मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने शतकी खेळी खेळत भारतीय संघाला दणदणीत विजय मिळवून दिला.हा सामना जिंकत भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५न च्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातील शतकाचा विराट कोहली याला व्यक्तिगत फायदा ही झाला आहे. त्यानुसार, आयसीसीच्या क्रमवारीत विराट कोहलीला फायदा झाला आहे.
आयसीसीने बुधवारी (26 फेब्रुवारी) ताजी वनडे आकडेवारी जाहीर केली आहे. आयसीसीच्या या क्रमवारीत विराट कोहली पाचव्या स्थानावर आला आहे. याआधी कोहली सहाव्या स्थानावर होता. कोहलीने पाकिस्तानविरुद्ध १११ चेंडूंमध्ये नाबाद १०० धावा केल्या. कोहलीच्या या खेळीत ७ चौकारांचाही समावेश होता. विराटच्या या शतकी खेळीमुळे भारतीय संघाने हा सामना ६ विकेट्सने जिंकला.
आयसीसीच्या वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या पाचमध्ये तीन भारतीय खेळाडू आहेत. शुभमन गिल अव्वल आहे. तर पाकिस्तानी खेळाडू बाबर आझम दुसऱ्या स्थानावर आहे. शुभमन गिल याला ८१७ रेटिंग मिळाले आहेत. तसेच, बाबर आझम याला ७७० रेटिंग मिळाले आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याला ७५७ रेटिंग मिळाले आहे. दक्षिण आफ्रिकेचा हेनरिक क्लासेन चौथ्या क्रमांकावर आहे. यानंतर कोहली पाचव्या क्रमांकावर आहे. कोहलीला ७४३ रेटिंग मिळाले आहे.
आयसीसीच्या वनडे गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला फायदा झाला आहे. दुखापतीमुळे शमी बराच काळ भारतीय संघाबाहेर राहिला होता. मात्र, आता त्याने पुनरागमन केले आहे. मोहम्मद शमीने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या दोन सामन्यात पाच विकेट्स घेतल्या आहेत. याचा फायदा शमीला वनडे क्रमवारीत झाला आहे. त्यापूर्वी तो १५ व्या स्थानावर होता. पण आता शमी १४ व्या स्थानावर आला आहे. गोलंदाजीच्या क्रमवारीत भारताचा कुलदीप यादव तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर श्रीलंकेचा खेळाडू महेश थीकशन अव्वल स्थानावर आहे.