Monday, October 20, 2025
Happy Diwali

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी तिसरी अटक

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी तिसरी अटक
मुंबई : न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी तिसरी अटक झाली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू मौन यांना अटक केली. ते डिसेंबर २०२४ पर्यंत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. मौन यांनी सह-आरोपी हितेश मेहता यांच्याकडून एक कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे.
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात बँकेचे माजी महाव्यवस्थापक अकाउंट्सचे प्रमुख हितेश मेहता आणि रिअल इस्टेट डेव्हलपर धर्मेश पौण यांना आधीच अटक झाली आहे. आता मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू मौन यांना अटक झाली आहे. यामुळे न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणातील अटकेतल्या आरोपींची संख्या तीन झाली आहे.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याशी संबंधित तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिन्ही आरोपींना २८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
शुक्रवारी दादर पोलिस ठाण्यात बँकेच्या कार्यवाहक मुख्य कार्यकारी अधिकारी देवर्षी घोष यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा तपास करत आहे. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या प्रभादेवी आणि गोरेगाव शाखांमधून १२२ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याप्रकरणी पोलिसांनी अभिमन्यू मौन, हितेश मेहता आणि धर्मेश पौण या तीन जणांना अटक केली आहे. रिझर्व्ह बँकेने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादले आहेत. या निर्बंधांमुळे न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक नवी खाती उघडू शकत नाही. नव्या ठेवी ठेवून घेऊ शकत नाही. तसेच बँक कोणालाही कर्ज देऊ शकत नाही. बँकेच्या कर्मचाऱ्यांना थकीत कर्जांच्या वसुलीच्या प्रक्रियेची गती वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Comments
Add Comment