेदन (NCP statement after Dhananjay Munde’s post) जारी करण्यात आले आहे.
संतोष देशमुख हत्येप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी
या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, संतोष देशमुख हत्येप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी, ही पक्षाची ठाम भूमिका आहे. बीडसह संपूर्ण राज्यभरातील पक्षाच्या नेत्यांनीही याबाबत स्पष्ट भूमिका घेतली आहे. धनंजय मुंडे यांचा या प्रकरणाशी थेट संबंध नसल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. मात्र, नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी स्वतः राजीनामा दिला, ही सकारात्मक बाब असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
श्री. धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावरती दिलेल्या राजीनामाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. खा. श्री. सुनीलजी तटकरे यांनी जारी केलेले पत्रक @SunilTatkare pic.twitter.com/ZxgvO2qnLe
— MahaNCPspeaks (@mahancpspeaks) March 4, 2025
पक्ष कायद्याच्या चौकटीत राहून न्याय मिळावा यासाठी वचनबद्ध
राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट केले आहे की, पक्ष कायद्याच्या चौकटीत राहून न्याय मिळावा यासाठी वचनबद्ध आहे आणि न्यायप्रक्रियेत कोणताही हस्तक्षेप करणार नाही. धनंजय मुंडेंनी राजीनामा देऊन नैतिकता जपली असून, न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास असल्याचे पक्षाने सांगितले. या प्रकरणाची चौकशी कोणत्याही दबावाशिवाय पार पडेल, असे आश्वासनही निवेदनातून देण्यात आले आहे.
आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही आमची अपेक्षा
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास कोणत्याही दबावाशिवाय सुरू आहे आणि तो असाच चालू राहून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही आमची अपेक्षा आहे. हे प्रकरण न्यायालयीन असून तपास सुरू असल्याने त्यावर अधिक भाष्य करणे उचित ठरणार नाही. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे सांगू इच्छितो की कोणत्याही गुन्ह्याला, गैरकृत्याला पक्षाचे किंवा आमच्या नेत्यांचे कधीही समर्थन असणार नाही. आजच्या घटनेतून हाच संदेश राज्याला गेला आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले.
या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच,…
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) March 4, 2025
न्याय व्यवस्था आणि कायदा यावर आमचा पूर्ण विश्वास
या प्रकरणातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक महत्त्वाचा संदेश देत आहे. न्याय व्यवस्था आणि कायदा यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि त्यांच्या कामात आम्ही कधीही हस्तक्षेप करणार नाही. न्यायाला विलंब होऊ नये यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.