पाकिस्तानसाठी ‘करो या मरो’ची सामन्यात स्थिती
नवी दिल्ली : २०२५च्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील हाय व्होल्टेज सामना (India vs Pakistan) रविवार, २३ फेब्रुवारी रोजी खेळला जाणार आहे. या दिवशी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने असतील. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्याकडे आशिया खंडातील तसेच संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे. पाकिस्तानसाठी हा सामना एखाद्या नॉकआउट सामन्यापेक्षा कमी नाही. भारतीय वेळेनुसार दुपारी २.३० वाजल्यापासून तुम्ही भारत आणि पाकिस्तानमधील सामना पाहू शकता. या हाय व्होल्टेज सामन्याचा टॉस दुपारी २ वाजता होईल. २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन्ही संघांचा हा दुसरा सामना असेल. भारताने पहिल्या सामन्यात बांगलादेशला हरवले आहे. तर पाकिस्तानला न्यूझीलंडकडून दारुण पराभव स्वीकारावा लागला. यामुळे पाकिस्तानसाठी हा सामना ‘करो या मरो’ असा असेल.
जर पाकिस्तान संघाने हा सामना गमावला तर त्यांना चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत पोहोचणे जवळजवळ अशक्य होईल. या कारणास्तव, हा सामना पाकिस्तानसाठी नॉकआउट सामन्यासारखा आहे. पण, कोणत्याही देशाच्या संघासाठी बलाढ्य भारतीय संघाला हरवणे सोपे असणार नाही. भारतीय संघाने पहिल्याच सामन्यात आपली ताकद दाखवून दिली आहे.
२०२५च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी, सॅम अयुबला संघातून वगळण्यात आल्यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर आता पाकिस्तानी संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. स्टार सलामीवीर फखर झमानलाही स्पर्धेतून बाहेर करण्यात आले आहे. पण, फखरच्या जागी वरिष्ठ खेळाडू इमाम उल हकला संघात संधी मिळाली आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण १३५ सामने खेळले गेले आहेत. यापैकी टीम इंडियाने ५७ सामने आणि पाकिस्तानने ७३ सामने जिंकण्यात यश मिळवले आहे. तर पाच सामन्यांमध्ये निकाल लागला नाही. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोघांमध्ये एकही सामना बरोबरीत सुटलेला नाही.
४९७ दिवसानंतर भारत-पाकिस्तान आमने-सामने
भारत आणि पाकिस्तान संघाने एकमेकांविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकामध्ये खेळला होता. आता हे दोन्ही संघ तब्बल ४९७ दिवसानंतर म्हणजेच १ वर्ष ४ महिन्यानंतर आमने-सामने असणार आहेत. तर शेवटी झालेल्या सामन्यामध्ये भारतीय संघाने पाकिस्तान संघावर ७ गडी राखून विजय मिळवला होता. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत ५ सामने झाले आहेत. त्यापैकी भारताने २ आणि पाकिस्तानने ३ सामने जिंकले आहेत. त्याचवेळी, एकदिवसीय क्रिकेटच्या हेड टू हेड सामन्यांमध्येही पाकिस्तानने भारतावर वर्चस्व गाजवले आहे. तर २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम सामन्यात भारतीय संघावर मात करत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या चषकावर आपले नाव कोरले होते.
दुबईच्या मैदानावर ‘भारतीय संघ’ अजिंक्य
भारतीय संघाने दुबईच्या मैदानावर आतापर्यंत एकूण ७ एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यापैकी ६ जिंकले आहेत आणि एक सामना बरोबरीत राहिला आहे. या मैदानावर टीम इंडियाला एकदिवसीय क्रिकेटमध्ये पराभवाचा सामना करावा लागला नाही आणि भारताने सर्व प्रतिस्पर्धी संघांना पराभूत केले आहे. भारताने दुबईच्या मैदानावर पाकिस्तानविरुद्ध दोन एकदिवसीय सामने खेळले असून दोन्ही सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांमधील हे सामने एकदिवसीय आशिया चषक २०१८ मध्ये खेळले गेले. एका सामन्यात भारताने ८ विकेट्सने तर दुसऱ्या सामन्यात ९ विकेटने विजय मिळवला होता. आता ७ वर्षांनंतर दोन्ही संघ पुन्हा एकदा दुबईच्या मैदानावर एकदिवसीय सामना खेळणार आहेत.
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ऋषभ पंत , हार्दिक पंड्या, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.
पाकिस्तान संघ : बाबर आझम, फखर जमान, कामरान गुलाम, सौद शकील, तय्यब ताहिर, फहीम अशरफ, खुशदिल शाह, सलमान अली आघा, मोहम्मद रिजवान, उस्मान खान, अबरार अहमद, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह , शाहीन शाह आफ्रिदी.