Friday, March 28, 2025
Homeसाप्ताहिककोलाज“...मग पुन्हा हसलोच नाही”

“…मग पुन्हा हसलोच नाही”

श्रीनिवास बेलसरे

‘जहाँ न पहुंचे रवी, वहाँ पहुंचे कवी’ असे जरी म्हणत असले आणि ते अगदी खरेही असले तरी सर्व ठिकाणी जाण्याची आणि सर्व अनुभव स्वत: घेण्याची कवीला गरज नसते. अनेक कलंदर आणि कल्पक कवींनी हे सिद्ध केले आहे. त्यातले एक प्रभावी उदाहरण म्हणजे कविवर्य सुरेश भट! आतून अत्यंत विरक्त, विचारी आणि चिंतनशील असलेल्या भटांनी आपल्या कारकिर्दीत टोकाच्या रोमँटिक कविताही लिहिल्या आहेत आणि त्यांना याही बाबतीत मराठीत कुणी स्पर्धक निर्माण झाला नव्हता. मराठी गझलेच्या प्रांतात, तर मानदंड म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जाते. रसिकांपर्यंत पोहोचण्याचे रेडिओ हे एकमेव साधन असलेल्या भावगीतांनाही सिनेगीतांच्या इतकी लोकप्रियता सुरेशजींच्याच कवितांनी मिळवून दिली.
एल्गारसारखा कवितासंग्रह लिहिणारा हा माणूस “मालवून टाक दीप चेतवून अंग अंग” सारखे नितांत रोमँटिक सिनेगीत लिहितो, ते ज्या सिनेमात आहे त्याच ‘सिंहासन’मध्ये त्यांचे “अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली”सारखे क्रांतीगीतही असते! पुन्हा ‘मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे’ सारखी शृंगारिक कविताही ते लीलया लिहितात.

‘रंग माझा वेगळा’, ‘रसवंतीचा मुजरा’, ‘रूपगंधा’, ‘एल्गार’, ‘काफिला’, ‘झंझावात’ ‘सप्तरंग’, ‘हिंडणारा सूर्य’, ‘सुरेश भट-निवडक कविता’ असे त्यांचे किमान ९ काव्यसंग्रह सर्वपरिचित आहेत. याशिवाय त्यांच्या कवितेवर दोन अभ्यासकांनी पुस्तके लिहिली आहेत. एक म्हणजे डॉ. राम पंडित यांचे ‘अन उदेला एक तारा वेगळा’ आणि स्वत: गझलकार असलेल्या प्रदीप निफाडकर यांचे ‘गझलसम्राट सुरेश भट’! सुरेश भटामधला बंडखोर, विद्रोही विचारवंत त्यांच्या लेखनात कधीच लपत नाही तरीही त्यांच्या अनेक कवितात उदासीनतेची एक अदृश्य सावली सतत वावरताना दिसते. दुसरीकडे मात्र ते टोकाची आशावादी कविता लिहितात. त्यांच्या अनेक कवितांमागे एक प्रामाणिक ‘कन्फेशन’ दिसते. अनेक कवितात या शारीरिक मर्यादात अडकून पडलेल्या प्रबुद्ध आत्म्याला जे स्वातंत्र्य हवे होते ते त्याने कल्पनेनेच अनुभवल्याचे लक्षात येते. कधी सुरेशजींची कविता हे प्रामाणिक आत्मचिंतन, आत्मपरीक्षण असते, तर कधी सामाजिक वास्तवाच्या जाणिवेतून आलेले विषादपर्व!

‘रंग माझा वेगळा’ हा त्यांचा दुसरा कवितासंग्रह १९७४ साली आला. पहिला ‘रूपगंधा’ आला होता १९६१ साली. दोन्ही कवितासंग्रहांना महाराष्ट्र सरकारचे पुरस्कार मिळाले. ‘रंग माझा वेगळा’ची तब्बल ११वी आवृत्ती २०१६ साली ‘विजय प्रकाशन’ने काढली. त्यातली कविवर्यांचे सगळे जगणे फक्त १४ ओळीत सांगणारी एक कविता रसिकात आजही लोकप्रिय आहे. तिच्यात सुरेशजी म्हणतात – ‘जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही! एकदा तुटलो असा की, मग पुन्हा
जुळलोच नाही!’ एकंदर आयुष्याबद्दलच त्यांची तक्रार आहे. रोज सगळीकडे दृष्टीस पडणारी विषमता, खोटेपणा, प्रतारणा, वंचना कवीला अजिबात पसंत नाही. मात्र त्याबद्दल काहीही करता येत नसल्याने त्याची जीवनप्रेरणा क्षीण झाली आहे. तो एकंदर जगणे फक्त ‘पार पडतो’ आहे. त्यात अजिबात रुची घेत नाही. मनाला होणाऱ्या वेदनांचा वेगवेगळा अर्थ काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण खोटेखोटे जगणे, आहे त्यात आनंदी आहोत असे खोटे खोटे भासवणे काही या कवीला जमले नाही. याची कबुली देताना सुरेशजी म्हणतात- ‘जन्मभर अश्रूंस माझ्या शिकविले नाना बहाणे; सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी
शिकलोच नाही!’ कवीने अनेकदा व्यवस्थेविरुद्ध एल्गार पुकारला, प्रस्थापितांविरुद्ध उठाव केला पण त्याला फारसे यश आले नाही हेही कवी रसिकांसमोर खेदाने नमूद करतो –
‘कैकदा कैफात माझ्या मी विजांचे
घोट प्यालो;
पण प्रकाशाला तरीही हाय,
मी पटलोच नाही!’

