Thursday, October 30, 2025
Happy Diwali

'उद्धव ठाकरेंच्या गटात दोन मर्सिडीज दिल्यावर एक पद मिळायचं'

'उद्धव ठाकरेंच्या गटात दोन मर्सिडीज दिल्यावर एक पद मिळायचं'
नवी दिल्ली : उद्धव ठाकरेंच्या गटात दोन मर्सिडीज दिल्यावर एक पद मिळायचं असे वक्तव्य शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केले. नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये 'असे घडलो आम्ही' या कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला.
उद्धव ठाकरे २०१९ मध्ये मुख्यमंत्री झाल्यावर आमदारांना वाटले बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री झाला. पण त्यावेळी कोणालाही माहित नव्हते की, अनेक आमदारांना उद्धव ठाकरेंना भेटताच येणार नाही. कुठल्याच विषयासाठी उद्धव ठाकरे भेटीची वेळ देणार नाहीत. दिवसातून दोन ते तीन वेळा आरटीपीसीआर केली तरी भेट नाही. स्थित्यंतराचे हे एक कारण असल्याचे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील पक्षाचे ५६ आमदार निवडून आले. त्यांना शरद पवारांच्या नेतृत्वातील ५४ आमदार निवडून आलेल्या पक्षाने तसेच ४४ आमदार निवडून आलेल्या काँग्रेस पक्षाने पाठिंबा जाहीर केला. यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते. पण त्यांच्या आमदारांमध्ये उद्धव ठाकरेंविषयीची नाराजी वाढली. काही काळानंतर उद्धव यांच्यासोबतच्या बहुसंख्य आमदारांनी नेते म्हणून एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय ठामपणे घेतला. उद्धव यांचे विचार बहुसंख्य आमदारांपेक्षा वेगळे होते. बदलत्या राजकीय परिस्थितीचा अंदाज येताच विरोधकांनी सत्ताधारी अल्पमतात असल्याचे सांगत विश्वासमताचा ठराव आणून बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान उद्धव यांना दिले. उद्धव यांनी विश्वासदर्शक ठराव मांडण्याऐवजी राजीनामा देण्याचा निरणय घेतला. यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपा - शिवसेना यांच्या महायुतीचे सरकार सत्तेत आले. शिवसेना आमदारांच्या पाठिंब्यामुळे एकनाथ शिंदे यांची राजकीय ताकद वाढली. यानंतर विधानसभेसाठी २०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीत ५७ जागांवर विजय मिळवला. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये नीलम गोऱ्हे यांनी गौप्यस्फोट केला.
Comments
Add Comment