प्रयागराज : महाकुंभमेळ्याची सांगता झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी अवकाशातही सप्तग्रहांचा कुंभमेळा भरणार आहे.
आगामी २८ फेब्रुवारी रोजी सूर्य मालिकेतील बुध, शुक्र, मंगळ, गुरू, शनि, युरेनस, नेप्च्यून हे सात ग्रह एकाच सरळ रेषेत येणार असून सप्तग्रहांचा हा अद्भुत कुंभमेळा भारतातून याच दिवशी रात्री अनुभवायला मिळेल.
सूर्यमालेतील या ग्रहांचे संचलन जानेवारीतच सुरू झाले आहे. त्यात केवळ शुक्र सहभागी झाला नव्हता. तो २८ तारखेला इतर ग्रहांच्या रेषेमध्ये येणार आहे. नेमके याचक्षणी सूर्याला ग्रहण लागल्यासारखी स्थिती निर्माण होणार आहे. सूर्यदेखील योगायोगाने या सर्व ग्रहांच्या रेषेत आलेला दिसेल.
Pushpa 2 : ‘पुष्पा’चा शालेय विद्यार्थ्यांवर वाईट प्रभाव! शिक्षिकेची आयोगाकडे तक्रार
प्रयाग महाकुंभमेळ्याचे अखेरचे शाहीस्नान झाल्यानंतर अवकाशात अवतरणारी ही पर्वणी ज्यांना अनुभवायची असेल त्यांना युरेनस आणि नेप्च्यून यांना पाहण्यासाठी दुर्बिणीचा आधार घ्यावा लागेल. इतर ग्रह मात्र उघड्या डोळ्यांनी दिसतील.
अध्यात्माचा अभ्यास असणाऱ्या काहींच्या मते ही खगोलीय स्थिती आध्यात्मिक ऊर्जा निर्माण करणारी असेल. विशेषतः गुरू ग्रहाकडून निर्माण होणारी स्पंदने पवित्र स्नान करणाऱ्या भाविकांना जाणवतील. त्यामुळे तीर्थराज प्रयागचा महाकुंभमेळा संपलेला असूनही या सप्तग्रहांच्या मिलनसोहळ्याच्या मुहूर्तावरही त्रिवेणी संगमावर होणारा स्नान सोहळा इतर दिवसांपेक्षा वेगळा असेल.
विशेष म्हणजे येत्या ऑगस्ट महिन्याच्या मध्यातही सहा ग्रह असेच सकाळच्या वेळी एका रेषेत दिसणार आहेत. त्यावेळेची स्थिती आणि २८ फेब्रुवारीला दिसणारे खगोलीय दृश्य हौशी आणि व्यावसायिक खगोल अभ्यासकांना अत्यंत दुर्मीळ अशी संधी उपलब्ध करून देणारी असेल.