सुरेशजींच्या एकंदर निवेदनातच एक टोकदारपणा असायचा. आपल्या नाशिबात आनंद आला नाही. नेहमी अश्रू आणि वेदनाच अनुभवाव्या लागल्या. हे दु:खही मी स्वत:पुरतेच ठेवण्याचा प्रयत्न केला पण फक्त मनातले हुंदके लपविण्यातच आयुष्य गेले असे कवी सांगतो. यापुढची ओळ, तर कुणाही रसिकाला अस्वस्थ करते. सुरेशजी म्हणतात, ‘एकदा हसलो जरासा, अन पुन्हा हसलोच नाही!’ नियतीने केलेली केवढी क्रूर थट्टा!-
‘सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळले मी;
एकदा हसलो जरासा, मग पुन्हा
हसलोच नाही!’

मी दु:खावर विजय तर मिळवू शकलो नाही पण माझी दु:खे विसरण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. विसरलोही. पण एक खंत तशीच मनात राहून गेली की मला माझेच आयुष्य नगण्य वाटू लागले. मी स्वत:ला विसरून इतरांच्याच जीवनात आनंद कसा निर्माण करता येईल ते पाहत गेलो. माझा विचारच मी केला नाही.
‘स्मरतही नाहीत मजला चेहरे माझ्या व्यथांचे;
एवढे स्मरते मला की, मी मला
स्मरलोच नाही!’

कधी स्वाभाविकपणे कुठेतरी आनंद शोधावा असे वाटत राहिले. मीही जीवनाच्या उत्सवात सामील होण्याचा प्रयत्न केला. तोही सर्व मर्यादा पाळत, अगदी संकोचतच! पण नुसते चार आनंदी स्वर स्वत:शीच गुणगुणायचे म्हटले तरी माझे ओठ तिऱ्हाईतासारखे तटस्थ राहिले. आतून मीच मला दुरावलो होतो. मन खेद आणि खिन्नतेच्या आहारी गेले. पण जगासाठी मी आनंदाची गाणी लिहिली. इतरांसाठी सुखाची स्वप्ने रंगवली. त्यांचे रंजन केले. मी मात्र या सगळ्यात कुठेच नव्हतो ही या भावुक, अस्वस्थ, एकाकी मनाची तडफड आहे-
‘वाटले मज गुणगुणावे, ओठ पण
झाले तिऱ्हाईत;
सुचत गेली रोज गीते; मी मला
सुचलोच नाही!’

एका संवेदनशील मनाचे सार्वत्रिक दु:ख सुरेशजी किती चित्रमय पद्धतीने मांडतात पाहा. ते अवघ्या जगण्याला, मनासाठी विरंगुळा शोधावा म्हणून प्रत्येकाने खेळलेला एक खेळ म्हणतात. ज्यात डोळ्यांवर आपोआप एक पडदा येईल आणि जगाचे विदारक रूप आपल्याला दिसणार नाही असा मुखवटा घालून आपण जीवनात वावरत असतो. जणू स्वत:ची फसवणूक करून घेतली तरच जगणे सुसह्य होते! नियती आपल्याशी मुद्दामच ‘आंधळी कोशिंबीर’ खेळत असते. आयुष्यभर आपण जिंकण्याच्या वेगवेगळ्या कल्पनामागे धावत राहतो आणि शेवटी सत्य कळते!

‘संपल्यावर खेळ माझ्या आंधळ्या कोशिंबिरीचा…
लोक मज दिसले अचानक; मी कुठे दिसलोच नाही!’
सुरेशजी म्हणतात, ‘जेव्हा मृत्यूने डोळ्यांवरचा आंधळ्या कोशिंबिरीचा रुमाल काढला, सत्य दिसले तेव्हाही मला वेगवेगळ्या अर्थाने यशस्वी झालेले, आनंदी असलेले अनेक लोक दिसले. पण मी मात्र मला दिसलोच नाही! केवढी विषण्णता, किती निर्णायक शोकांतिका! तरीही कविवर्य पी. बी. शेले यांच्या याच वास्तवावर अंतिम भाष्य करणाऱ्या ओळी कशा विसरता येतील?-

“Our sweetest songs are those
that tell of saddest thought.”
म्हणून अशा कविता वाचायच्या!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -