सेवाव्रती : शिबानी जोशी
१९२५ सालापासून म्हणजे १०० वर्षांपासून दादर पश्चिमेकडील गर्दीच्या मध्यभागी असलेल्या फूल मार्केट फ्लायओव्हरखाली दिसणारे एक संगीत दुकान; त्याचं नाव हरिभाऊ विश्वनाथ अँड कंपनी. एखादा व्यवसाय जेव्हा शंभर वर्षे टिकतो तेव्हाच त्याची दर्जा, गुणवत्ता उत्तम आणि तो चालवणाऱ्या संचालकांस ते श्रेय आहे असं म्हणता येतं. आज प्रत्येक क्षेत्रात बदल होत आहेत, त्याला कलाक्षेत्रही अपवाद नाही. कलाही सृजनशील आहे; परंतु आता त्यातही तंत्रज्ञान शिरलं आहे. पारंपरिक तानपुऱ्याऐवजी इलेक्ट्रॉनिक तानपुरा, इलेक्ट्रॉनिक वाद्य आली आहेत. हे काळाच्या ओघात होणारे बदल आत्मसात करत वाद्यांमध्ये बदल करून व पारंपरिकता ही जपत उत्पादन करणारी कंपनी म्हणजे हरिभाऊ विश्वनाथ. आता त्यांचे वारसदार कुटुंबीय ही कंपनी चालवत आहेत.
त्याचे संस्थापक हरिभाऊ विश्वनाथ दिवाणे यांनी शंभर वर्षांपूर्वी हार्मोनियम तसेच इतर वाद्यांच्या दुरुस्तीसाठी छोटं दुकान सुरू केलं. मुंबई नगरी ही कलाप्रेमी तसेच कलावंतांसाठी देखील आकर्षणाचं केंद्र आहे. त्यामुळे मराठी, हिंदी नाट्यसृष्टी, चित्रपट सृष्टीतले अनेक कलावंत मुंबईत येऊन मोठे झाले आहेत. त्यांना पूर्वी कोलकाता, मिरज, सांगली ही वाद्यांची उत्पादन करणारी पारंपरिक ठिकाणं होती; परंतु मुंबईतल्या मुंबईतच वाद्य उपलब्ध करून देऊ लागले हरिभाऊ विश्वनाथ.
हार्मोनियम दुरुस्ती करता करता हार्मोनियम, तबला अशी पारंपरिक वाद्य विक्री या दुकानात सुरू झाली. त्यानंतर त्यांनी स्वतःचा वाद्य निर्मिती कारखाना सुरू केला. कारागिरांना प्रशिक्षण देऊन तयार केलं. दादर नंतर गिरगाव, प्रभादेवी अशी तीन-चार ठिकाणी दुकाने तसेच कारखाना अशी वाढ होत गेली. आज अगदी छोट्या मंजिरीपासून ते हार्मोनियम, तबला, ढोलकी आणि पाश्चिमात्य वाद्य सुद्धा हरिभाऊ विश्वनाथमध्ये मिळतात. हरिभाऊ विश्वनाथ हे केवळ दुकान राहिलं नसून हळूहळू ब्रँड बनत गेला. हिंदी चित्रपटसृष्टीतील नौशाद, मदन मोहन, वसंत देसाई यांच्यासारख्या संगीत दिग्दर्शकांकडे त्यांच्या हार्मोनियम आहेत तर अगदी किशोरीताई आमोणकर, शंकर महादेवन, पद्मजा फेणाणी, हल्लीच्या काळातील आर्या आंबेकर, अवधूत गुप्ते असे असंख्य कलाकार व दुरुस्तीसाठी तिथे येत असतात. इतर उत्पादन करणाऱ्या उद्योगांपेक्षा वाद्य निर्मितीचा उद्योग हा खूप वेगळा आहे. कारण या ठिकाणी प्रत्येक इन्स्ट्रुमेंट हाताने बनवलं जातं. मेहनत आणि सृजनशीलता या दोघांची गरज कारागिरांकडे लागते. त्याशिवाय बरेचसे कलाकार मेड टू ऑर्डर वाद्य घेत असल्यामुळे त्यांच्या गरजेनुसार वाद्य निर्मिती करावी लागते. पेटी, तबला थोडा जरी बेसूर झाला तरी लगेच वादक पेटी, तबला लावून घ्यायला येतात. त्यामुळे केवळ वाद्याची विक्री करून इथे काम थांबत नाही तर त्यानंतर वर्षानुवर्ष त्या वाद्यासाठी सेवा ही त्यांना द्यावी लागते. त्यामुळे हा उत्पादन व्यवसाय थोडा वेगळा आहे. आज दोन्ही दुकानांत २० ते २२ कारागीर त्यांच्याकडे काम करतात. कंपनीची वाद्य अमेरिका, ऑस्ट्रेलिया अशा वेगवेगळ्या देशात निर्यातही होत आहेत. तिथेही आपल्या भारतीय वाद्यांना मागणी आहे, असं दिनेश दिवाणे सांगतात. शंभर वर्षांमध्ये अनेक हिंदी, मराठी गायक, वादकांनी त्यांच्याकडे वाद्य घेतली आहेत. सुप्रसिद्ध संगीतकार नौशाद जी यांनी त्यांची पहिली पेटी इंस्टॉलमेंटवर हरिभाऊ विश्वनाथकडून घेतली होती आणि ती पेटी आजही त्यांच्या शोकेसमध्ये विराजमान आहे.
सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक श्रीकांत ठाकरे यांचा एक अनुभव ते सांगतात,” श्रीकांत ठाकरे बऱ्याच वेळा त्यांच्या दुकानावरून ये-जा करीत असत. एकदा ते दुकानात आले, खरेदी केली आणि विचारलं की हरिभाऊ विश्वनाथ हे नाव प्रसिद्ध आहे पण तुमचं आडनाव काय आहे? त्यावर दिवाणे असं सांगताच त्यांनी हरहुन्नरी उत्तर दिलं, ‘दिवाणे, हम है आपके दिवाने’.
सध्या ऑनलाईन खरेदीचा जमाना आहे. ही आपल्या उद्योगात कशी उपयोगी ठरते असं विचारलं असता दिवाणे म्हणाले की, ऑनलाईन विक्रीचा प्रयोग करून पाहिला होता; परंतु ऑनलाईनमध्ये वस्तू वापरून पाहता येत नाही आणि मग बऱ्याच वेळा आकार, रंग आवडला नाही म्हणून परत करण्याविषयी सूचना होऊ लागल्या. त्यामुळे आम्ही प्रत्यक्ष येऊन विक्रीलाच प्राधान्य देतो. त्यानंतर व्हिफास्टद्वारे वाद्य पोहोचवण्याची सेवा मात्र आम्ही देतो. कोरोना काळामध्ये आमच्या उद्योगावर संकट आलं होतं. त्यावेळी वेगवेगळ्या ॲपद्वारे ऑनलाईन वाद्य विक्री खूप प्रमाणात झाली होती, ती वाद्य आमच्याकडे दुरुस्तीला येत असत. त्यावेळी कळलं की, प्रत्यक्ष पाहून घेता येत नसल्यामुळे अनेक जणांच्या वाद्याबाबत तक्रारी होत्या.दिनेश दिवाणे ५२ वर्षे हरिभाऊ विश्वनाथमध्ये कार्यरत आहेत. तसेच त्यांच्या पत्नी पद्मा दिवाणे यादेखील उद्योगात लक्ष घालत असतात. त्यांनी स्वतः माय म्युझिक क्लब स्थापन केला आहे. हरिभाऊ विश्वनाथच्या अमृता महोत्सवी तसेच शताब्दी कार्यक्रमांमध्ये नौशाद जी, शिवकुमार शर्मा, राहुल शर्मा, सत्यजित प्रभू, आदित्य ओक असे अनेक दिग्गज कलावंत आपली कला साजरी करून गेले आहेत आणि नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम ही दिवाणे परिवार करत असतो. यंदा हरिभाऊ विश्वनाथ शताब्दी वर्ष सुरू आहे. त्यानिमित्ताने नुकताच त्यांनी यशवंत नाट्य मंदिर येथे विविध कलाकारांचा कार्यक्रम आयोजित केला होता. शंभर वर्षांची ही वाटचाल अशीच अविरत पुढे सुरू ठेवण्याचा दिवाने कुटुंबीयांचा मानस आहे.