हैदराबाद : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) ‘पुष्पा २ : द रुल’ (Pushpa 2 : the rule) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मात्र हैदराबादमधील युसुफगुडा इथल्या एका सरकारी शाळेतील शिक्षक चित्रपटावर नाराज आहेत. हैदराबादमधील एका सरकारी शाळेतील शिक्षकाने विद्यार्थ्यांवर ‘पुष्पा’चा वाईट प्रभाव पडत असल्याचे म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘शाळेतली मुलं विचित्र हेअरस्टाइल करतात, अश्लील बोलतात. आपण फक्त शिक्षणावर लक्ष केंद्रीत करतोय आणि याकडे दुर्लक्ष करतोय. ही परिस्थिती केवळ सरकारी शाळांमध्येच नाही तर खाजगी शाळांमध्येही आहे. प्रशासक म्हणून मला असं वाटतं की मी अपयशी ठरत आहे’, अशी तक्रार शिक्षिकेने बोलून दाखवली आहे. विद्यार्थ्यांना शिक्षा केल्याने त्यांच्यावर दबाव येऊ शकते, असेही त्यांनी म्हटले आहे.
त्याचबरोबर ‘आम्ही त्यांच्या पालकांना या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी बोलावलं तरीही त्यांना काही वाटत नाही. तुम्ही त्यांनी शिक्षादेखील करू शकत नाही, कारण त्यामुळे ते आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात. त्यामुळे या सर्व गोष्टींचा दोष मी मास मीडियाला देते. पुष्पासारख्या चित्रपटामुळे माझ्या शाळेतील अर्धे विद्यार्थी आणखी बिघडले आहेत. शाळेतल्या विद्यार्थ्यांवर काय परिणाम होईल याचा कोणताही विचार न करता सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला प्रमाणपत्र दिलं आहे’, अशी टीका संबंधित शिक्षिकेने केली आहे.
दरम्यान, शिक्षिकेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. ‘शिक्षिकेनं बरोबर म्हटलंय. अशा प्रकारच्या चित्रपटांचा विद्यार्थ्यांवर वाईट परिणाम होऊ शकतो’, असं एकाने म्हटलंय. तर ‘तुम्ही काही चांगलं बोलू शकत नसाल तर ठीक आहे. पण किमान आणखी वाईट तरी बोलू नका’, असे एका ‘पुष्पा’च्या चाहत्याने कमेंट केले आहे.