पुणे : पुणे शहर (Pune news) आणि ग्रामीण भागात गुलेन बॅरे सिंड्रोमचे (GBS) आणखी दोन नवीन रुग्ण आढळले आहेत. यामुळे पुणे जिल्ह्यातील एकूण जीबीएस रुग्णसंख्या २१५ वर पोहोचली आहे. पुणे महापालिका कार्यक्षेत्रात ४३ रुग्ण, तर समाविष्ट गावांमध्ये सर्वाधिक ९५ रुग्ण सापडले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेत ३२, पुणे ग्रामीणमध्ये ३३ आणि इतर जिल्ह्यांतील १२ रुग्ण आहेत.
Ladki Bahin Yojana : रायगड जिल्ह्यातील ‘या’ लाडक्या बहिणी लाभापासून वंचित
सध्या ३२ रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत असून १८ जण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. काल दिवसभरात एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला असून, आतापर्यंत एकूण १५३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, या आजारामुळे आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे.
जीबीएसची स्थिती
वय – एकूण रुग्णसंख्या
० ते ९ – २४
१० ते १९ – २६
२० ते २९ – ४५
३० ते ३९ – २७
४० ते ४९ – ३०
५० ते ५९ – ३२
६० ते ६९- २१
७० ते ७९ – ६
८० ते ८९ – ४
मनपाकडून पाण्याच्या टाक्याची सफाई
पुणे शहरात वाढत्या गुलेन बॅरे सिंड्रोम रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील पाणीपुरवठा करणाऱ्या टाक्यांची स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दहा दिवसांत महापालिकेने २५ टाक्यांची स्वच्छता पूर्ण केली असून, उर्वरित टाक्यांची स्वच्छता पुढील काही दिवसांत पूर्ण केली जाईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. पुण्यातील सिंहगड रस्ता, खडकवासला, नांदोशी, नांदेड आणि किरकिटवाडी या भागांत जीबीएस संशयित रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना म्हणून जलस्वच्छतेवर भर देण्याचा निर्णय घेतला. शहरात सुमारे १५५ पाण्याच्या टाक्या असून, त्या महिनाभरात स्वच्छ करण्याचे नियोजन पाणीपुरवठा विभागाने केले आहे. या टाक्यांमधून शहराच्या विविध भागांमध्ये पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा बंद ठेवून स्वच्छता मोहिम राबवली जात आहे. नागरिकांनी या प्रक्रियेस सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. जलस्वच्छतेच्या या मोहिमेमुळे जीबीएस संसर्ग कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.