ज्ञानबीजाचा विस्तार

श्री गुरुगाथा - अरविन्द दोडे


ऐसा हा उत्तरोत्तरु |
ज्ञानबीजाचा विस्तारु |
सांगता असे अपारु |
परी असो आता ॥ ४.१९२॥


आपल्या ज्ञानबीजाचा विस्तार जसा गुरू करतो, तसा शिष्यानंही त्यात स्वत:चा सहभाग दाखवायला हवा. गुरू अंधार हटवतो, पण शिष्यानं तेवत ठेवलेला ज्ञानदिवा मालवणार नाही, याची दक्षता घ्यायला हवी. गुरू कसा असतो, या पार्वतीच्या प्रश्नाचं उत्तर देताना भगवान शंकर म्हणतात,


हे प्रिये...
अ-त्रिनेत्र: सर्वसाक्षी
अचतुर्बाहुरच्युत: |
अचतुर्वदनो ब्रह्मा |
श्रीगुरू: कथित: प्रिये ॥


तीन नेत्र नसूनही, जो सर्वसाक्षी शिवरूप आहे, चतुर्भुज नसूनही जो अच्युत, विष्णू आहे आणि चार मुखं नसूनही जो ब्रह्मदेव आहे, अशा गुरूला पूर्णपणे शरण जाऊन सर्वस्व अर्पण करणारा शिष्य गुरूला प्रिय असतो. शिष्याचंही गुरूवर प्राणापलीकडे प्रेम असतं. म्हणून ब्रह्मविद्येला म्हणतात - प्रेमविद्या!


सांगणारा आणि ऐकणारा परस्पर प्रेमपूर्ण अंत:करणाचे असल्याशिवाय ही योगविद्या देता येत नाही, घेताही येत नाही. मनाला मनाची भाषा कळते. शब्दांची गरज नसते. परस्परांवर विश्वास हवा. एकमेकांवर श्रद्धा हवी. संशय नको. गुरुप्रेम मिळवण्यात ज्याला यश मिळतं, त्याला गुरू प्रसन्न होऊन ज्ञान देतो. सद्शिष्य हा सद्गुरूला प्रेरणा देऊन बोलकं करतो. या श्लोकातून आपल्याला समजतं की ब्रह्मा, विष्णू अन्‌‍महेश यांचं प्रचंड, असीम सामर्थ्य गुरूमध्ये असतं. गुरूस्वरूप सर्वव्यापी असतो. त्याच्या भणंग, फकिरी वागण्यावरून, बाह्यरूपावरून त्याला साधारण समजू नये. उत्पत्ती, स्थिती अन्‌‍लय हे या तीन स्वयंभू देवांचं कार्य करण्याचं आत्मबळ एकट्या गुरूमध्ये असतं. तो ब्रह्मांडनायक असतो. जगाचा स्वामी असतो. अनंतकोटी सूर्यमाला त्याच्या आत असतात, पण तो आपलं विश्वरूपदर्शन लपवतो. कुणाला दाखवत नाही. तो पृथ्वीला सनाथ करतो. संकटसमयी त्याचा धावा केल्यास तो धावून येतो. मदत करतो. ‌‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’ हे वचन पाळतो. चौऱ्याऐंशीचा फेरा चुकवतो. कारण तो त्रिगुणात्मक त्रैमूर्ती गुरुदेव असतो! इतर सामान्य गुरू हे संकटकाळी कुचकामी ठरतात. परमगुरू हा त्रैलोक्याची सारी सुखं शिष्याला देतो. बलवान करतो. निर्भय बनवतो. आणखी काय हवंय? म्हणून काय करावं? गुरुप्राप्तीचा उपाय शोधावा. दोन हात म्हणजे द्वैत! पण ते जोडले की होते अद्वैत. दोन डोळे असले तरी दृष्टी एक. दोन ओठ पण हास्य एक. दोन पाय पण चालणं एक. दोन देह, पण मनानं एक. याला म्हणतात निर्द्वंद्व! म्हणजे संघर्षशून्य. न ताण, न तणाव. हा अभेदयोग साधला की गुरुप्राप्ती होते. केवळ भेदून काय उपयोग? मनं जुळायला हवीत ना? हा अभेदयोग साधण्याचा उपाय म्हणजे मनोभावे प्रणाम करणं. मन हे अमन होतं. ते उन्मन झाल्यावर मिळतो गुरुप्रसाद!


‌‘श्रीगुरुगाथा’ या सदरात आपण संतांचे संत आणि गुरूंचे गुरू कोण होते, हे पाहणार आहोत. तसंच गुरुशिष्यांच्या पुराणकथांपासून आधुनिक काळातील भक्तिकथा, प्राचीन लोककथाही अभ्यासणार आहोत. सर्व शंकांचं निरसन होईल. गुरुबाबतचा गैरसमज दूर होईल अशी श्रद्धा आहे. आता मूळ मुद्द्याकडे वळूयात. गुरूवर एवढा राग का असतो? श्रीगुरूचं परम रूप, विवेकरूपी डोळ्यांसाठी अमृताप्रमाणे असतं, पण मंदभाग्य लोक त्या रूपाला बघू शकत नाहीत. जसा अंधांना सूर्योदय दिसू शकत नाही, हे सत्य आहे. ज्ञानेश्वर म्हणतात, ‌‘डोळे आहेत, पण दृष्टी नाही’ तसा प्रकार!


सामान्यत: गुरुबाबत लोक फारसं चांगलं बोलत नाहीत. माणसं बिनडोक पुढाऱ्यांचे समर्थक असतात. मवाली सिनेमावाल्यांचे चाहते असतात. गुंडांना ‌‘ग्रेट’ समजतात, पण सज्जनांना सज्जन म्हणायचं वळण जिभेला नसतं! शिव्या देतात, पण शिवोहम्‌ म्हणताना शरम वाटते. दुर्गुणी माणसांची श्रीमंती बघून ‌‘वाहव्वा’ म्हणतात, पण सद्गुणी माणसाला दरिद्री म्हणतात! ही विसंगती पूर्वीही होती. आताही आहे. यापुढे काय होईल, गुरुदेव जाणे!


‌‘गुरू’ म्हटलं की कपाळावर आठी. चेहऱ्यावर प्रचंड तिरस्कार. असं का होतं? माणूस आपला देह डॉक्टरच्या ताब्यात देतात, वकिलाच्या ताब्यात भवितव्य. बिल्डरच्या ताब्यात लाखो रुपये. परक्या सौंदर्यावर भाळतात. सामर्थ्यावर सर्वस्व अर्पण करतात, पण ‌‘देव, देश अन् धर्मापायी प्राण घेतलं हाती’ असं म्हणत नाहीत!


जो आपल्याला उत्तम जगणं शिकवतो, आयुष्याचं सार्थक करतो, तो अजिबात आवडत नाही! चांगले संस्कार शिकवणारा सुविचारी, विवेकी, सर्वज्ञानी गुरू नकोनकोसा का वाटतो?


जो अंधाला दृष्टी देतो, मानसिक रोग विनामूल्य दूर करतो, त्यापासून दूर राहणं हे दुर्दैव नाहीये का? साधुसंत अशा माणसाला करंटा म्हणतात. गुरूला ओळखण्यासाठीसुद्धा गुरुकृपाच हवी! गुरूचं परम प्रेमरूप आणि स्वरूप कल्याणकारक असतं. आध्यात्मिक दृष्टीनं डोळस करणारा गुरू किती समंजस असतो, हे प्रत्यक्ष गुरूभक्ती केल्याशिवाय कळत नाही. त्रिविधतापापासून मुक्त होण्यासाठी, जन्ममरणाच्या फेऱ्यांतून सुटण्यासाठी केवळ गुरूनाम हेच एकमेव औषध आहे. अनेकांना गुरूनामक परीस लाभूनही ज्यांना जीवनाचं सोनं करून घेता येत नाही, त्यांची मातीच होते.


गुरूचं सत्यस्वरूप जाणवलं की, ईश्वराची दिव्यशक्ती हवी असेल तर ती गुरुस्पर्शानं किंवा वत्सल कटाक्षानं प्राप्त होते. गुरूच्या अनुग्रहानं कुठलाही चमत्कार घडू शकतो. गुरू कल्पतरू असतो. कामधेनू असतो. त्यासाठी आस्था हवी. तो सर्व इच्छा पूर्ण करतो. सारांश, आपल्या सुप्त ज्ञानाच्या बीजाचा वृक्ष करण्याचं बळ ज्याच्यात असतं, तो सर्वसामर्थ्यवान देवापेक्षाही श्रेष्ठ असतो. तो वैराग्य देतो. तोच विवेकाचा दिवा लावतो. जन्माचं सार्थक करतो.जय गुरुदेव!


(arvinddode@gmail.com)

Comments
Add Comment

ज्ञानी व्हा, धन्य व्हा!

जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै आज आपण ज्या विषयाला सुरुवात करत आहोत तो म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे. हा विषय सर्व

मनातील कलह

आत्मज्ञान : प्राची परचुरे वैद्य माणूस हा विचार करणारा, जाणिवा असलेला जीव आहे. त्याच्या प्रत्येक कृतीमागे,

कपिल महामुनी

भारतीय ऋषी : डॉ. अनुराधा कुलकर्णी सांख्य तत्त्वज्ञानाचे आद्यप्रवर्तक कपिलमहामुनी होत. त्यांनी सांख्यदर्शनाचे

माँ नर्मदा...

!! नमामि देवी नर्मदे!! नर्मदा परिक्रमा म्हणजे एक अध्यात्मिक अनुभूती आहे. ही परिक्रमा म्हणजे नर्मदा मैय्याभोवती

दत्तोपासनेचे सार

ऋतुराज : ऋतुजा केळकर संध्याकाळच्या समयी मंद समईच्या उजेडात मी गुरुदेवांच्या छायेत बसून नकळत हरवून जाते. त्या

Dattatreya Jayanti 2025 : त्रिमूर्ती स्वरूप, २४ गुरूंचे ज्ञान! आदिगुरु दत्तात्रेय कोण? मार्गशीर्ष पौर्णिमेचं धार्मिक महत्त्व काय?

सनातन धर्मामध्ये दत्त जयंतीला अत्यंत विशेष आणि अनन्यसाधारण महत्त्व आहे. भगवान दत्तात्रेयांचा जन्म मार्गशीर्ष