मुंबई : मुंबई रेल्वे विकास महामंडळाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल अशी जलद हार्बर सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव २०१९ मध्ये सादर केला होता. या प्रस्तावानुसार ७५ मिनिटांचा प्रवास ४८ मिनिटांत पूर्ण करण्याचे नियोजन होते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटी (CSMT Mumbai), वडाळा, कुर्ला, टिळकनगर, चेंबूर, मानखुर्द, नेरुळ, बेलापूर ही उन्नत स्थानके, तर वाशी खारघर आणि पनवेल या विद्यमान मार्गांना समांतर असण्याचे नियोजन होते. यासाठी खाडीवर या प्रकल्पाचे बांधकाम प्रस्तापित होते. हा प्रकल्प नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातून जात असल्याने त्याचा मोठा फायदा सर्वसामान्य लोकांना झाला असता. पण हा प्रकल्प स्वप्नातच राहण्याची चिन्ह आहेत.
प्रस्ताव स्वरुपात सादर झालेल्या प्रकल्पानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक १८ येथून उन्नत जलद हार्बर सेवेचे नियोजन होते. सध्या या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पुनर्विकास योजनेशी संबंधित कामं सुरू आहेत. यामुळे उन्नत मार्गाचे आणि त्यासाठीच्या स्थानकाचे बांधकाम करण्यासाठी जागा उपलब्ध नाही. यामुळे सध्या हा प्रकल्प अव्यवहार्य असल्याचे मत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. यामुळे स्वप्नातली जलद हार्बर सेवा आता स्वप्नातच राहण्याची शक्यता आहे.