दुबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील पहिला उपांत्य सामना मंगळवार ४ मार्च रोजी दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजल्यापासून सामन्याचे थेट प्रक्षेपण सुरू आहे.
आयसीसीच्या कार्यक्रमानुसार यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पहिला उपांत्य सामना अ गटातील पहिल्या क्रमांकाचा संघ विरुद्ध ब गटातील दुसऱ्या क्रमांकाचा संघ असा होणार आहे. भारत अ गटात पहिल्या स्थानी आणि ऑस्ट्रेलिया ब गटात दुसऱ्या स्थानी आहे. यामुळे पहिल्या उपांत्य सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने असतील. भारताने बांगलादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा पराभव करुन सहा गुण मिळवले. साखळी फेरीतले तिन्ही सामने जिंकत भारताने दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला. याउलट ऑस्ट्रेलियाने फक्त एक साखळी सामना जिंकला आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे ऑस्ट्रेलियाचे दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान या दोन संघांविरुद्धचे सामने रद्द झाले. रद्द झालेल्या सामन्यासाठी दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण आणि जिंकलेल्या सामन्यासाठी विजेत्याला दोन गुण दिले जातात. या नियमांमुळे ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांनंतर चार गुण मिळवले.
पहिल्या उपांत्य सामन्यातील विजेत्याचा सामना अंतिम फेरीत दुसऱ्या उपांत्य सामन्यातील विजेत्या संघाशी होणार आहे. दुसरा उपांत्य सामना अ गटातील दुसऱ्या क्रमांकाचा संघ विरुद्ध ब गटातील पहिल्या क्रमांकाचा संघ असा होणार आहे. अ गटात चार गुणांसह न्यूझीलंड दुसऱ्या स्थानी आणि ब गटात दक्षिण आफ्रिका पाच गुणांसह पहिल्या स्थानी आहे. त्यांचा ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना रद्द झाला. पण इंग्लंड आणि अफगाणिस्तानचा पराभव करुन दक्षिण आफ्रिकेने गटात पहिले स्थान मिळवले. यामुळे दुसरा उपांत्य सामना न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात लाहोरच्या गद्दाफी स्टेडियम अर्थात गडाफी स्टेडियममध्ये होणार आहे. बुधवार पाच मार्च रोजी होणार असलेल्या या सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजल्यापासून सुरू होणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात रविवार ९ मार्च रोजी पहिल्या आणि दुसऱ्या उपांत्य सामन्यांचे विजेते एकमेकांच्या विरोधात मैदानात उतरतील. भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजल्यापासून अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण सुरू आहे. भारत उपांत्य सामना जिंकल्यास अंतिम सामना दुबईत खेळवला जाईल. जर भारत उपांत्य सामना हरला तर अंतिम सामना पाकिस्तान किंवा दुबई पैकी कुठे खेळवायचा याचा निर्णय आयोजन समिती घेणार आहे. स्पर्धेच्या उपांत्य आणि अंतिम फेरीच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि स्पोर्ट्स १८ नेटवर्कच्या चॅनलवर होणार आहे.
उपांत्य सामन्यासाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल , विराट कोहली , श्रेयस अय्यर , केएल राहुल , रिषभ पंत , हार्दिक पंड्या , रविंद्र जडेजा , अक्षर पटेल , वॉशिंग्टन सुंदर , कुलदीप यादव , मोहम्मद शमी , अर्शदीप सिंग , हर्षित राणा , वरुण चक्रवर्ती
उपांत्य सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ :स्टीव्हन स्मिथ (कर्णधार) , शॉन अॅबॉट , अॅलेक्स केरी , बेन द्वारशुइस , नॅथन ए लिस , जेक फ्रेझर-मॅकगर्क , आरोन हार्डी , ट्रॅव्हिस हेड , जोश इंग्लिस , स्पेन्सर जॉन्सन , मार्नस लाबुशेन , ग्लेन मॅक्सवेल , तन्वीर संघा , मॅथ्यू शॉर्ट , अॅडम झंपा