Saturday, September 13, 2025

Pune News : पुण्यात इलॉन मस्कची एन्ट्री; टेस्ला कंपनीचा प्लांट उभारणार

Pune News : पुण्यात इलॉन मस्कची एन्ट्री;  टेस्ला कंपनीचा प्लांट उभारणार

पुणे  : इलॉन मस्कची टेस्ला कंपनी भारतात इलेक्ट्रिक वाहन उत्पादन प्लांट उभारण्यासाठी जमीन शोधत असून, लवकरच टेस्ला कंपनी महाराष्ट्रात प्लांट उभारण्याची शक्यता आहे. या संदर्भात टेस्लाने राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांशी चर्चाही सुरू केली आहे. इलॉन मस्क यांच्या अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर कंपनीने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. महाराष्ट्र हा टेस्लाचा पसंतीचा पर्याय का ठरला आहे, यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत.

पुण्यात टेस्लाचे आधीपासून कार्यालय आहे आणि त्यांचे अनेक पुरवठादार देखील महाराष्ट्रात कार्यरत आहेत. त्यामुळे टेस्लासाठी महाराष्ट्र हा व्यवसाय विस्तारासाठी नैसर्गिक पर्याय आहे. महाराष्ट्र सरकारने पुण्याच्या जवळ असलेल्या चाकण आणि चिखली येथे जमीन देण्याची ऑफर दिली असल्याचे अधिकाऱ्यांकडून खासगीत सांगण्यात आले. चाकण हे वाहननिर्मितीचे प्रमुख केंद्र आहे. येथे मर्सिडीज-बेंझ, टाटा मोटर्स, महिंद्रा अॅन्ड महिंद्रा, फोक्सवॅगन आणि बजाज ऑटो यांसारख्या मोठ्या कंपन्या आहेत. महाराष्ट्र सरकारने स्पष्ट केले आहे की, चर्चा अद्याप सुरू आहे. कोणत्याही अंतिम करारावर स्वाक्षरी झालेली नाही.

टेस्ला आपल्या निर्णय घेण्यापूर्वी बंदराच्या जवळच्या जमिनीचा विचार करत आहे. इलॉन मस्क आणि मोदी यांची भेट झाल्यानंतर लगेच टेस्लाने लिंक्डइनवर भारतासाठी १३३ पदांसाठी भरती सुरू केली आहे. ही पदे मुंबई आणि दिल्लीमध्ये आहेत. टेस्ला भारतात उत्पादन प्रकल्प सुरू करण्यापूर्वी विक्री शो-रूम सुरू करण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment