पुणे : लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ हा हिंदी चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने शनिवार २२ फेब्रुवारी पर्यंत सुारे २५० कोटी रुपयांची कमाई केली. महाराष्ट्रात हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला आहे. निर्मात्याला फायदा मिळवून देत असलेल्या या चित्रपटामुळे पोलिसांचाही फायदा झाला आहे. पोलिसांना ‘छावा’ चित्रपटाच्या निमित्ताने दोन मकोका आरोपींना अटक करणे शक्य झाले आहे.
‘छावा’चित्रपट बघण्यासाठी वैभव टॉकीज येथे धर्मेनसिंग ऊर्फ भगतसिंग सुरजितसिंग भादा (२२) आणि बादशाहसिंग पोलादसिंग भोंड (२३) हे दीघीतील शिव कॉलनीत राहणारे मकोकाचे आरोपी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस मागील काही दिवसांपासून या आरोपींना शोधत होते. अखेर या आरोपींना ‘छावा’ चित्रपटाच्या निमित्ताने अटक करणे पोलिसांना शक्य झाले.
दोन्ही आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका), ‘एनडीपीएस’ कायदा आणि शस्त्र कायद्यानुसार दीघी पोली ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने आरोपी चित्रपट बघण्यासाठी आल्याची माहिती मिळताच कोंम्बिग ऑपरेशन केले. पोलिसानी आरोपींना अटक केली. यानंतर आरोपींचा ताबा गुन्हे शाखेने दीघी पोलिसांना दिला. आरोपींची दीघी पोलीस कसून चौकशी करत आहेत. आरोपींनी आणखी काही गुन्हे केले आहेत का, याचाही तपास सुरू आहे.