संत हे आपला संबंध भगवंताशी जोडतात

अध्यात्म - ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज


आपले हृदय विषयाने इतके भरले आहे की, तिथे भगवंताच्या प्रेमाला जागाच राहिली नाही. बरे, भगवंताचे प्रेम मुद्दाम तिथे घातले, तर ते आत न राहता बाहेर पडते आणि वाऱ्यावर उडून जाते. सामानाने गच्च भरलेली जशी एखादी खोली असते, तसे आपले हृदय आहे. या हृदयाचा संबंध भगवंताशी जोडण्यासाठी, आपल्या हृदयातले सामान, म्हणजे विषय, खाली करून त्याच्या जागी भगवंताचे प्रेम भरणे जरूर आहे. साधारणपणे आपला अनुभव असा आहे की, एखादी वस्तू आपल्याला पुष्कळ आणि पुन्हापुन्हा मिळाली तरी तिचा वीट येतो; म्हणून जी वस्तू आपल्याला कितीही मिळाली तरी तिचा वीट येणार नाही अशी वस्तू आपण मिळवावी. अशी अवीट असणारी वस्तू एकच आहे; ती म्हणजे भगवंत होय.


राजाने आपल्या नावाचा शिक्का केला आणि जो अती प्रामाणिक होता त्याच्याजवळ दिला; त्याप्रमाणे भगवंताने आपले नाम संतांना दिले. त्यामुळे, संत जे करतील त्याला मान्यता देणे भगवंताला जरूरच आहे. आपण आणि संत यांच्यामध्ये मनुष्य या दृष्टीने फरक नाही; पण फरक आहे तो हा की, संत हा जसे बोलतो तसे वागतो, तर आपण बोलतो चांगले आणि वागतो मात्र त्याच्या उलट. आपल्या स्वार्थाच्या आड कोणी आले की, आपण वाईट बोलतो. ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच वस्तूवर दुसऱ्याने प्रेम केले, तर आपण त्याला नावे ठेवतो. आपण नुसती नीतीची तत्त्वे जेव्हा सांगतो तेव्हा अगदी चांगले बोलतो; पण वागताना मात्र उलट वागतो. यासाठी आपण अशी कृती करू या, की आपल्याला नंतर तसे बोलता येईल.गाडीत बसायला मिळावे म्हणून काही कोणी गाडीत बसत नाही, तर आपल्या स्टेशनाला जाण्यासाठीच मनुष्य गाडीचा आधार घेतो. तसा, मोठमोठ्या संतांनी प्रपंच केला खरा; परंतु तो सुखासाठी केला नाही. आपल्या वृत्तीपासून न ढळता इतरांना तारण्याचे काम संतांनी केले. बुडणाऱ्या माणसाला जसा दोरीचा आधार द्यावा, त्याप्रमाणे संतांनी आपल्याला परमात्म्याचा आधार दिला. चंदनाच्या झाडाजवळच्या झाडांना जसा चंदनाचा वास लागतो, त्याप्रमाणे संताजवळ राहतो तोही संतच बनतो. काही कष्ट न करता परमार्थ साधणे हेच सत्संगतीचे महत्त्व आहे.


तात्पर्य: आपण प्रपंचात इतके खोल जातो की, संतांची हाकच ऐकू येत नाही. ती ऐकू येईल इतक्या तरी अंतरावर असावे.

Comments
Add Comment

जीवनप्रवास सुखाचा

जीवन संगीत-सद्गुरू वामनराव पै आपण प्रबोधनाचा जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे संचित ते नशीब. या विषयाशी संबंधित

कपटफुलांच्या रानगंधात

ऋतुराज-ऋतुजा केळकर एका तळ्यात होती बदके पिले सुरेख होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक...” दुरून येणारे आशा दीदींचे

धार्मिक जीवन

आत्मज्ञान -प्राची परचुरे-वैद्य मानवी जीवनाच्या गुंतागुंतीत ‘धार्मिक जीवन’ ही संकल्पना अत्यंत प्राचीन, परंतु

काश्मिरी स्त्रीसंत लल्लेश्वरी

भारतीय संत-डॉ. अनुराधा कुलकर्णी एका काश्मिरी पंडिताच्या पोटी, श्रीनगरजवळील सिमपूर येथे इ. स. १३२० मध्ये

प्रारब्ध ते पाप- पुण्य

जीवन संगीत-सद्गुरू वामनराव पै मी या आधी श्रीमंत माणसाचे उदाहरण दिले. आता दुसरे उदाहरण घेऊ, ‘सत्ता’.

दवबिंदूतून झिरपणारा प्रकाश

ऋतुराज-ऋतुजा केळकर काळच्या दवबिंदूतून झिरपणारा सूर्यकिरण जसा पाण्याच्या थेंबात चमकतो, तसा आत्मा हा