अलिबाग : अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहाला (PNP Natyagruha) तीन वर्षांपूर्वी भीषण आग लागली होती. १५ जून २०२२ रोजी नाट्यगृहात वेल्डिंगचे काम करीत असताना ठिणगी पडून ही आग लागली होती. त्यामुळे अलिबागच्या (Alibaug Theater) नाट्य चळवळीला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर या नाट्यगृहाला नवी झळाळी मिळण्यासाठी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी निधी मिळण्याबाबतचा प्रस्ताव सांस्कृतिक कार्य विभागाकडे पाठवला होता. आता प्रशासनाकडून नाट्यगृहाच्या नुतनीकरणासाठी निधी मंजुर झाला आहे. त्यामुळे आता लवकरच पीएनपी नाट्यगृहात तिसरी घंटा वाजणार आहे.
Viral Video : मुलाने कुत्र्याला लिफ्टमध्ये आणण्यास दिला नकार; चिडलेल्या महिलेने काय केले पहाच…
मिळालेल्या माहितीनुसार, नाट्यगृहाच्या दुरुस्ती आणि नुतनीकरणासाठी राज्य सरकारने तब्बल ९ कोटी ३२ लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली होती. यातील पहिल्या टप्प्यातील कामांना लवकरच सुरुवात होणार आहे. त्यासाठी तीन कोटी ६५ लाख ७० हजार रुपयांच्या निधीला सांस्कृतिक कार्य विभागाने मंजुरी दिली आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे कार्यासन अधिकारी अनिरुद्ध देशपांडे यांच्या सहीने शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नाट्यगृहाच्या कामाला गती मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, हा निधी मंजूर करताना शासनाने काही अटी घातल्या आहेत. निधी प्राप्त झाल्यापासून दोन वर्षांच्या आत नाट्यगृहाचे काम पूर्ण करायचे आहे. भविष्यात नाट्यगृहाच्या प्रयोजनासाठी पुन्हा निधीची मागणी करता येणार नाही. नाट्यगृहात भविष्यात कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नाट्यगृह सांस्कृतिक कार्य विभागासाठी दरवर्षी सलग दहा दिवस अथवा टप्प्याटप्प्याने विनामोबदला उपलब्ध करून द्यावे लागेल. त्याचबरोबर नाट्यगृहाचा विमा काढण्याची कार्यवाही तातडीने करण्यात यावी, असे निर्देशही शासन निर्णयानुसार पीएनपी सहकारी सांस्कृतिक कला विकास मंडळाला देण्यात आले आहेत. (PNP Natyagruha)